Saturday 27 June 2020

चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये,म्हणून !

माणसाला आयुष्यातला प्रत्येक क्षण समृद्ध करत असतो, फुलवत असतो. आपण सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यासारख्या गोष्टीच्या मागं धावताना  असं समृद्ध होणं,फुलणं विसरून जात असतो.जीवनाचे महत्त्व समजून आपण प्रत्येक क्षण मनापासून जगावा,यासाठी डॉ.आ.ह.साळुंखे यांनी जीवनाचं हे साधं,सरळ तत्वज्ञान आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगातून,अनुभवातून 'चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून!' या  पुस्तकातून मांडलेलं आहे.

बऱ्याच दिवसापूर्वी 'चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून!' हे डाॅ.आ.ह.सांळुखे यांचे पुस्तक प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी हे पुस्तक मला भेट दिले होते. पुस्तक छोटं असल्यामुळे एका दमात वाचून काढले.हे पुस्तक आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते. या पुस्तकामध्ये  लेखकाने आपल्या जीवनातील जगणं समृद्ध करणारे अनुभव,प्रसंग मांडलेले आहेत. 

लेखक सांगतात की पहिल्यांदा कन्याकुमारीला गेलो.भारतभूमीच्या दक्षिण सिमेवरील अखेरच्या भिंतीवर उभा होत तेव्हा तीन समुद्राच्या लाटा मला भिजवून चिंब चिंब करीत होत्या. हा प्रत्यक्ष अनुभव घेताना मी खरोखरच शहारून गेलो होतो. तो माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण होता. पण मी एकोणसाठाव्या वर्षाऐवजी एकोणिसाव्या वर्षी कन्याकुमारीला जायला हवं होतं,असं लेखकाला वाटतं.

लेखक सांगतात की आपल्या मालकीच्या वस्तूंची संख्या वाढून आपलं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होत नाही वस्तू मिळवण्याच्या नादात आपण जीवन जगण्याचं विसरून जाण्याचा धोका असतो. आपण आपलं अनुभवविश्व किती संपन्न केलं.आपल्याला सच्ची मैत्री किती मिळाली.आपण इतरांना किती जीव दिला. इतरांची किती कदर केली. इतरांना वाढवण्यासाठी किती आधार दिला. किती जणांच्या अश्रू पुसले. आपण अश्रू ढाळत असताना ते पुसण्यासाठी आसपास किती लोक होते. यांसारख्या गोष्टीचा हिशोब करून आपल्या जीवनाची समृद्धी मोजावी. वस्तूवर मालकी मिळवणं पुरेसं नाही,अत्यावश्यक नाही - त्या वस्तूसह वा प्रसंगी त्या वस्तूंच्या अभावीही जीवन उत्कटपणानं जगता येणं महत्त्वाचा आहे. जीवनाचा खराखुरा आनंद घेणं,जीवन अनुभवणं हा 'एरिक फ्राॅम' या मानसशास्त्राज्ञाचा  संदेश लेखक सांगतात.

लेखकांनी वरिष्ठ महाविद्यालयात बरीच वर्षे  संस्कृत विषयाचे अध्यापन केले. लेखक प्रसिद्ध विचारवंत,व्याख्याते,प्रसिद्ध साहित्य आहेत. सॉक्रेटिस,चार्वाक,पाणिनी यांच्या समृद्ध जीवन जगण्याची उदाहरणे लेखक सांगतात.विवेकवादी विचारांवर ठाम राहून आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहणारा सॉक्रेटिस,मानवजातीला ज्ञानाचा नवा प्रकाश मिळावा,तिचं माणूसपण उन्नत व्हावं.यासाठी ज्ञानाचा एक एक कण  मिळविण्यासाठी कसं झोकून द्यावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध व्याकरणकार 'पाणिनी'. पाणिनी यांच्या समृद्ध जगण्याची उदाहरणे माणसाला समृद्ध बनवतात.

जीवन जगताना,अगदी सर्वसामान्य माणसं ही अनेकदा आपल्याला केवढा उज्वल प्रकाश आणि किती निर्मळ दृष्टी देऊन जातात.याबाबतचे प्रसंग लेखक सांगतात. माणसाच्या आयुष्यात चढ-उताराचे यश अपयशाचे अनेक प्रसंग येतात.चढापेक्षा उताराचा प्रवास क्लेशकारक वाटायला लागतो. अपयश पचवताना वेदना होतात;परंतु अशावेळी मनाचं संतुलन राखायला हवं.आपली जागा घेणा-या व्यक्तीमध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहू शकतो. ती व्यक्ती आपलाच प्रवाह अखंडित ठेवण्याचे काम करीत आहे.असं मानून तिचं आपण अभिनंदन करू शकतो. ज्याला जीवनाच्या उताराचा हा प्रवास आनंदानं,समाधानानं आणि उमेदीने करता येतो.त्यालाच जीवन खर्‍या अर्थाने कळलं असं म्हणता येतं! याबद्दलचा केरळ मधील एक अनुभव खूप छान पद्धतीने लेखकांनी मांडलेला आहे.

लेखक सांगतात की जीवन हे या विश्वातले किती सुंदर घटना आहे.हा या विश्वाच्या समग्र अस्तित्वाचा किती पवित्र आणि मंगल घटक आहे. या जीवनाला आधार देणार आपल्या शरीराचं हे इवलसं घरटं हे आनंदाचं केवढं प्रसन्न अधिष्ठान आहे! त्या घरट्याचा भाग असलेले निर्मळ मन आणि विवेकी बुद्धी हे सजीवाचं आणि खास करून माणसाचं केवढं मोठं वैभव आहे!

लेखकांनी त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी घटना सांगितलेल्या आहेत. छोट्या छोट्या घटना,प्रसंग माणसाच्या जगण्याला कसे समृद्ध बनवतात. याचे मनाला भावणारे वर्णन लेखकांनी केले आहे. जगण्याचं साध तत्वज्ञान सागणारं हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं.

पुस्तक-चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून!
लेखक-डाॅ.आ.ह.साळुंखे 
प्रकाशन-ॠतुश्री प्रकाशन,बीड.
मुल्य- ५० रूपये.
पुस्तक परिचय- समाधान शिकेतोड 
www.shikshansanvad.in
┄─┅━━▣▣▣━━┅─┄

6 comments:

  1. समाधान सर पुस्तक परिचय खूप छान करून दिलात. आपले मनःपूर्वक अभिनंदन!!!������

    ReplyDelete
  2. खूप सुंदर परीक्षण।पुस्तक वाचायलाच पाहिजे

    ReplyDelete
  3. छान विवेचन समाधानजी

    ReplyDelete
  4. खूप छान परीक्षण

    आपलेही लेखन उत्तम आहे. 👌👌👍

    ReplyDelete
  5. खूप छान पुस्तक परिचय 👍👌 आ. ह. साळुंके सरचे लेखन👌👌

    ReplyDelete