Tuesday 16 May 2023

आम्ही आत्मकेंद्रित होत आहोत काय?

काल घरासमोरून कचरा वेचणारी एक स्त्री व सहा-सात वर्षाची मुलगी जाताना दिसली. दोघींच्या अंगावर कळकटलेले कपडे होते. त्या दोघींच्या पाठीवर कचऱ्याची पोतडी होती. रस्त्यावर कुठं काही प्लास्टिक दिसतंय का त्यावर नजर टाकत त्या दोघी चालल्या होत्या. ती मुलगी शाळाबाह्य असेल म्हणून मला काही राहवलं नाही. त्या महिलेला विचारलं अहो ती शाळेत जात नाही का? ती महीला थांबली. मुलीचं काही लक्ष नव्हतं.ती महिला म्हणाली, " अहो पाटील आमी औश्याचं, घालायचंय शाळतं,आधारकार्ड नाही बघा."
मी तीला शाळेत घालण्याचा आग्रह धरत होतो. शासनाच्या वस्तीगृहात टाका. पण शाळेत घाला.तुमच्यासारखं जगणं तिच्या वाट्याला येऊ देऊ नका.असं सांगत होतो. अशी वंचित घटकांतील लेकरं पाहिली की मनाला खूप वेदना होतात. 

शेजारच्या गल्लीतचं घराचं बांधकाम सुरू आहे. तिकडं गेलो. नवीन प्लाॅटींग असल्यामुळे तिथंच काही बांधकामे सुरू आहेत. समोरून येताना दोन मुले दिसली. त्यांच्या पाठीवर पोताडे होते. ती कचरा वेचणारीच मुले होती. ती माझ्याकडे येत होती. ही मुलं शाळेत जात नसावीत असं मला वाटलं. त्यांना थांबवलं त्यांना त्यांचं नाव विचारलं एकाच नाव होतं समीर तर दुसऱ्याचा होतं असीफ.दुपारचे बारा वाजून गेले होते.मे महीना असल्यामुळे ऊनाचा पारा चढलेला होता. याच्या तर पायात चप्पल नव्हती. खूप वाईट वाटलं. मला बालपणीचे दिवस आठवले. गरीबीमुळं कधी चप्पल मिळाली नाही. माझ्या पायातील चप्पल त्याला दिली. त्याला सांगीतलं माझं घर जवळपास आहे.घरी मला चप्पल,बूट आहेत. ही तु घेऊन जा.परंतु मला अनवाणी करून चप्पल घेणं त्याला आवडलं नसावं. त्या दोघांची केसही खूप वाढले होते. मी त्यांना विचारलं, अरे केस का कापले नाहीत. आमच्याकडे पैसे नाहीत असं आसीफ म्हणाला. अजून एक चटका मनाला बसला. मी असीफला काही पैसे दिले. चप्पल घे.केस कापून घे.असं सांगीतलं. पहिल्यांदा तो नको म्हणत होता. पण नंतर घेतले. दोघंही शाळेत जात नव्हते. त्यांचं गावही औसाचं होतं. ती अगोदर भेटलेली महिला त्याची आई होती. आम्ही इथं झोपड्या टाकून राहतोत असं त्यानं सांगीतलं. त्यानं शाळेत जाईन असं आश्वासन दिलं. पैसाचा उपयोग वाईट गोष्टीसाठी करू नका. चप्पल घ्या. असंही सांगीतलं. समीरचे दात रंगलेले दिसले. त्यानी सांगीतले मी दिल्लगी खातो. आशिफचे दात पांढरेशुभ्र होते.


गरीबी किती वाईट असते.ती कुणाच्या वाट्याला येऊ नये. संपूर्ण कुटुंब कचरा वेचतंय. आपल्या आजूबाजूलाच ही सारी माणसं दिसतात. पण आपण आपल्याच विश्वात मग्न असतो. किती आत्मकेंद्रित होत चाललो आहोत आम्ही. मला आजूबाजूला अशी मुलं दिसली की त्यांना बोलल्याशिवाय राहवत नाही. शक्य तेवढी मदत करत असतो. त्याचं जगणं पाहून खूप वेदना होतात. सारी मुलं शाळेत यावी. समाजातला प्रत्येक घटक राष्ट्रीय प्रवाहात येण्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला हवं. समाजातला प्रत्येक घटक समृद्ध झाला तरच राष्ट्र बलवान होईल. चला शाळाबाह्य मुलांना चांगलं शिक्षण देऊया. त्यांनाही जगण्याचा, शिक्षणाचा अधिकार आहे. अशा विषयावर चित्रपट बनवता येईल. समाजातील वास्तव मांडून समाजभान जागृत करता येईल. 

2 comments:

  1. खुपच सुंदर असा लेख. खरच शिक्षण मुलभूत अधिकार आहे आणि त्यापासुन कोणी वंचित रहायला नको यासाठी आपल्या परीने नक्की प्रयत्न व्हायला हवेत.
    आपण शिक्षक म्हणुन नक्की आदर्श आहात. आपल्या या कृतीतून राष्ट्रबांधणीच्या दृष्टीने, शाळाबाह्य मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी एक सुजाण नागरिक म्हणुन अनेकजण प्रेरणा घेतील ही सदिच्छा.

    ReplyDelete