Thursday 11 June 2020

पाठ्यपुस्तक निर्मिती एक समृद्ध अनुभव

यावर्षी माझा मुलगा सहावीच्या वर्गात प्रवेश करतोय.मी सन २०१५-१६ यावर्षी इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये सहभागी झालो होतो.या वर्षी हे पुस्तक त्याला अभ्यासाला असणार आहे.बापानं तयार केलेल्या पुस्तकाचा अभ्यास करायला मिळतोय.याचा आनंद त्याला होतोय.या निमित्ताने पाठ्यपुस्तक निर्मितीचा प्रवास, प्रवासातले समृद्ध क्षण मांडत आहे.

मी भूम तालुक्यात जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री या शाळेवर प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होतो.एके दिवशी अभ्यासमंडळ सदस्य निवडी बाबतची जाहिरात 'जीवन शिक्षण' या मासिकातमध्ये आली होती.त्यामध्ये एक लिंक देण्यात आली होती,त्याद्वारे आवेदनपत्र सादर करायचे होते. त्यामध्ये संपूर्ण शैक्षणिक करिअरबद्दल माहिती भरायची होती.आतापर्यंत केलेलं रचनात्मक काम,संशोधन,लेखन,तज्ञ मार्गदर्शक म्हणून केलेली प्रशिक्षणे,प्रकाशित पुस्तके,शैक्षणिक अहर्ता इत्यादी बाबींचा सविस्तर तपशील भरायचा होता.मी ती लिंक भरली.राज्यभरातून खुप जणांनी लिंकद्वारे आपलं आवेदनपत्र भरलं होतं.यापुर्वी माझा मित्र प्रयोगशील शिक्षक वेच्या गावीत याने अभ्यासमंडळाबद्दल माहिती सांगीतली होती.त्याने अभ्यासमंडळ सदस्य म्हणून काम केलेले होते.तेव्हापासून अभ्यास मंडळाबद्दल माझ्या मनात खूप उत्सुकता होती.कधी तरी आपण अभ्यास मंडळ सदस्य होऊ.असं नेहमी मनात वाटायचं.राज्य अभ्यास मंडळासाठी आलेल्या आवेदन पत्रातून शोर्टलिस्टेड झाल्याबद्दल मला अभिनंदन करणारा संदेश आल्यानंतर मला खूप आनंद झाला.तो संदेश थेट शिक्षणमंत्री महोदय यांच्याकडून आल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला होता.

त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये एक लिंक आली.त्यामध्ये काही लेखी प्रश्न विचारण्यात आले.त्या प्रश्नांची उत्तरे पाठवली.नंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी,मुंबई या ठिकाणी एक कार्यशाळा संपन्न झाली.या ठिकाणी  प्रत्यक्ष मुलाखत,ग्रुप डिस्कशन घेण्यात आले.प्रत्येक फेरीत मूल्यांकन करण्यात येत होते.या कार्यशाळेतून  मराठी विषयासाठी राज्य अभ्यास मंडळात माझी नियुक्ती झाली.राज्यभरातून फक्त बारा लोकांची नियुक्ती झाली होती.यामध्ये मी एकमेव जिल्हा परिषद शाळेत काम करणारा प्राथमिक शिक्षक होतो.

पूर्वी पहिली ते आठवीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे हे अभ्यासक्रम तयार करत असे व त्यावर पाठ्यपुस्तक निर्मिती 'बालभारती'  करत असे.नववी ते बारावीचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ तयार करत असे; परंतु आता पहिली ते बारावीसाठी महाराष्ट्र राज्याचे एकच अभ्यास मंडळ तयार करण्यात आले होते.पहिली ते बारावीच्या पाठ्यपुस्तक निर्मिती राज्य अभ्यास मंडळाकडून तयार केली जाणार होती.या अभ्यास मंडळात मराठी विषयासाठी माझी निवड झाली होती.याचा मला खूप आनंद वाटत होता.त्याच बरोबर एक मोठी जबाबदारीही माझ्यावर येऊन पडली होती.

 अभ्यास मंडळ सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई,बालभारती,पुणे याठिकाणी कार्यशाळा संपन्न होऊ लागल्या.यामध्ये भाषा विषयातील तज्ञ,शिक्षण तज्ञ यांनी राज्य अभ्यास मंडळ सदस्यांना समृद्ध केले.यामध्ये निलेश निमकर,सुबिर शुक्ला अशा अनेक शिक्षण तज्ञांनी राज्य अभ्यास मंडळ सदस्यांना समृद्ध केले.या कार्यशाळांमधून संपूर्ण जगभरात तसेच भारतात कशा पद्धतीने पाठ्यपुस्तकांची निर्मिती होते.याबद्दल माहिती मिळाली.भारतातील वेगवेगळ्या राज्यातील भाषा विषयांची पाठ्यपुस्तके प्रत्यक्ष पाहायला आणि अनुभवायला मिळाली.युनेस्कोचे पाठ्यपुस्तक निर्मितीच्या संदर्भात कोणते निकष आहेत हेही अभ्यासायला मिळाले.

पाठ्यपुस्तक निर्मिती करण्यासाठी आतापर्यंत आलेल्या सर्व अभ्यासक्रमांचा अभ्यास केला.प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ चा सखोल अभ्यास केला. या अभ्यासक्रमावरच पाठ्यपुस्तक निर्मिती करण्यात येणार होती. NCF २००५,SCF २०१० यामधील तत्वे यावर चिंतन,चर्चा केली.महाराष्ट्रातील भाषा विषयाच्या स्थितीबाबत पोजिशन पेपर तयार केला.या कामाचा माझा पहिलाच अनुभव होता.त्यानंतर प्रत्यक्ष पाठ्यपुस्तक निर्मिती सुरू झाली.महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ (बालभारती) या ठिकाणी विद्या विभागांतर्गत विविध विषयांचे विभाग कार्यरत आहेत.या ठिकाणी प्रत्येक विषयासाठी विशेषाधिकारी आहेत.मराठी विभागात कामाची सुरूवात झाली.इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतची मराठी विषयाची पाठ्यपुस्तके अभ्यासली.अभ्यासक्रमानुसार पहिली ते दहावी पर्यंतच्या पाठ्यक्रमाची मांडणी केली.इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तक निर्मितीचा आराखडा तयार केला.

 बालभारतीची भव्य-दिव्य इमारत,लाखो पुस्तकांचं ग्रंथालय हे पहिल्यांदाच अनुभवत होतो. इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तक निर्मिती करताना या ग्रंथालयात अनेक पुस्तकांची पारायणे केली.आम्ही कधी कधी दिवसभर या ग्रंथालयात वाचन करत होतो.मुलांचं भाषाशिक्षण उत्तम व्हावं,विद्यार्थी भाषिकदृष्ट्या समृद्ध व्हावा.या अंगाने नाविन्यपूर्ण पुस्तकनिर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू होता.यासाठी शालेय शिक्षणमंत्री महोदय यांच्या तात्कालिन विशेष कार्य अधिकारी श्रीमती प्राची साठे यांचे मार्गदर्शन सर्व अभ्यासमंडळ सदस्यांना होत होते.बालभारतीमधील विद्या विभागाच्या विद्या सचिव श्रीमती धनवंती हर्डीकर यांनी खुप नवीन बाबी आम्हाला शिकवल्या.प्रत्येक वेळी समृद्ध मार्गदर्शन केले.मराठी विभागाच्या विशेषाधिकारी श्रीमती सविता वायळ यांच्या कल्पकतेने,मार्गदर्शनामुळे पाठ्यपुस्तक वैविध्यपूर्ण तयार झाले. 

इयत्ता सहावीच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या क्षमता प्राप्त कराव्यात हे अध्ययन अध्यापन करताना स्पष्ट व्हावे यासाठी पाठ्यपुस्तकात भाषाविषयक अपेक्षित क्षमता विधानांचा समावेश करण्यात आला होता.सहावीच्या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या भावविश्वातील पाठ व कविता निवडताना बालभारतीच्या ग्रंथालयात अनेक पुस्तकांचे वाचन केले.एका साहित्य प्रकारातील एका घटकासाठी शेकडो पुस्तके आम्ही वाचत असू.विश्वकोश,शब्दकोश,विविध मराठी मासिकांचे वाचन सुरू होते.दर महिन्याला एक तरी बैठक निश्चित होत  असे.प्रत्येक वेळी मी स्वतःसाठी व शाळेतल्या मुलांसाठी वाचनसाहित्य घेऊन येत असे.

भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण स्वाध्याय,प्रकल्प,कृती तयार केल्या.भाषेचे व्याकरण समजून घेणे तसं मुलांच्या दृष्टीने अवघड भाग आहे; परंतु या पाठ्यपुस्तकांमध्ये 'आपण समजून घेऊया', या शीर्षकाखाली व्याकरण घटकांची सोप्या पद्धतीने मांडणी केली. पहिल्यांदाच इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनीची 'झाड' ही कविता या पाठ्यपुस्तकात घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कवितांचे कवितासंग्रह प्रकाशित झालेले होते. माझ्याही शाळेतील अनेक विद्यार्थी खूप सुंदर सुंदर कविता करत होते.महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांची बालसाहित्य संमेलने संपन्न होत होती.त्यामुळे विद्यार्थ्यांची कविता पाठ्यपुस्तकात असायला हवी हा विषय नेटाने पुढे घेऊन गेलो. 

'खेळूया शब्दांशी', 'विचार करून सांगू या,' 'भाषेची गंमत पाहूया', 'शोध घेऊया', 'हे करून पहा', 'सारे हसुया', 'ओळखा पाहू या', शीर्षकाखाली अनेक कृती या पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या असून त्यामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षणक्षमता, सर्जनशीलता,कृतिशीलता वाढण्यास मदत होणार आहे.
पाठ्यपुस्तकं व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पाडतात.आजही आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकातील अनेक व्यक्तिमत्त्वाचा आपल्या जीवनावर प्रभाव पडलेला दिसून येतो.त्या काळातील कविता ऐकल्या की आपल्याला आजही ही आनंद वाटतो.त्यामुळे पाठ्यपुस्तकांशी आपण जोडले गेलेलो असतो.अशा पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्याचं  एक आव्हान असतं.या पाठ्यपुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला समृद्ध होता आलं.खूप काही नवीन शिकता आलं.याचं खूप मोठं समाधान आहे. 

क्यू.आर.कोड चा उपयोग पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात आला होता.पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन अनेक संदर्भ स्त्रोत वापरून भाषिक अंगाने समृद्ध होता यावं यासाठी अनेक लिंक,उपक्रम,कृती या पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेले आहेत.या पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी वर्षभरातील बराच वेळ मी दिला होता.जेव्हा पाठ्यपुस्तक तयार होऊन आलं तेव्हा मात्र खूप आनंद झाला.महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना,पालकांना भाषा अभ्यासकांना पाठ्यपुस्तक खूप आवडलं होतं.या पाठ्यपुस्तकावर खूप छान छान समीक्षणे वर्तमानपत्रांमध्ये आले होती.

पाठ्यपुस्तक निर्मिती करत असताना मराठी भाषा तज्ञ समितीमधील या समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध साहित्यिक श्री.नामदेव चं. कांबळे, प्रसिद्ध साहित्यिक तथा ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो,मराठी भाषेच्या अभ्यासिका डॉ.स्नेहा जोशी यांच्यासारख्या तज्ञ मंडळी,मराठी भाषा अभ्यासगटातील सदस्य यांच्या  सहवासात स्वतःला समृद्ध होत आले. इयत्ता सहावीसाठी बालभारती,सुलभारती,सुगमभारती अशा तीन मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली होती. पुस्तक निर्मितीचा प्रवास स्वतःला समृद्ध करणारा होता.
                                             ©️ समाधान शिकेतोड

28 comments:

  1. आर्यनसाठी हा जीवनातील एक अनमोल ठेवा असेल.बापाच्या उत्तुंग भरारीचा अभिमान त्याला नक्कीच समृद्धबनवेल.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सरजी.

      Delete
    2. छान अनुभवकथन केलेत. खरंच कृतार्थ वाटणारा अनुभव

      Delete
    3. छान अनुभवकथन केलेत. खरंच कृतार्थ वाटणारा अनुभव

      Delete
  2. समृद्ध अनुभव... बालभारतीत काम करायला मिळणं हा सन्मानच असतो. या सन्मानाला योग्य न्याय दिलाय तुम्ही. तुमचा अभिमान वाटतो मला. अभिनंदन आणि शुभेच्छा...

    ReplyDelete
  3. धन्यवाद सरजी

    ReplyDelete
  4. खूप छान अनुभव बालभारतीत काम करायला मिळाले. हा निश्चित च तुमचा सन्मान आहे. खूप खूप अभिनंदन सर

    ReplyDelete
  5. आम्हाला सर्वांना तुमचा खूप अभिमान आणि कौतुक वाटते 😊💐

    ReplyDelete
  6. धन्यवाद अजित

    ReplyDelete
  7. खूप छान प्रवास मांडलख समाधान सर.. अभिनंदन....

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद सर.

      Delete
  8. खुप छान अनुभव सर, अभिनंदन ! मुलाला तुमचा खुप आनंद व अभिमान वाटेल.

    ReplyDelete
  9. हॅलो समाधान भाई आपने तो सबका समाधान कर दिया आपके लिये मेरे तरफ से बहुत बहुत शुभकामना आपका मंगल हो

    ReplyDelete
  10. खुपच सुंदर अनुभव !!
    अभिनंदन!!
    💐💐

    ReplyDelete
  11. खुपच सुंदर अनुभव !!
    अभिनंदन!!
    💐💐

    ReplyDelete
  12. छान अनुभव कथन केले आहे.
    संधीच सोन केलं.अभिमान वाटतो.
    अशीच आपली प्रगती होवो, हीच शुभेच्छा.

    ReplyDelete
  13. Really great Sir ! You deserve it sir !

    ReplyDelete
  14. खूप खूप छान अनुभव कथन केले आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  15. सरमकुंडी गावासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. समाधान आपले खूप खूप अभिनंदन

    ReplyDelete
  16. सरजी आपले अभिनंदन !
    आमच्या जिल्ह्यातील आपण असल्याचा सार्थ अभिमान वाटतो . मुलगाही नशीबवान आहे . इयत्ता सहावीचे पुस्तक दर्जेदार आहे . पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा !

    ReplyDelete