Monday 26 October 2020

मुलांचे बोलणे आणि भाषा विकास


मुलांना बडबड करू नका,गप्प बसा. एकमेकांशी बोलू नका. अशा नकारात्मक दृष्टीने शाळांमध्ये बोलण्याकडे बघितले जाते.कुणी बोलत असेल तर शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करीत आहे. असे गृहीत धरले जाते. त्यामुळे मुले बोलताना दिसली की आपल्याला त्यांना गप्प करावेसे वाटते. शिक्षक व विद्यार्थी आंतरक्रिया घडताना त्यांना बोलण्याची मुभा असते.

आपण दैनंदिन जीवन जगत असताना जास्तीत जास्त बोलण्याचा वापर आपण करत असतो. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या उद्देशाने आपण बोलत असतो. शाळेत मात्र मुलांच्या लेखन वाचनावर सर्वात जास्त भर असतो. तो मुलांचा मौखिक विकासच वाचन लेखनाची पूर्वतयारी असते परंतु मुलांच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.

शाळेत येण्या अगोदर मुल घर कुटुंब व परिसरात मनमोकळेपणाने बोलत असतं. त्याठिकाणी मुलांच्या बोलण्याचे कौतुकही होत असते. यामुळे मुलांचे भाषाशिक्षण नैसर्गिक पद्धतीने सुरू असते. जेव्हा मूल पहिली मध्ये येते. तेव्हा मात्र त्याच्या बोलण्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. मूल शाळेत येताना आपली घरची भाषा घेऊन येत असते. अशावेळी त्याला त्याच्या घरच्या भाषेतून व्यक्त होण्याच्या संधी शाळेत निर्माण करायला हव्यात. त्याच्या घरच्या भाषेचा सन्मान करायला हवा. शिक्षकाने किमान संवाद साधण्यापूर्वी तरी मुलांची भाषा शिकायला हवी. त्यामुळे मुलांशी त्यांच्या घरच्या भाषेतून शिक्षकांना संवाद साधता येईल.

शाळेमध्ये मुलांना बोलण्याच्या व्यक्त होण्याच्या संधी निर्माण करण्यासाठी छोट्या-छोट्या कृती शाळेत घ्यायला हव्यात. मुलांचा मौखिक विकास करण्यासाठी पुढील कृती शाळेमध्ये घेता येतील.

१) गप्पा गोष्टी:-मुलांसोबत औपचारिक व अनौपचारिक गप्पा गोष्टी करता येतील. यामुळे पाहिलेले अनुभवलेले प्रसंग घटना इत्यादीवर विचार करण्याची सवय विकसित होईल. स्वतःचे विचार, निरीक्षणे योग्य शब्दात मांडण्याचा प्रयत्न होईल मुलांचा आत्मविश्वास वाढेल.

२)कृतीयुक्त गाणी,म्हणी:-मुलांच्या परिसरातील कृतीयुक्त गाणी तालासुरात व अभिनयासह म्हणून घ्यायला  हवीत. गाण्यांचा संग्रह करायला हवा यामुळे मुलांना तालबद्धतेचा आनंददायी अनुभव मिळेल. भाषेतील ध्वनीतील जाण विकसित होण्यास मदत होईल.

३) अपूर्ण गोष्ट पूर्ण करणे:-मुलांना दोन तीन वाक्य सांगून पुढील गोष्ट पूर्ण करण्यास सांगावे. गोष्टीत छोटी छोटी वाक्य असावीत.भाषा सोपी असावी यामुळे मुले अंदाज करतील, घटनाक्रम समजून घेतील.

४) चित्र मालिकेवरुन गोष्ट तयार करणे:- अध्ययन समृद्धी साहित्य संच पेटीत चित्रमालिका दिलेल्या आहेत. अशा चित्रमालिका शिक्षक ही स्वतः तयार करू शकतात. या चित्र मालिकेवरुन मुलांना गोष्ट सांगण्यास लावावी. यामुळे ऐकलेले प्रसंग, घटना यांची क्रमबद्ध मांडणी करण्याची स्वतःच्या भाषेत सांगण्याची संधी मिळेल.

५) खेळ:- मुलांना खेळायला खूप आवडतो. या खेळातून मुलांचे शिकणे आपसूकच घडत असते. वन मिनिट शो, शब्द भेंड्या,  दिलेल्या शब्दावरून वाक्य सांगणे, थीमच्या संदर्भातील शब्द लिहिणे. असे अनेक खेळ मुलांच्या मौखिक भाषा विकासासाठी आपल्याला घेता येतील.यामुळे मुलांना  वन मिनिट शोमध्ये योग्य शब्दांची निवड करून दिलेल्या विषयावरील पूर्वानुभवाच्या मदतीने बोलण्याची सवय लागेल. त्यामुळे विचारांना चालना मिळेल, अंदाज बांधता येईल वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करणे शक्य होईल.

६)चित्रवाचन,चित्रवर्णन,चित्रगप्पा:- मुलांना चित्रे खूप आवडतात. मुलं चित्रावर बोलती होतात.मुलांच्या भावविश्वातील परिसरातील चित्रांची निवड चित्रवर्णनासाठी करायला हवी. या चित्रांच्या मदतीने मुलांना स्वतःच्या अनुभव, निरीक्षणे सांगण्यास प्रवृत्त करता येईल. या कृती सामूहिक गटात व वैयक्तिक घेता येतील.या कृतीमुळे निरीक्षण करणे व ते पूर्वानुभव जोडणे,कल्पना करणे याची संधी मिळेल.

७) अनुभवकथन:-मुले घडलेल्या घटना, प्रसंग शाळेत आवडीने सांगतात.हे सांगण्यासाठी पूरक वातावरण शाळेत निर्माण करायला हवे . अशा प्रकारच्या अनेक कृती वर्गांतर क्रियेत घेता येतील.अशा प्रकारच्या अध्ययन अनुभवातून मुलांमध्ये मौखिक समृद्धता निर्माण करता येईल. मुलांच्या बोलण्यामध्ये  प्रश्न विचारणे ,संवाद साधणे, आपल्या भावना व्यक्त करणे, विचार व्यक्त करणे, माहिती मिळवणे, माहिती सांगणे, अनुभव किंवा गोष्ट सांगणे, नेमकी भाषा वापरणे या गोष्टींचा समावेश असतो या बाबी विकसित करण्यासाठी मुलांना बोलण्याच्या संधी शाळेत उपलब्ध करून द्यायला हव्यात.

बोलणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे साधन आहे”.यासाठी मुलांच्या बोलण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहू या. शिकलेल्या गोष्टी बोलण्यातूनच दृढ होतात. मुले बोलण्यातूनच शिकत असतात. यासाठी मुलांना बोलण्याची संधी आपण देऊयात. त्यांनी बोललेलं ऐकून घेऊयात. चला तर समजून घेऊयात.

                                                             

                

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment