Monday, 13 January 2025

बोरगावला रंगले बाल साहित्य संमेलन

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव (काळे) या शाळेत सहावे बाल साहित्य संमेलन संपन्न झाले. या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून विद्यार्थी, पालक यांच्याशी संवाद साधला. कवी कट्टाकट्टा, कथा वाचन ही सत्रे उत्तम झाली. सर्व सत्रांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांनी केले. मुलांनी छान कविता, कथा सादर केल्या. 

या शाळेत प्रयोगशील शिक्षिका अनिता जावळे यांनी तयार केलेले भाषा दालन पाहायला मिळाले. या भाषा दालनामध्ये विविध साहित्य प्रकारांमध्ये मुलांनी लिहिलेली पुस्तके होती. कथा, कविता, नाटक , जाहिरात, बातमी, संवाद, पक्षांविषयी माहिती अशा विविध साहित्य प्रकारातील पुस्तके विद्यार्थ्यांनी लिहिलेली होती. या पुस्तकांचे मुखपृष्ठ विद्यार्थ्यांनीच तयार केलेले होते. भाषा दालतील ही पुस्तके पाहून मुलांचे खूप कौतुक वाटले.अशा उपक्रमामुळे मुलांच्या भाषिक क्षमतांचा आपसुकच विकास होतो. 

शाळेतील सर्वच शिक्षकांचे खूप कौतुक वाटले. त्यांनी या साहित्य संमेलनाचे खूप छान नियोजन व आयोजन केलेले होते. शाळेचा परिसरही खूप सुंदर होता. वडाचे व पिंपळाचे झाड शाळेच्या सौंदर्यात भर घालत होतं. या दोन्ही झाडांभोवती मुलांना वाचन करण्यासाठी छान कट्टा तयार केलेला होता.

बाल साहित्य संमेलन या उपक्रमामुळे मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संवर्धन व अभिवृद्धी होण्यास मदत होते. मुलांच्या भाषिक क्षमतांचा विकास होतो. मुलांच्या अभिव्यक्तीला धुमारे फुटतात. मुलांना समाजभान येतं. मुलं पूरक वाचन करायला लागतात. त्यामुळे बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करायला हवे.


No comments:

Post a Comment