Tuesday 27 October 2020

शिष्यवृत्ती परिक्षेत शंभर टक्के निकालाचा नवा पायंडा

 प्रयोगशील शिक्षक,प्रयोगशील शाळा 

लेख क्रमांक-१

शिष्यवृत्ती परिक्षेत शंभर टक्के निकालाचा नवा पायंडा


मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करणारे सेवाव्रती, प्रयोगशील शिक्षक श्री.बापुराव मोरे.जि.प.प्राथमिक शाळा कदमवाडी या शाळेत कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प, उपक्रम राबवित असतात. नुकत्याच जाहिर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत त्यांच्या शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी पात्र झाले आहेत.त्या निमित्ताने.....


उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यापासून वीस कि.मी अंतरावर जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंतची  कदमवाडीची शाळा आहे. गेल्या दहा वर्षापासून उपक्रमशील शिक्षक श्री. बापूराव मोरे हे या ठिकाणी कार्यरत आहेत. गावात प्रवेश केला की जिल्हा परिषदेची ही शाळा लक्ष वेधून घेते.शाळेच्या बोलक्या भिंती,अध्ययन समृद्ध वातावरण मनाला भावते.मुले शाळेच्या वातावरणात,परिसरात रमून जातात.त्यांना घरी जावेसे वाटत नाही.या शाळेत मुलांना आनंददायी रचनात्मक पद्धतीने शिक्षण दिले जाते.

श्री.बापूराव मोरे हे सातत्याने मुलांच्या शिकण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात.सतत नवनवीन बाबी शिकून  स्वत:ला समृद्ध करत असतात.मुलांच्या शिकण्यातील अडचणी शोधून त्या दूर करतात.विशेष गरजा असणाऱ्या मुलांना शालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपडत असतात.त्यांनी गावकरी,सहकारी शिक्षक,पर्यवेक्षीय अधिकारी यांच्या मदतीने शाळेचा सर्वांगीण विकास घडवून आणला. त्यांनी शाळेचा चेहरा मोहराचं बदलून टाकला आहे. राज्यभरातील शिक्षक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी यांनी या शाळेला भेट दिलेली आहे. या शाळेत मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्यामुळे सातत्याने शाळेचा पट वाढलेला आहे. वीस पटावरून आता त्रेसष्ट पट झालेला आहे. 


१) शाळेतील अध्ययन समृद्ध वातावरण:- मुलांच्या शिकण्याला शालेय वातावरण पूरक व चेतक असायला हवे.त्यामुळे मुलांना शिक्षण्याच्या संधी सहज उपलब्ध होतात.मुलांचे शिकणे सुरु राहते.या  शाळेचे शालेय वातावरण अध्ययन समृद्ध आहे. शाळेच्या भिंतीवर मुलांना आवडणारी चित्रे काढलेली आहेत.भिंतीवर थ्रीडी चौरस काढलेले असून त्यात वेगवेगळी अक्षरे सुटी सुटी दिलेले आहेत.त्या अक्षरापासून विद्यार्थी प्राणी, पक्षी, शोधातात. भिंतीवरील चित्राचे वर्णन करतात.चित्रावरून गोष्ट लिहितात. संवाद लेखन करतात.मुलांना लिहण्यासाठी बोलफलकही आहेत.मुले बागेतील फुले मोजतात.परिसरातील झाडे, वेली यांचे निरीक्षण करतात. सर्व मुलांना अध्ययन निष्पत्ती प्राप्त व्हाव्यात यासाठी बापूराव मोरे प्रयत्नशील असतात.

२) ई लर्निंग:- शाळेत लोकसहभागातून ई-लर्निंग आहे. ई लर्निंगसाठी विविध सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो.मुलांना अवघड संकल्पना,संबोध शिकविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर शाळेत केला जातो. मुले स्वतः शाळेतील संगणक हाताळतात. वेगवेगळी शैक्षणिक  व्हिडिओ पाहतात. शिक्षकांनी स्वतः विविध संकल्पनांवर पीपीटी बनविल्या आहेत. ई लर्निंगच्या माध्यमातून विविध गाणी, गोष्टी शैक्षणिक व्हिडिओ मुलांना दाखवले जातात.मुले इंटरनेटवर विविध संदर्भ शोधतात.

 ३ ) शैक्षणिक साहित्य: - वर्गातील वातावरणही अध्ययन समृद्ध आहे. श्री बापूराव मोरे यांच्या संकल्पनेतून अनेक  शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आलेले आहे. शाळेतच लॅमिनेशन मशीन आहे. त्यामुळे अध्ययन निष्पत्ती निहाय  विविध  संकल्पनांवर आधारित शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहे. यामध्ये शब्द चक्र, शब्द तक्ते, भाषिक कोडी, स्वध्याय तक्ते, मातीचे मणी, मण्याच्या दशक माळा फ्लॅश कार्ड इत्यादी खूप शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आलेले आहे. या साहित्याच्या आधारे विद्यार्थी गटागटांत बसून स्वयं अध्ययन करतात. वर्गात मुलांचे गट केलेले आहेत. 

४) लोकसहभागातून शाळासमृद्धी:-  लोकसहभागातून शाळा समृद्ध केलेली आहे. शाळेला आय.एस.ओ.दर्जा मिळालेला आहे. तसेच शाळा सिद्धी कार्यक्रमात शाळा “अ” श्रेणीत आलेली आहे. शाळेच्या भौतिक सोयी-सुविधा,रंगरंगोटी, वर्गातील वातावरण अध्ययन समृद्ध आहे. शाळेत गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आहे. परसबाग, हॅडवॉश स्टेशन,सौर उर्जेचा वापर,पिण्याचे स्वच्छ पाणी,पावसाच्या पाण्याचे जलपुनर्भरण, उत्पादक परसबाग अशा सोयीसुविधा लोकसहभागातून केलेल्या आहेत.गावातील लोकांचे उत्तम सहकार्य,मदत मिळते.आपली शाळा स्वच्छ व सुंदर राहावी यासाठी सर्वांच्या मदतीने ते विविध उपक्रम राबवीत असतात.  

५)  मुलभूत क्षमता विकास:- प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व विषयातील मुलभूत क्षमता प्राप्त व्हाव्यात.यासाठी विशेष प्रयत्न केले  जातात.पहिलीतील सर्व मुले पहिलीतच वाचू लिहू लागतात. शाळेतील सर्व विद्यर्थ्यांच्या मुलभूत क्षमता प्राप्त आहेत.त्यासाठी गट पद्धतीने अध्ययन अनुभव देणे,अध्ययन समृद्धी पेटीचा वापर,विविध शैक्षणिक साहित्याचा वापर,तंत्रज्ञानाचा वापर यामुळे सर्व मुलांना मुलभूत क्षमता प्राप्त होण्यास मदत झालेली दिसून येते.पहिली,दुसरीची मुले कोटीपर्यंतच्या संख्येचे वाचन करतात. अभ्यासात चांगली गती असणारी मुले गती कमी असणाऱ्या मुलांना मदत करतात.सहध्यायीकडून मुले खूप चांगल्या प्रकारे शिकतात. 

६) शिष्यवृत्ती परीक्षा:- दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेची खूप चांगली तयारी करून घेतली जाते.यासाठी वर्षाभरचे नियोजन केले जाते.मंगरूळ बीटचे प्रयोगशील शिक्षण विस्तार अधिकारी श्री.मल्हारी माने यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली  बीट स्तरावर “मिशन शिष्यवृत्ती” हा प्रकल्प राबविला जातो. यामध्ये श्री.बापूराव मोरे यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यामुळे दरवर्षी शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जिल्ह्याच्या सरासरी निकालापेक्षा जास्त असतो. यावर्षी तर शंभर टक्के विद्यार्थी या परीक्षेत पात्र झालेले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेतील यश प्रेरणादायी आहे.

मुलांना अध्ययन निष्पत्ती प्राप्त व्हाव्यात यासाठी दर्जेदार अध्ययन अनुभव दिले जातात.मुलांच्या अभिव्यक्तीचा विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.मुले छान लेखन करत आहेत.यामधून मुलांच्या सर्जनशीलतेचा विकास होत असतो.मुलांना प्रत्यक्ष जगण्यातले अनुभव मिळावे.यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते.अनुभवातून,प्रयोगातून शिकण्याच्या संधी मुलांना शाळेत प्राप्त होत असतात. सध्या ऑनलाईन पद्धतीने मुलांचे शिक्षण सुरु आहे. मुलांना स्वयंअध्यनासाठी संदर्भ साहित्य दिले जाते.मुलांचे लहान लहान “अभ्यासगट” तयार केलेले आहेत. स्वत:ला समृद्ध करत करत मुलांना घडविण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.







No comments:

Post a Comment