Wednesday 14 October 2020

वाचन चळवळ गतिमान करण्याची गरज

विशेष लेख

दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येकाच्या मनामनामध्ये वाचन प्रेरणेची ज्योत तेवत राहायला हवी. ज्ञानसंपन्न, सुजाण, सुसंस्कृत, समृद्ध समाजाची निर्मिती व्हायला हवी. निरंतर वाचनाने व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषाविकास घडून येतो. यांसाठी वाचन संस्कृतीची चळवळ गतिमान करण्याची आवश्यक आहे.

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके सर्वाना प्रेरणा देत राहतात.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती,त्याग,आत्मविश्वास, कणखर मन,प्रखर देशभक्ती होती. त्यांच्या प्रेरणादायी व उर्जस्वल विचारांनी आणि कर्तृत्वाने तरुणाईला भारावून टाकले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके वाचून निरंतर शिकत राहण्याची प्रेरणा दिली.प्रत्येक भारतीयाच्या मनात भारत महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी निर्माण केला होता. 

मुलांना पाठ्यपुस्तकाशिवाय अवांतर वाचनाची गरज असते.आत्तापर्यंत आलेल्या विविध शैक्षणिक आयोग व समित्यांनी या अवांतर वाचनाची गरज सांगितलेली आहे. मुदलियार आयोग, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ यामध्ये मुलांना अवांतर वाचनाची गरज उल्लेखित केलेली आहे. यासाठी शाळेमध्ये ग्रंथालये तयार करणे, ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार, भावविश्वानुसार पुस्तके ठेवणे गरजेचे असते. मुले वाचनाच्या अंगाने प्रगल्भ व्हावीत, त्यांना आकलनासह वाचन करता यावे. यासाठी ग्रंथालयावर आधारित विविध कृती, उपक्रम, प्रकल्प राबवायला हवेत.

मुलांना त्यांच्या अवतीभोवती जे काही लेखी किंवा छापील साहित्य उपलब्ध होईल ते वाचून त्याचा अर्थ समजून घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने वाचन करणे होय. मुलांना विविध साहित्य प्रकारातील मजकुराचा अर्थ समजायला हवा. समोरच्या मजकुराचा अर्थ काय असेल याविषयी अंदाज करण्याचे कौशल्य  वाचनासाठी महत्त्वाचं ठरतं. यामध्ये वाचन करताना अंदाज बांधणे, अनुमान करणे, तर्क करणे, विश्लेषण करणे या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हायला हव्यात. शब्दांचा अर्थ समजून घेणे आणि आपण केलेला अंदाज बरोबर होता की नाही हे तपासून पाहणे. या सर्व गोष्टीं विद्यार्थ्यांना यायला हव्यात. यासाठी मुलांसाठी वाचण्यायोग्य ठरेल असे साहित्य शोधून ते योग्य ठिकाणी उपलब्ध करून देणे गरजेचे असते. यासाठी प्रत्येक वर्गामध्ये वाचन कोपरा, दोरीवरचे वाचनालय,भिंतीवरचे वाचनालय यांची निर्मिती करायला हवी.

मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी. यासाठी शाळांमधील ग्रंथालय खूप मोठी भूमिका पार पाडू शकतात. त्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील ग्रंथालये समृद्ध असायला हवीत. ग्रंथालयामधील पुस्तके मुलांना घरी वाचायला द्यायला हवीत. त्याचबरोबर ग्रंथालयवर आधारित विविध भाषिक खेळ घ्यायला हवेत. ग्रंथालयातील पुस्तकावर आधारित विविध उपक्रम प्रकल्प,कृती राबवायला हवेत. त्यामुळे मुलांना वाचनाची गोडी लागेल व मुले वाचनाच्या अंगाने प्रगल्भ होतील.

शाळेतील ग्रंथालयाचा उपयोग मुलांना इतर विषयातील संकल्पना,संबोध समजून घेण्यासाठी होतो. ग्रंथालयातून विद्यार्थ्यांना विविध संदर्भ शोधता येतात.यासाठी ते विश्वकोश, शब्दकोश, विविध शैक्षणिक मासिके यासारख्या विविध संदर्भ साहित्याचा उपयोग करत असतात. त्याच बरोबर आता ही पुस्तके ही बऱ्याच ग्रंथालयांमध्ये उपलब्ध आहेत. ग्रंथालयाच्या माध्यमातून मुलांना स्वयंअध्ययन करण्याची सवय लागते. विद्यार्थी पुस्तके वाचून स्वतः टिपण काढतात, अभिप्राय देतात, समीक्षण करतात. यामुळे मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रातील नवीन बाबी समजतात. त्यामुळे आयुष्यभर शिकण्याची सवय मुलांना ग्रंथालये रुजतात. त्यामुळे शाळांमधील ग्रंथालय समृद्ध असायला हवीत. विविध विषयावरील पुस्तके, शैक्षणिक मासिके, विविध संदर्भसाहित्य ग्रंथालयात उपलब्ध असायला हवे. मुलांच्या आजुबाजूला वाचन समृद्ध वातावरण असायला हवं.

वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांना पुस्तक भेट देणे,एकमेकांना पुस्तके भेट देणे,शाळेत वाचन कट्टा तयार करणे, स्पर्धेत बक्षीस म्हणून पुस्तक देणे,लोकसहभागातून शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके जमा करणे. असे अनेक उपक्रम आज राज्यातील प्रयोगशील शाळांमधून राबविण्यात येत आहेत. लोक सहभागामधून शाळांमधील ग्रंथालय समृद्ध झालेली आहेत. या उपक्रमाचे सार्वत्रिक सार्वत्रिकीकरण होण्याची गरज आहे.पालक व समाजामध्येही वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रबोधन करायला हवे.पालकांनी आपल्या पाल्यांना आवडीने विविध पुस्तके आणायला हवीत. सर्वांनी मुलांना पुस्तके वाचून दाखवायला हवीत. घर घर पुस्तकालय व्हायला हवे.घरातील वातावरण वाचन समृद्ध व्हायला हवे.केवळ शाळेतच नाही तर गावागावात मुलांसाठी,तरुणांसाठी ग्रंथालये उभारायला हवीत.

समाधान शिकेतोड 
(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)


1 comment: