Monday 22 June 2020

गोष्ट गुरुजी घडण्याची

आपल्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत तो शिक्षक होतो. चाकोरीच्या बाहेर जाऊन,स्वतःला समृद्ध बनवत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवितो.यंत्रणेतल्या चाकोरीला दोष देत बसण्यापेक्षा स्वतः सक्रिय होऊन अर्थपूर्ण शिक्षणाच्या वाटा धुंडाळतो.मनाशी ठरवलं तर प्रत्येकाला आपले आयुष्य असं घडवता येऊ शकतं हे सांगणारी एका प्रयोगशील गुरुजीच्या घडण्याची गोष्ट.

प्रल्हाद काठोळे यांच्या 'गोष्ट गुरुजी घडण्याची' हे पुस्तक वाचण्याची खूप दिवसापासूनची उत्सुकता होती. उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये हे पुस्तक घेतले व वाचून काढले.तसं हे एका प्रयोगशील,संवेदनशील  शिक्षकाचं आत्मकथनचं आहे.प्रल्हाद काठोळे यांचा स्वतःला शिक्षक म्हणून घडवण्याचा प्रेरणादायी प्रवास मनाला खुप  भावला.

सह्याद्रीच्या कुशीत आणि तानसा अभयारण्याचा राखीव क्षेत्रात,वाडा आणि शहापूर तालुक्याच्या सीमेवर वसलेलं दाढरे लेखकाचं गाव. लेखकाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं.लेखक सांगतात की भात लावणीच्या काळात तर घरात खायला काहीच नसायचं अनेकदा दादा परसातल्या काकड्या खाऊन दिवस काढायचा आणि शेतात काम करत राहायला पण तशाही अवस्थेत लहान भावंडांनी शिकावं असं त्याला मनापासून वाटायचं. सहावी ते दहावीचे शिक्षण नवोदय विद्यालयात झालं.प्रथम श्रेणीत सीबीएससी बोर्डातून दहावी उत्तीर्ण केली.त्यानंतर नवोदय विद्यालयातचं १२ वीला प्रवेश घेतला पण बारावी नापास हा शिक्का बसला.पुन्हा तालुक्याच्या काॅलेजात पुनर्प्रवेश  घेऊन बारावी व त्यानंतर डीएड पूर्ण केलं.मधल्या काळात पडेल ती कामे केली.भावासोबत कलिंगडाची शेती केली.आईसोबत भाजीविक्री केली.सुट्टीत मामासोबत शाळेला रंग देण्याचे काम केले.

शिक्षक म्हणून पहिली नियुक्ती जि.प.प्रा.शाळा घायपातपाडा येथे मिळाली.ही दोन वर्गखोल्या असलेली दोन शिक्षकी शाळा होती.वारली अदिवासी समाजाचा पाडा होता.इथंली मुलं म्हणजे जंगलची पाखरं.ही सगळी वारली मुलं जंगलात भटकायची.घरच्या बक-या,गायी चारायला न्यायची.हंगामानुसार मिळणारी फळं शोधत हिंडायची.या मुलांची उपस्थिती वाढावी म्हणून स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुलांना मोफत गणवेश दिले.केंद्रशाळेतील मुलींचा कबड्डीचा संघ तयार करून राज्यस्तरावर नेला.कमी वयात होणारी मुलींची लग्न,कुपोषण यावर काम केले.लेखकाने अनुभवातून,चिंतनातून प्रत्येक मुलं समजून घेत नाविन्यपूर्ण प्रयोग केले.पर्यवेक्षिय यंत्रणेसंबंधीचे अनुभव,स्वतःच्या जुन्या धारणा याबद्दल लेखक प्रामाणिकपणे सांगतात.

पुढे गावाजवळील घाटाळपाड्याला बदली झाली.इथेही वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.जवळचं क्वेस्ट नावाची संस्था मुलांसाठी काम करायला लागली होती.त्यांचा 'बालभवन' नावाचा उपक्रम सुरू होता.क्वेस्टचे संचालक शिक्षणतज्ञ निलेश निमकर यांनी परिसरातील शिक्षकांचा अभ्यासगट तयार केला. इथं लेखकाला मुलांसोबत काम करण्याची दिशा मिळाली.अभ्यास गटांमध्ये वर्गात शिकवताना येणाऱ्या अडचणीवर चर्चा व्हायची.त्यासाठी वर्गातल्या गुणवत्तापूर्ण कामाच्या संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पाचे अहवाल समजून घेतले जायचे. अभ्यासगटात गणित,भूगोलतल्या संकल्पना, समजून घेतल्या. त्या पद्धतीने वर्गात मुलांसोबत काम केले. जुन्या धारणा गळून पडून नवीन प्रगत शिक्षणशास्त्राची ओळख लेखकाला होत गेली. लेखकाला ' अरविंद गुप्ताच्या कार्यशाळेत जाण्याची संधी मिळाली. विज्ञान खेळणी समजून घेऊन त्याच्या मदतीने मुलांसोबत काम केले. अभ्यासगटाच्या मदतीने पर्यावरणाशी संबंधित उपक्रमही राबविले.मुलांच्या शिक्षणाबाबत समज निर्माण व्हायला या अभ्यासगटाचा लेखकाला खूप फायदा झाला. पुढे अनेक प्रकल्प राज्य व राष्ट्रीय स्तरावर गेले.

लेखकाने अभ्यास गटाच्या प्रेरणेने 'मास्टर्स इन एलिमेंटरी एज्युकेशन' हा हा अभ्यासक्रम पूर्ण केला. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या या अभ्यासक्रमाला देशभरातून काही मोजक्याच लोकांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना आलेले समृद्ध अनुभव लेखकाने सांगितले आहेत.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये सहभाग घेतला. 'सारखी वाटणी' हा अपूर्णांकाचा अर्थ मुलांसाठी अधिक सहज असल्यामुळे शिकवताना त्याचा वापर नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर केला. याचा नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये सामावेश झाला. साध्या शिक्षकाने केलेल्या पद्धतशीर आणि शिस्तबद्ध कामाचा उपयोग राज्यपातळीवर होऊ शकतो.शाळा ही फक्त ज्ञानदानाचं केंद्र न राहता ज्ञान निर्मितीचे केंद्र होऊ शकते.याचं हे उत्तम उदाहरण. मित्राच्या  मदतीने दाढरे या स्वतःच्या गावात मुलांसाठी माध्यमिक शिक्षणाची सोय करून जीवनानुभवातून शिक्षण देणारे अनेक प्रयोग ते शाळेत राबविले.  

२००३ मध्ये ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू  झाले.क्वेस्ट या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमुळे झालेली समृद्धी आणि 2012 मध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून प्राथमिक शिक्षण घेतलेले पदव्युत्तर शिक्षण यामुळे या सामान्य शिक्षकांच्या शिक्षण विषयक विचारात सकारात्मक बदल घडत गेले. या बदलातून त्यांनी विविध शिक्षण विषयक प्रयोग प्रत्यक्षात आणले. २०१३ मध्ये त्यांनी 'एपिस्टेमी ५ ' या आंतरराष्ट्रीय गणित परिषदेत त्याचं संशोधन हे प्रसिद्ध झालं होतं. हे प्रेरणादायी अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी 'ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन' मुंबईने त्याने एका वर्ष मुदतीचे पाठ्यवृत्ती दिली त्यातूनच  गुरुजी घडण्याची गोष्ट हे सांगणारे पुस्तक प्रत्यक्षात आला आहे. या पुस्तकातील अनुभव प्रेरणादायी आहेत.शिक्षणक्षेत्रातील प्रत्येकानं हे पुस्तक वाचायला हवंच.

आमचं भाषाशिक्षणासंदर्भातील एक संपर्कसत्र क्वेस्टचं मुख्यालय सोनाळे येथे संपन्न झाले होते. त्यानिमीत्ताने प्रल्हाद काठोळे यांच्या दाढरे या गावी जाण्याचा योग आला होता.शिक्षणातील नाविन्यपूर्ण प्रयोगाबाबत आम्ही नेहमीच चर्चा करत असतो.विद्यार्थ्यांच्या हितासाठी अविरतपणे झिजणा-या मित्राचा अभिमान वाटतो.

पुस्तक परिचय 
पुस्तक- गोष्ट गुरूजी घडण्याची 
लेखक- प्रल्हाद काठोळे 
प्रकाशन- समकालीन प्रकाशन,मुंबई. 
किंमत- १५० रूपये
पुस्तक परिचय- समाधान शिकेतोड
┄─┅━━▣▣▣━━┅─┄

5 comments:

  1. शिक्षण क्षेत्रातील एक प्रेरणादायी प्रवास

    ReplyDelete
  2. खूप छान वर्णन व लेखन सर

    ReplyDelete
  3. हे पुस्तक मी अजून वाचलेले नाही, प्रल्हाद सर आमचे खूप चांगले मित्र आहेत, हे पुस्तक माझ्या मुलांसाठी मुलांसाठी मी घेणार आहे, आपल्या परिचयातील व्यक्तीच्या आयुष्यातील समस्या आणि त्यातून मार्ग काढून स्वतःचे आयुष्य आणि समाज प्रगल्भ करणारा प्रवास माझ्या मुलांना नक्की भावेल असे मला वाटते

    ReplyDelete
  4. खूप प्रेरणादायी आहे.

    ReplyDelete
  5. खूप प्रेरणादायी लेखन आहे.

    ReplyDelete