Tuesday 28 June 2022

मुलीचं लग्न करून द्या.

माझ्या वर्गात काल एक आजीबाई आल्या.मी मुलांना अध्यापन करत होतो.त्यांनी वर्गात येऊन थेट व्यथा मांडायला सुरूवात केली.
'टि.सी द्या हो'
'त्याला चार मुली हायत्या,एक एकर जमीन...कसं जगायचं...सांगा.'
वर्गातील मुले हे पाहू लागली.मुलांसमोर हा संवाद नको म्हणून वर्गाच्या बाहेर आलो.मला मुळ समस्या समजून घ्यायची होती.म्हणून काय झालं?काय अडचण आहे.नीट सांगा...असं म्हणत होतो.ती आजी माझ्या तिसरीच्या वर्गातील एका विद्यार्थ्यींनीची टि.सी. मागत होती.

माझ्या वर्गात एक मुलगी आहे.फार गुणी व शांत, समजंस.नियमित शाळेत येते.अभ्यासात हुशार आहे.पण अचानक तीला मामाच्या गावाला शिकायला पाठवायचं म्हणून तिला मामासोबत मामाच्या गावी पाठवलं.ती तिकडे जावी असं वाटत नव्हतं.दोन तीन दिवस मामाच्या गावी राहून ती परत आली.  तिला विचारलं तेव्हा तिने सांगितलं, तिथं मला करमत नाही, मामाच्या घरापासून शाळा लांब आहे. मला आता इथंच शिकायचंय. मी आजील सांगत होतो,  "अहो! ती इथेच शिकायचं म्हणत आहे. मग कशाला पाठवता मामाच्या गावाला."
 त्यांचा एकच हेका होता की मला टीसी द्या. मग मी त्यांना  मुख्याध्यापकांकडे घेऊन गेलो.  मुख्याध्यापकांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा मुख्याध्यापक यांनीही मुलीला इथेच राहू द्या.अशी विनंती केली. तेव्हा तिथेही आजीबाईंनी घरची आर्थिक परिस्थिती...मुलाला असलेल्या चार चार मुली याबद्दल सांगितले. त्यांच्या मुलाची चार मुली  होऊ द्याव्यात अशी इच्छा नव्हती. पण मीच वंशाचा दिवा असावा म्हणून हट्ट धरला.असं आजीबाई सांगत होत्या. आता मी एका मुलीचं लग्न करून देणारंय. दोन मुली मामाकडं ढकलायच्यात.  असं त्या सांगत होत्या.

 वंशाच्या दिवा मुलगीही असते. मुलगा-मुलगी समान आहेत असं आम्ही आजीबाईला सांगत होतो. आता ते त्यांना पटत होतं; पण वेळ निघून गेलेली होती. आजीबाई मुख्याध्यापकांना म्हणाल्या, तुम्ही एका मुलीचे लग्न करून द्या. मुलीचा हुंडा द्या.नाहीतर मग टिसी द्या.असं म्हटल्यावर टि.सी मिळेल अशी त्यांची धारणा होती.

त्यांना म्हटलं, आता हुंडा बंद झाला आहे. मुलीची फुकट लग्न होतात.  मुलांना मुलगी मिळणे कठीण झालंय. त्यावर आजीबाईचं समाधान झालं नाही. मी त्यांना म्हटलं की मी त्या मुलीचा आठवीपर्यंत सर्व शैक्षणिक खर्च करतो. तरीही त्यांचा टि.सी. द्या हा एकच हेका होता. मी आजीबाईला म्हटलं, मुलगी जर म्हणाली की मामाच्या गावाला शिकायला जायचंय तर तिचा टि.सी. देऊन टाकू;पण तिला बोलवा. शाळेत घेऊन या. तिला राघुच्यावाडीत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायचं होतं.पण केवळ चार मुली घरात आहेत म्हणून तीची प्राथमिक शिक्षण घेतानाच अशी हेळसांड सुरू झाली होती.मुलीच्या शिक्षणासाठी शासनाच्या खूप योजना आहेत.पुढील शिक्षणासाठी गेल्यावर वस्तीगृह पण आहेत. हे आजीबाईला मी सांगत होतो. कुटुंबातील समस्येचा मुलांच्या शिक्षणावर खूप प्रभाव पडतो.मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात.आजही ग्रामीण भागात खूप साऱ्या समस्या आहेत. मुलांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रत्येकांन विशेषतः व्यवस्थेने संवेदनशीलतेने समजून घ्यायला हव्यात.

आमची शाळा आठवीपर्यंत आहे.आठवीपर्यंत मी त्या मुलीचा संपूर्ण शैक्षणिक खर्च करीन.समाजातील प्रत्येकानं अशा कुटुंबाचा आधार व्हायला हवं.

No comments:

Post a Comment