Wednesday, 30 October 2024

चला वाचूया कुळवाडी दिवाळी शाळा विशेषांक

कुळवाडी दिवाळीचा शाळा विशेषांक नुकताच प्राप्त झाला. शालेय शिक्षणातील मूलभूत तत्त्वज्ञान, शिक्षणातील शैक्षणिक प्रयोग, शाळेच्या आठवणी, मुलांचे सर्जनशील लेखन, शैक्षणिक पुस्तकांचा परिचय याबाबतचे लेख या विशेषांकात आहेत. दिवाळी अंक किती सर्जनशील असू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'कुळवाडी शाळा विशेषांक' होय. 

या शाळा विशेषांकाचे सहा विभाग करण्यात आलेले आहेत. शाळेच्या आठवणी या पहिल्या विभागात डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. यशवंत मनोहर, प्रा. इंद्रजीत भालेराव, डॉ. जगदीश कदम, डॉ. कैलास दौंड यांच्या शाळेच्या आठवणी वाचून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. कथा या विभागात एकनाथ आव्हाड, विनय मिरासे, उमेश मोहिते, वैशाली गेडाम यांच्या कथा शाळा आणि समाजातील अनुभवविश्व प्रकट करणाऱ्या आहेत. कविता या विभागात शाळेच्या संदर्भात सुंदर कविता आहेत.

राज्यात प्रयोगशील शिक्षक, अधिकारी शाळाशाळांमधून विविध प्रयोग राबवीत आहेत. डॉ. सुरेश सावंत, नामदेव माळी, गुलाब बिसेन, समाधान शिकेतोड, युवराज माने, कृष्णात पाटोळे, अशोक निकाळजे, श्रीकांत पाटील, संदीप वाकचौरे यांचे प्रयोग अनुकरणीय आहेत.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सुरू झाल्यानंतर शालेय विद्यार्थी लिहू लागले. त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटले. राज्यातील अनेक शालेय विद्यार्थ्यांनी स्वतःचे कवितासंग्रह, कथासंग्रह प्रकाशित केलेले आहेत. तेजस्विनी काकडे हिने सुंदर दैनंदिनी लिहिली आहे. खुशी राठोड हिने वाट तुडविताना या पुस्तकाचा परिचय लिहिला आहे. वैष्णवी मस्के या नववीतील विद्यार्थिनींने भुरा या पुस्तकाचा सुंदर परिचय लिहिला आहे. विद्यार्थ्याचे सर्जनशील लेखन वाचून विद्यार्थ्यांना लिहिते होण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल.

 'लक्षवेधी पुस्तक' या शेवटच्या विभागांमध्ये हा बालसाहित्यिक फारूक काझी यांनी तोत्तोचान, टीचर, अर्थपूर्ण आनंद शिक्षणासाठी, मुलांची भाषा आणि शिक्षक, शाळा भेट, गोष्ट गुरुजी घडण्याची, शिकता शिकवता, दिवास्वप्न, पढना जरा सोचना, शिक्षण आणि शांती या पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. या विभागात आठ प्राथमिक शिक्षकांचे आत्मवृत्त, कवाडे उघडताच, माझी काटेमुंढरीची शाळा, माझे विद्यार्थी देशोदेशीचे शिक्षण या पुस्तकांचा परिचय ही वाचायला मिळतो.

पालक, शिक्षक, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवण्याजोगा हा अंक आहे.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
दिवाळी अंक परिचय: समाधान शिकेतोड
शाळा दिवाळी विशेषांक: कुळवाडी 
संपादक: डॉ. माधव जाधव
प्रकाशक: सायस पब्लिकेशन
मूल्य:४१०/- 
संपर्क: ९४२३४३९९९१

No comments:

Post a Comment