Sunday, 27 October 2024

प्रयोगशील शाळांचा अभ्यास दौरा

शैक्षणिक अभ्यासदौरा

काल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे (क. ) या उपक्रमशील शाळांना भेटी दिल्या. या अभ्यास दौऱ्यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक सहभागी झाले होते.

सुरुवातीला कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा या शाळेला भेट दिली. या शाळेचा स्वच्छ, सुंदर, देखना व नयनरम्य परिसर पाहून डोळ्याचे पारणे फिटले. विस्तीर्ण क्रीडांगण, परसबाग, हॅन्डवॉश स्टेशन, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वॉलकंपाऊंड, स्वच्छतागृह या भौतिक सुविधा अतिशय उत्तम आहेत. शाळेत सुसज्ज असे ग्रंथालय आहे. ग्रंथालयावर आधारित विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचा विकास व्हावा यासाठी विद्यार्थ्यांच्या लेखनाचे हस्तलिखित तयार करण्यात आलेले आहे. विविध स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करून घेतली जाते. शाळेत विविध खेळांची तयारी करून घेतली जाते. आटपाट्या, रग्बी या खेळांमध्ये विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहेत. या शाळेतील क्रीडा शिक्षकाची मेहनत मनाला भावली. शाळेचे मुख्याध्यापक श्री.बाळकृष्ण तांबारे यांनी शाळेची संपूर्ण माहिती दिली. व्यवस्थापन समितीतील सदस्यांना मार्गदर्शन केले. ही शाळा पाहून शालेय व्यवस्थापन समिती तील सदस्य प्रभावित झाले.

दुपारच्या सत्रात धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसबे तडवळे या शाळेला भेट दिली. जवळपास साडेपाचशे पटसंख्या असणारी, दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी, शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षांमध्ये स्वतःचा पॅटर्न निर्माण करणारी ही शाळा पाहून प्रेरणा मिळाली. या शाळेत शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिकी स्कूल अशा विविध स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करून घेतली जाते. या शाळेतील ग्रंथालय सुसज्ज आहे. ग्रंथालयावर आधारित विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांना अध्ययन-अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञानाचा खूप उत्तम वापर केला जातो. या शाळेतील 'विद्यार्थी बँक' उपक्रम खूपच नाविन्यपूर्ण आहे. शाळेतील विद्यार्थी 'विद्यार्थी बँक' चालवतात. 

विद्यार्थी मूलभूत क्षमतेत पाठीमागे राहू नये यासाठी या शाळेने स्वतःचा पॅटर्न विकसित केलेला आहे. भाषा, गणित, इंग्रजी विषयाचे नियमित नैदानिक चाचणी घेऊन पडताळणी केली जाते. हा उपक्रम खूपच आवडला. 

दोन्ही शाळेबद्दल लिहिण्यासारखे खूप काही आहे. दोन्ही शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. आमच्या शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीतील सदस्य, शाळेतील शिक्षक यांना खूप काही नवीन शिकायला मिळाले. या अभ्यास दौऱ्यामुळे नवीन ऊर्जा, प्रेरणा मिळाली. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी या अभ्यास दौऱ्याचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास वाटतो.

No comments:

Post a Comment