Monday 11 July 2022

यशला शाळेत आणण्यात यश आलं

 कोरोनाच्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्या; परंतु काही मुले शाळेत येत नव्हती. या मुलांना शाळेत नियमित आणण्याचे आव्हान होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघूचीवाडी ता.जि उस्मानाबाद या माझ्या शाळेतील  शाळेत न येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शाळेत कसे आणले याची ही यशोगाथा.

कोरोनाच्या कालावधीत शाळा न भरल्यामुळे मुलांची अध्ययन क्षती खूप झाली. मुलांच्या मुलभूत संकल्पना, क्षमता विकसित झाल्या नाहीत. त्यामुळे आता जास्त भर मुलभूत क्षमता विकसनावर द्यावा लागत आहे.जे विद्यार्थ्यी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत इयत्ता पहिलीत प्रवेशित झाले. ते सध्या तिसरीच्या वर्गात आहेत. या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष प्रत्यक्ष शाळेत शिकण्याचा अनुभव मिळाला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मुलभूत क्षमता विकसित करण्याकडे लक्ष द्यावे लागले.

माझ्याकडे इयत्ता तिसरी व चौथी या वर्गाची वर्गशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली होती.इयत्ता तिसरीच्या वर्गात खूपच अनुपस्थिती होती.या मुलांनी कधी शाळेत शिकण्याचा अनुभव घेतला नव्हता.गेल्या फेब्रुवारी महिन्यात मी शाळेत रूजू झालो होतो.मुलांना नियमीत शाळेत पाठविण्यासाठी गावात फिरून पालक भेटी घेतल्या होत्या. बरीचशी मुले शाळेत येऊ लागली होती. तरीही दोन मुलांना शाळेत नियमित आणण्यात यश आले नव्हते. दोन्ही मुलांची नावे यश होती. एक मुलगा शाळेकडे फिरकतच नव्हता तर दुसरा आपले आई वर्गात बसली तरच तो वर्गात बसायला तयार होता.

यावर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. या दोन मुलांना वर्गात नियमित आणणे हे माझ्यासमोर मोठे आव्हान होतं. मी पालक भेटी घेतल्या. मुलांना शाळेत नियमित पाठवा असे पालकांना आवाहन केले. यश आयवळे हा विद्यार्थी शाळेत येऊ लागला. त्याला पेन वही इत्यादी शैक्षणिक साहित्य दिले. त्याच्याबरोबर छान गप्पा मारल्या. तो शाळेत येऊ लागला. दुसरा यश कांबळे हा विद्यार्थी मात्र आईशिवाय वर्गात बसत नव्हता. काय करावे काही समजत नव्हतं. शाळेत मुलासोबत बसणं हे त्याच्या आईलाही अवघडल्यासारखं वाटत होतं पण मुलाला शिकवावं त्याला शाळेची गोडी लागावी ही आईची तीव्र इच्छा दिसत होती. त्याला एकट्याला वर्गात बसविणे हे मोठं आव्हान माझ्यासमोर होते. सुरुवातीला त्याला काही चित्रमय गोष्टीची पुस्तके दाखवली त्याला ती गोष्टीची पुस्तके आवडली तो म्हणाला सर मी उद्यापासून एकटा असतो मला खूप आनंद वाटला. पण दुसऱ्या दिवशीही तो काही वर्गात एकटा बसायला तयार होत नव्हता. आईला सोडायला तयार नव्हता.

एके दिवशी माझा मोबाईल दिला. मोबाईल मध्ये छान छान गोष्टी त्याला दाखवल्या. यावेळी मात्र तो वर्गात एकटा बसला होता आई त्याच्यासोबत नव्हती. दुसऱ्या दिवशी त्या दोन्ही यशला मी एक रंग पेटी आणि काही चित्रे रंगविण्यासाठी आणली होती. त्यांना ते खूप आवडलं. दोघेही एकाच बेंचवर बसली होती. रंग खडू व चित्रे पाहून ते दोघेही हरकून गेली. चित्रे रंगवण्यात चांगलीच गुंगली होती. तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी मात्र तो आई शिवाय वर्गात बसू लागला. आता दोघेही वाचन लेखन पूर्वतयारी च्या कृती सोडवत आहेत. वर्गात इतर मुलांसोबत त्यांची आंतरक्रिया घडत आहे. ते आता नियमित शाळेत येतात. ते शिकू लागले आहेत.

ग्रामीण भागात काम करत असताना शिक्षकांसमोर वेगवेगळी आव्हाने उभे राहतात. शिक्षक आपल्या कल्पकतेने अशा आव्हानांना सामोरे जात असतो. काहीतरी मार्ग काढत असतो. मुलांना शिकत करण्यासाठी, कोरोना कालावधीमधील झालेला अध्ययन क्षती भरून काढण्यासाठी आता विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. माझ्या वर्गातील अनियमित असणारे हे दोन्ही यश आता नियमितपणे शाळेत येत आहे. निश्चितच लवकरात लवकर ते वाचन लेखन शिकतील असा विश्वास वाटतो.







No comments:

Post a Comment