NCERT राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक धोरणे आणि कार्यक्रम विकसित करते, तर SCERT त्यांच्या राज्याच्या गरजांनुसार धोरणे आणि कार्यक्रम विकसित करतात. एकंदरीत, NCERT आणि SCERT या दोन्ही संस्था भारतातील शिक्षणाच्या विकासात आणि संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. SCERT राज्य स्तरावर काम करते. राज्याच्या विशिष्ट गरजांनुसार अभ्यासक्रम विकसन, शिक्षक प्रशिक्षण आणि शैक्षणिक संशोधनावर काम करते. या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने राजस्थानमधील एससीईआरटीला भेट दिली.या ठिकाणचा परिसर पाहून पुण्यातील एससीईआरटीलाची आठवण आली. या परिसरात उंच उंच झाडे होती. स्वच्छ व सुंदर परिसर होता. सुरूवातीला आम्ही असेसमेंट सेलला भेट दिली. तेथील अधिकाऱ्यांनी असेसमेंट सेलच्या कामाची माहिती सांगितली.
या सेलच्या माध्यमातुन राज्यांतील शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपेढी तयार केलेली आहे. ही प्रश्नपेढी वर्गनिहाय,विषयनिहाय, पाठनिहाय व पाठातील अध्ययन निष्पत्तीनिहाय तयार करण्यात आलेल्या आहेत. हे सर्व शाळा दर्पण पोर्टलवर ठेवण्यात आलेले आहे. प्रत्येक शिक्षक स्वत:च्या लॉगिनमधून या प्रश्नपेढीचा वापर करू शकतो. ब्लुमच्या अध्ययन पातळ्यांवर या प्रश्नांची रचना केलेली आहे. असेसमेंट सेलमार्फत शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी डाएटच्या माध्यमातुन कार्यशाळा आयोजित केल्या जातात. राजस्थानमध्ये ३३ जिल्ह्यात ३३ डायट कार्यरत आहेत. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात (NAS) राजस्थान राज्य पुढे दिसून येते.
राजस्थान राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहा विभागांच्या कार्यपद्धतीचे सादरीकरण संपन्न झाले. इथे शिक्षकांची प्रशिक्षणे गरजाधिष्ठीत असतात. शिक्षक ज्या प्रशिक्षणाची मागणी करतात अशीच प्रशिक्षण घेतली जातात. SCERT मध्ये अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम चालते. इयत्ता पहिली ते पाचवीची पाठ्यपुस्तके एससीईआरटीमार्फत तयार केली जातात. सहावी ते बारावीपर्यंतची पाठ्यपुस्तके NCERT वापरली जातात. राजस्थान राज्यामध्ये हिंदी व इंग्रजी या फक्त दोन माध्यमांच्या शाळा आहेत. अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या काही शाळा सरकार चालवत आहे.
SCERT मधील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना शिक्षण उपसंचालक मा.संजय डोरलीकर, सहाय्यक संचालक मा.सरोज जगताप शिक्षणाधिकारी मा.शबनम मुजावर
राजस्थानमध्ये अंगणवाडी शाळांना जोडण्यात आलेले आहेत. NCF वर खूप उत्तम काम झालेले आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्था कार्यप्रवण राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा उत्तम प्रकारे वापर करण्यात येत आहे. मुलांच्या संपादणूक पातळीवरून शाळांचे ग्रेडिंग करण्यात आलेले आहे.
दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत (DIET)मार्फत शैक्षणिक संशोधन केले जाते. शिक्षण उपसंचालक माननीय संजय डोरलीकर यांनी SCERT चे अतिरिक्त संचालक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. बैठकीचे समन्वयन सहाय्यक संचालक सरोज जगताप मॅडम यांनी केले. अभ्यास दौऱ्यातील सदस्यांनी प्रश्न, मनातील शंका तेथील अधिकाऱ्यांना विचारल्या. शालेय शिक्षणातील अनेक बाबींवर महत्त्वाची चर्चा झाली.
राजस्थान राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (RSCERT) एकूण सहा विभाग आहेत.
१) अभ्यासक्रम, सामग्री निर्मिती आणि मूल्यांकन विभाग
२) शैक्षणिक सर्वेक्षण, संशोधन आणि धोरण दृष्टीकोन विभाग
३) शिक्षक शिक्षण विभाग
४) माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान सेवा विभाग
५)समग्र विकास आणि सामाजिक न्याय विभाग
६) नियोजन व्यवस्थापन आणि वित्त विभाग
त्यानंतर आम्ही एसटीआरटीने तयार केलेले कलांगण पाहण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी राजस्थानचे सांस्कृतिक वैभव पाहायला मिळाले. राजस्थान मधील लोककला, लोकनृत्य, लोकसंस्कृती यांची चित्रशैली अतिशय सुंदर पद्धतीने भिंतीवर लावण्यात आलेली होती.
दुपारच्या जेवणानंतर आम्ही उदयपूर मधील प्रताप गौरव केंद्र पाहण्यासाठी गेलो. प्रताप गौरव केंद्र राष्ट्रीय तीर्थ हे भारतातील राजस्थान राज्यातील उदयपूर शहरातील टायगर हिल येथील एक पर्यटन स्थळ आहे . वीर शिरोमणी महाराणा प्रताप समितीने सुरू केलेल्या या प्रकल्पाचा उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराणा प्रताप आणि परिसरातील ऐतिहासिक वारशाची माहिती देणे हा आहे.
या प्रकल्पात मेवाड राज्य आणि भारताच्या इतिहासाबद्दल माहिती देण्यात आली आहे. आपल्या भारत देशाला आक्रमणकर्त्यांनी कसे लुटले गेले ? इथल्या शुर राजपूत राजांनी त्यांच्याशी कसा संघर्ष केला. राजपूत राजांच्या त्यागाचा, बलिदानाचा, समर्पणाचा, राष्ट्रभक्तीचा दैदीप्यमान इतिहास या प्रकल्पामध्ये अनुभवायला मिळाला. शूरवीर रजपूत राजांच्या कर्तुत्वाचा गौरव जेव्हा गाईड आम्हाला सांगत होता तेव्हा अंगावर शहारे येत होते.
त्यानंतर आमची सिटी पॅलेस पाहण्यासाठी गेलो.उदयपूरमधील सिटी पॅलेस हा एक आकर्षक शैलीत बांधला गेलेला आहे. अरवली पर्वताच्या उंच टेकडीवर बांधलेला भव्यदिव्य पॅलेस पाहून डोळे दिपून जातात. राजपुत राजांच्या सर्व वस्तू या पॅलेसमध्ये जतन करून ठेवलेले आहेत. त्या काळातील सर्व नकाशे येथे पाहायला मिळतात. त्या काळातील चित्रशैली पाहून मन प्रसन्न होते. अशाप्रकारे अभ्यास दौऱ्याचा हा दिवस अतिशय आनंदामध्ये गेला. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतील अधिकारी अभ्यास दौऱ्यातील सर्वांची खूप काळजी घेत होते. आम्ही प्रत्येकवेळी चांगल्या हॉटेलमध्ये उत्तम दर्जाच्या जेवनाचा आस्वाद घेतला.
राजस्थानमध्ये पर्यटन व्यवसाय खूपच भरभराटीला आलेला आहे. आम्हाला फिरताना प्रत्येक ठिकाणी परदेशी पर्यटक दिसत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक पर्यटन करतात. ते जगताना शिकतात आणि शिकताना जगतात. त्यांचे जगणं आणि शिकणं एकच झालेलं आहे.
आपल्या भारत देशातील हे सांस्कृतिक वैभव आपण नक्कीच अनुभवायला हवं. महाराष्ट्रातील मुलांच्या शैक्षणिक सहली राजस्थानमध्ये आणायला हव्यात असे मनोमन वाटले.
No comments:
Post a Comment