Wednesday 28 October 2020

मुलांना घडविण्यासाठी प्रयोग व कृतीशील शिक्षण

शोधनिबंध 
मुलांना घडविण्यासाठी प्रयोग व कृतीशील शिक्षण 

परिचय पत्र 
श्री.समाधान शिकेतोड,विषय सहायक,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,उस्मानाबाद.
सदस्य,मराठी अभ्यासगट,महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मीती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,(बालभारती)पुणे.
ईमेल-samadhanvs@gmail.com 
समाधान शिकेतोड हे उपक्रमशील,चिंतनशील  अध्यापक आहेत.विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सातत्यानं ते प्रयोगशील असतात.त्यांना २०१५-२०१६ सालचा महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.ते मराठी विषयासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य अभ्यासमंडळाचे सदस्यही आहेत.महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सदस्यही आहेत.विविध शैक्षणिक मासिके,वर्तमानपत्रे यामधून ते शैक्षणिक विषयावर सातत्यानं लेखन करत असतात.लहान मुलांसाठी कथा,कविता लिहितात.मराठवाडा साहित्य परिषदेचे ते आजीव सभासद असून विविध साहित्य संमेलनात ते सक्रीय सहभागी असतात.सीमावर्ती भागातील मुलांना बोलीकडून प्रमाण भाषेकडे आणण्यासाठी त्यांनी बोलीभाषा-प्रमाणभाषा शब्दकोश तयार केला आहे.मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी,समृद्धीसाठी काम करत आहेत.सध्या DIET,उस्मानाबाद येथे TECHER EDUCATOR व Language Pedogogy Expert म्हणून काम पाहत आहेत.विविध राष्ट्रीय,राज्यस्तरीय चर्चासत्रे यामध्ये सातत्यानं सहभागी होत असतात.

शोधनिबंधाचा सारांश
आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये मार्कांची स्पर्धा जीवघेणी झालेली आहे.बाल शिक्षणापासून स्पर्धात्मक वातावरणात मुलांची जडणघडण होत आहे त्यामुळे मुलांचे एकात्मिक व्यक्तिमत्त्व विकसित होत नाही. मुलांचा सर्वांगीण विकास शिक्षणातून व्हायला हवा, असे सर्व शिक्षण तज्ज्ञांनी व शिक्षण पद्धतींनी सांगितले आहे. मुलांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक, वैचारिक विकास कृतिशील शिक्षणातूनच घडून येईल.या प्रकारच्या शिक्षणाचे प्रयोग स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत काही ठिकाणी झालेले दिसतात.या प्रयोगांचे सार्वत्रिकीकरण होणे काळाची गरज आहे.तरच “एक चांगला माणूस घडविणे” हे अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट साध्य होईल.कृतिशील शिक्षण व नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्याची काळाची गरज आहे. असे रचनात्मक काम शाळाशाळांतून उभे राहायला हवे.

प्रस्तावना:- देशातील प्रचलित शिक्षण व्यवस्था इंग्रजांच्या काळात सुरू झाली. या व्यवस्थेमध्ये ब्रिटिशांना केवळ कारकून निर्माण करावयाचे होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक आयोग, समित्या यांनी शिक्षणव्यवस्थेत बदलाच्या शिफारशी सुचविल्या.त्यामुळे शिक्षण शिक्षणव्यवस्थेत काळानुसार अनेक स्थित्यंतरे आलेले दिसून येतात. भारतातील समाज धुरिणांनी शिक्षणातून एक चांगला माणूस घडावा यासाठी शिक्षण प्रक्रियेकडे बघितले. स्वामी विवेकानंद, राजा मोहन रॉय, महात्मा गांधी, गिजुभाई बधेका, ताराबाई मोडक, महात्मा फुले ते अगदी अलीकडच्या काळात जे कृष्णकुमार, नामदेव माळी, प्रतिभा भराडे या शिक्षणतज्ज्ञांनी शिक्षणातून माणूस घडावा. यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग राबविले. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक पद्धतीचे शिक्षण मुलांना द्यायला हवे. मात्र त्यांना यांत्रिक बनवून चालणार नाही. त्यांच्यातील माणूस घडला पाहिजे. संवेदनशील, सृजनशील, संशोधन वृत्तीचा चांगला माणूस घडविण्यासाठी पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत प्रयत्न व्हायला हवेत. केवळ गुणांच्या स्पर्धेतून आज पालक, समाज माणसातले चांगुलपण जपण्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे; परंतु महाराष्ट्रात आजही एकीकडे माणूस घडविणारे शिक्षण काही ठिकाणी मिळत आहे.

प्रयोगशील शाळा:- आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयोगशील शाळा आहेत.तेथे मुलांना जीवन व्यवहाराचे जगण्याचे शिक्षण मिळत आहे.विविध विषयांचे शिक्षणाचे प्रतिबिंब मुलांच्या प्रत्यक्ष जगण्यात पडायला हवे. मुलांमध्ये मूल्य,जीवन कौशल्य रुजविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन शाळाशाळांमधून करायला हवे.या उपक्रमांमधून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते.विविध शालेय स्पर्धा परीक्षा प्रज्ञावंत यांचा शोध घेतील.पण एक चांगला माणूस घडविण्यासाठी मुलांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणे गरजेचे आहे.मुलांच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण करायला हवे.आज महाराष्ट्रातील अनेक शाळांमधून मुलांना कृतिशील शिक्षण दिले जाते.तसेच अनेक विविध शिक्षण संस्थांमधून मुलांना जीवन विकासाचे धडे मिळत आहेत.केवळ घोकंपट्टी करून जीवन जगण्यासाठी आवश्यक कौशल्य मुलांना प्राप्त करता येत नाहीत.त्यासाठी प्रत्येक जीवनानुभवातून,कृतीतून, प्रकल्पामधून, क्षेत्रभेटीतून,प्रयोगांमधून विविध विषयांचे ज्ञान मुलांना स्वयंप्रयत्नातून आत्मसात करून घ्यावे लागते.

 आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण:- मुलांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्य रुजावीत, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मुलांना मिळायला हवे.यासाठी काही शाळा स्वयंप्रेरणेने धडपडत आहेत.चिकित्सक विचार,सर्जनशीलता, सहकार्यात्मक विचार,प्रभावी संप्रेषण ही कौशल्ये मुलांमध्ये रुजायला हवीत.यासाठी त्या पातळीवरचे अध्ययन अनुभव मुलांना दिले जात आहेत.मुलांना स्वतः शिकण्यासाठी प्रेरित करणे,मुलांना आव्हान देणे, विषयमित्र, जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे,शिकविण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग या बाबींवर मुलांसोबत काम सुरू आहे. काही शाळांना याचा परिणाम मिळालेला आहे.पर्यावरण विषयीचे शिक्षण प्रत्यक्ष जगणे यांच्यातून देणे.खेळासाठी मुलांना प्रेरणा,संधी उपलब्ध करून देणे.विविध भाषा शिकविणे, संगीत,नाट्य व विविध कला शिकण्याची, व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देणे, बहुविध बुद्धिमत्तेचा विचार करून मुलांना रचनात्मक अध्ययन अनुभव देणे ही उद्दिष्टे ठेऊन मुलांसोबत काम सुरु आहे. युगानुकुल, संवेदनशील, सशक्त नागरिक घडविण्यासाठी या बाबी खूप महत्वाच्या आहेत.                                                         

प्रयोगशील शिक्षक व अधिकारी:- प्रत्येक अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट एक चांगला माणूस घडविणे हेच असते.हा चांगला माणूस घडविण्यासाठी महाराष्ट्रात आणि शिक्षक व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी रचनात्मक प्रयोग केलेले आहेत.राज्यातील अनेक शिक्षकांचे रचनात्मक प्रयोग सध्या सुरू आहेत. त्यामध्ये भाऊसाहेब चासकर, विक्रम अडसूळ,नागेश वाईकर, फारूक काझी, सुनील आलूरकर, रणजीत डिसले, बालाजी जाधव, बालाजी इंगळे, फारूक काझी, प्रमोद माने, अनिता जावळे, संदीप गुंड, भरत काळे,प्रवीण शिंदे, सुप्रिया शिवगुंडे, बापुराव मोरे, सचिन भेंडभर, उमेश खोसे, अशा खूप शिक्षकांनी आपापल्या शाळेत मुलांना घडविण्यासाठी विविध रचनात्मक प्रयोग राबविले आहेत. यामधून भाषाशिक्षण, गणितशिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावरण, जीवनकौशल्य, मूल्य,संगीत शिक्षण यांचे शिक्षण मुलांना मिळाल्यामुळे मुलांचे एकात्मिक व्यक्तिमत्व बनण्यास मदत झाली. बीडमधील सोमनाथ वाळके या शिक्षकांनी स्वतःच्या शाळेत संगीत प्रयोगशाळा तयार केलेली आहे.मुले स्वतः विविध साहित्य वाजवतात, विविध गीतांचे संगीतावर गायन करतात. रणजित डिसले यांनी काही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध देशातील मुलांना वर्च्युअल ट्रीपच्या माध्यमातून एकत्रित आणून “आंतरराष्ट्रीय शांतता”या विषयावर काम केलेले आहे.बालाजी इंगळे, फारूक काझी यांचे भाषा शिक्षणाचे प्रयोग नाविन्यपूर्ण आहेत. भाऊसाहेब चासकर यांनी पर्यावरणाच्या शिक्षणाचे जीवनानुभवाचे मुलांना धडे दिलेले आहेत. चांगला माणूस घडावा यासाठी काही प्रयत्न शिक्षण विभागातील अधिकारी करताना दिसतात.यामध्ये सुजाता लोहकरे, नामदेव माळी, धनपाल फटिंग,प्रतिभा भराडे, प्रवीण काळम पाटील, तृप्ती अंधारे अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात चाकोरीच्या बाहेर जाऊन वेगळे काम केलेले आहे. सुजाता लोहकरे यांनी भाषाशिक्षणाच्या बाबतीत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले. नामदेव माळी यांनी मुलांच्या स्व अभिव्यक्ती क्षमतेचा विकास व्हावा यासाठी विद्यार्थी साहित्य संमेलन,लेखन कार्यशाळा कवितासंग्रह प्रकाशित करणे इत्यादी रचनात्मक काम केलेले आहे. मुलांना चांगले बोलता येणे,चांगले ऐकता येणे, चांगले वाचता येणे, चांगले लिहिता येणे तसेच सामाजिक समायोजन साधता येणे खूप गरजेचे असते. यासाठी भाषा शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचा विकास होत असतो. मुलांच्या भावनिक, बौद्धिक व शारीरिक विकासाचा समतोल साधणे, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी संवेदनशीलता दाखवणे. दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे या बाबी शालेय उपकारामातून विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवण्याचे काम शाळाशाळांमधून होताना दिसत आहे.

प्रयोगशील शाळा व शिक्षण संस्था:- सृजन आनंद,आनंद निकेतन, अक्षरनंदन,कमला निंबकर बालभवन अशा अनेक शाळांमध्ये मुलांना अभ्यासक्रम व पाठ्यक्रम याच्यापलीकडे जाऊन कृतिशील शिक्षण दिले जाते.रोजच्या जीवनात जीवन अनुभवातून मुले शिकत असतात.मुलांना शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या जातात.बालभवनामध्ये पर्यावरणाचे महत्त्व मुलांना पटवून देण्यासाठी पक्षीनिरीक्षण,जंगल,सहली आयोजित केल्या जातात.आज बहुतेक प्रगती फार झपाट्याने होत आहे.लोकांनी पाश्चात्त्य गोष्टींचा स्वीकार केला आहे.त्यामुळे दैनंदिन जीवन जगताना आपण पर्यावरणाला,निसर्गाला ओरडत आहोत.त्याला हानी पोहोचवत आहोत.याबद्दलची जाणीव जागृती कृतिशील शिक्षणातून मिळायला हवी. पर्यावरणाच्या सुंदर वास्तवाची जाणीव मुलांना व्हायला हवी.आपल्या देशातल्या राज्यातल्या परिसरातल्या पर्यावरणाची समज वाढायला हवी. जागतिक परिस्थिती मुलांना समजायला हवी.लहानपणापासून मुलांना निसर्ग प्रेम शिकवायला हवं.चार भिंतीच्या बाहेर कृतिशील शिक्षणातून हे सहजशिक्षण नक्कीच घडून येईल येते. आज काही प्रयोगशील शाळा त्या दिशेने पावले उचलताना दिसत आहेत. खेळ, गाणी,नृत्य, अभिनय, चित्रकला, हस्तकला, सहली, पक्षीनिरीक्षण, ट्रेकिंग, अभ्यासभेटी मुलांच्या जडणघडणीला हातभार लावतात.

मूल्यशिक्षण:- शालेय जीवनात मूल्यांची रुजवणूक होणे फार गरजेचे असते.मुलांमध्ये विविध प्रकारचे मुल्ये एखादा क्लास लावून रुजवता येत नाहीत.त्यासाठी पालक,शिक्षक,शाळा,समाज यांची फार मोठी जबाबदारी आहे.मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती करण्यासाठी मुलांना कृतिशील शिक्षणातून मूल्यांची रुजवणूक करायला हवी.यासाठी शाळा स्तरावर वेगवेगळे मूल्यशिक्षणाचे उपक्रम वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून प्रयोगशील शिक्षकांना राबवत आहेत व विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करत आहेत.कृतीशील शिक्षणामध्ये मूल्यशिक्षणाचे खूप महत्त्व आहे.

अभ्यासक्रम व कृतीशील शिक्षण:- शालेय जीवनाची सुरुवात झाल्यावर मुलांना दरवर्षी एका इयत्तेचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.अभ्यासक्रमाचे उद्दिष्टही एक चांगला माणूस निर्माण करणेच असते.या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कृतिशील शिक्षणातून विविध नाविन्यपूर्ण प्रयोगातून जर केली.तर मुलांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा विकास घडून येतो.युगानुकूल शिक्षण अभ्यासक्रमातून मिळत असते.क्षेत्रभेट,सहल,जंगलभेट,प्रयोग करणे,सृजनात्मक लेखन यासारख्या उपक्रमातून मुलांचे घडणे सुरु असते.शाळेच्या अभ्यासात खेळात इतर उपक्रमात ही मोकळी जागा कायम मोकळी ठेवायला हवी.ती मोठ्यांनी भरून टाकू नये.विनोबा भावे यांनी म्हटले आहे की “मुलांचं शिकणं जगण्यात यायला हवं,मुलांचं जगणं शिकण्यात यायला हवं”.मुलांना निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यायला हवे.शाळेतील परसबागेचा सुद्धा खूप जीवनानुभव मुलांना मिळत असतो.त्यामध्ये पिकणाऱ्या भाज्यांची किंमत त्यांनाच कळते.एखादी गोष्ट निर्माण होण्यामागचे कष्ट कळाले की मग “थ्रो अवे” या पाश्चात्य संस्कृतीपासून मुले दूर राहतात.यापासून मुलांना जपायला हवं. हे जपणे कृती शिक्षणातूनच शक्य होईल.आजची मुले मार्क मिळवण्याच्या लढाईतील आयुष्यात येणाऱ्या वादळाची झुंज देण्यास सक्षम बनत नाहीत.आयआयटी,आयआयएम अशा संस्थांमधील मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.सन २०१४  ते २०१६  या वर्षात सर्व शाळा व महाविद्यालयातील २६  हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मुलांच्या मनाला, बुद्धीला सशक्त करणारे शिक्षण अभ्यासक्रमातून मिळायला हवे.हे कृतिशील शिक्षण व विविध प्रयोगाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचे एकात्मिक व्यक्तिमत्व तयार होईल.
 
कृतीशील शिक्षणाचे प्रयत्न:- स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आजपर्यंत विविध शिक्षण तज्ञांनी,समाजसुधारकांनी कृतिशील शिक्षण देण्याचे प्रयत्न केलेले आहेत. महात्मा गांधी,स्वामी विवेकानंद, विनोबा भावे, जे.कृष्णकुमार, सानेगुरुजी, गिजुभाई बधेका, अनुताई वाघ, रमेश पानसे,नीलेश निमकर,गीता महाशब्दे, रेणू दांडेकर, मॅक्सिन बर्डसन, शोभा भागवत, मंजिरी निमकर, लीलाताई पाटील, सिंधुताई अंबिके,नामदेव माळी, प्रतिभा भराडे यांनी कृतिशील शिक्षण मुलांना दिले. विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून “चांगला माणूस” घडविण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात. या चांगल्या  प्रयत्नांचे सार्वत्रिकीकरण व्हायला हवे.उद्याची भावी पिढी सक्षम व सशक्त तयार होईल. 

संदर्भ:-
१) सारं काही मुलांसाठी, शोभा भागवत, साकेत प्रकाशन, २०१५ 
२) मुलांचे सृजनात्मक लिखाण, मंजिरी निमकर, जोत्त्स्ना प्रकाशन,२०१४ 
३) सहज शिक्षणाची प्रयोगशाळा, विनोदिनी पिटके-काळगी, आनंदनिकेतन नाशिक,२०१५ 
४) बखर शिक्षणाची, हेरंब कुलकर्णी, राजहंस प्रकाशन,२०१७ 
५) मुलांना शिकवावे लागेल, की उजेड निर्माण करता येतो, सूर्यप्रकाश नाही, लेख, दैनिक दिव्यमराठी,आनंद पांडेय,१२ डिसेंबर २०१९.
६) शिक्षणातून माणूस घडावा, लेख,दैनिक महाराष्ट्र टाईम्यस, अमित कोल्हे, ९ जून २०१७.

No comments:

Post a Comment