मुलांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सगळीकडे प्रयत्न सुरु आहेत. शालेय शिक्षणात जे रचनात्मक कार्य केले जात आहे ते काम पाहून, समजून घेऊन व आपल्या कार्यक्षेत्रात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास दौरे खूप उपयुक्त ठरतात. राजस्थान अभ्यास दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जयपुरमधील काही शाळांना भेट दिली त्या अनुभवाबद्दल....
आज जयपूरमधील शाळांना भेटी दिल्या जाणार होत्या. या अगोदर महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक कार्यक्रम सुरू झाल्यानंतर प्रयोगशाळांना शाळा भेटी दिल्या जात होत्या. त्यावेळी मी काही प्रयोगशील शाळांना भेटी दिल्या होत्या. तेथील काम समजून घेतलेले होते. शा शाळा भेटीतून खूप काही नवीन शिकायला मिळते.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालक आदरणीय आर. विमला मॅडम यांनी आमच्याशी सुरवातीला सकाळी प्रेरणादायी संवाद साधला. प्रत्येकाशी अभ्यासदौऱ्याबाबत वैयक्तिक चर्चा केली. अभ्यास दौऱ्यामध्ये आपल्या राज्यासाठी काय काय उपयोगी ठरेल याच्या नोंदी ठेवायला सांगितल्या. आदरणीय राज्य प्रकल्प संचालक मॅडम सोबत असल्यामुळे अभ्यास दौऱ्यातील सर्व सदस्यांमध्ये नवीन उत्साह, ऊर्जा निर्माण झाली होती.
शाळा भेटी देण्यासाठी आम्ही तीन टीममध्ये विभागलो होतो. राज्य प्रकल्प संचालक मा.आर विमला मॅडम यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टीमने राजा महाराजा बालिका उच्च माध्यमिक विद्यालय जयपुर या शाळेला भेट दिली. या पथकामध्ये शिक्षण उपसंचालक मा.संजय डोरलीकर, गटशिक्षणाधिकारी मा.शरदचंद्र शर्मा, मा.रसिका भुजबळ हे होते. शाळेतील विद्यार्थ्यांची मा. आर विमला मॅडम यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
आमच्या दुसऱ्या टीमचे नेतृत्व सहाय्यक संचालक मा.सरोज जगताप मॅडम करत होत्या. आमच्या टीममध्ये शिक्षणाधिकारी मा.शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी मा.रवींद्र खंदारे, मा.प्रमोद चिंचोलकर, मुख्याध्यापक, शिक्षक, समग्र शिक्षाचे अधिकारी व कर्मचारी होते. तिसऱ्या टीमने सहाय्यक संचालक मा.रवींद्रसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पीएमसी राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय जयपुर या शाळेला भेट दिली. प्रत्येक टीम एका शाळेला भेट देणार होती. त्यानंतर दुपारी समग्र शिक्षाच्या कार्यालयाला भेट दिली जाणार होती.
आमच्या टीमने महात्मा गांधी गव्हर्मेंट स्कुलला भेट दिली. ही राजस्थान सरकारमार्फत चालविली जाणारी इंग्रजी माध्यमांची शाळा होती. ही शाळा नर्सरी ते बारावीपर्यंत होती. येथे शासनामार्फत इंग्रजी माध्यमाची शाळा चालविल्या जातात ही बाब विशेष होती. शाळेची इमारत व परिसर छान होता. शालेय परिसर व वर्गातील वातावरण अध्ययन समृद्ध होते. शाळेत उत्तम भौतिक सुविधा होत्या.
सुरुवातीला आमचे राजस्थानी पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत केले. आमच्या टीममधील सदस्यांनी शाळेतील वेगवेगळ्या बाबी पाहिल्या. आम्ही प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नर्सरीमधील विद्यार्थी बोलके होते. शाळेत तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. मी विशेषतः शाळेतील ग्रंथालय पाहिले. निपुण भारत अभियानांतर्गत शाळेला एबीएल किट देण्यात आलेले होते. या किटचे बारकाईने निरीक्षण केले. किटमधील साहित्य हाताळून पाहिले. या शैक्षणिक साहित्यामध्ये भाषिक खेळ, तक्ते, चार्ट, अंककार्ड, अक्षरकार्ड इत्यादी साहित्य होते.
आपल्याकडे समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना भाषा, गणित विषयाच्या अध्ययन साहित्य समृद्धी पेट्या देण्यात आलेल्या आहेत. या आपल्या पेट्यामधील साहित्य उत्तम,दर्जेदार व टिकाऊ आहे. प्रगत अध्यापन शास्त्राचा विचार करून या पेट्यांमधील साहित्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.
आपल्याकडे पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या केंजळ या शाळेत सुरुवातीला एबीएल प्रकल्पविण्यात आला होता. अतिशय शास्त्रीय पद्धतीने या प्रकल्पावर काम झालेले आहे. पुढे राज्यातील काही जिल्हा परिषदांनी एबीएल हा प्रकल्प राबविला होता. खरंतर वर्गांतर क्रिया, वर्गातील मुलांसोबत केले जाणारे काम हे पाहण्यासाठी मी उत्सुक होतो. अध्ययन निष्पत्ती आधारित वर्गात कशा पद्धतीने काम केले जाते. याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. या शाळेत सहावी ते बारावी या वर्गांसाठी एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके वापरली जात होती. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी इथे दिसून आली. इथल्या शाळेला पूर्व प्राथमिकचे वर्ग जोडण्यात आलेले आहेत. शाळेत प्रशासकीय कामकाजासाठी लिपिक व प्रशासकीय अधिकारी आहे. शाळा दर्पण पोर्टलच्या माध्यमातून शाळेचे सर्व प्रशासकीय कामकाज चालते.
शासनामार्फत पुरविल्या जाणाऱ्या विद्यार्थी लाभाच्या योजना समजून घेतल्या. पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला रोख रकमेचे व उच्चार दिले जात होते. पाच किलोमीटरच्या आतील मुलींसाठी सायकल मोफत देण्यात येत होती.
दुपारी समग्र शिक्षाच्या ऑफिसला सर्वांनी भेट दिली. राज्य प्रकल्प संचालक माननीय आर विमला मॅडम यांनी राजस्थान समग्र शिक्षा कार्यालयाचे राज्य प्रकल्प संचालक यांची भेट घेतली व त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर बैठक कक्षात शाळाभेटीच्या संदर्भात चर्चा झाली. समग्र शिक्षा कार्यालयातील एनआयसीच्या वतीने त्या ठिकाणी शाळादर्पण पोर्टलचे सादरीकरण करण्यात आले. शालेय शिक्षण विभागातील सर्व बाबी एकाच पोर्टलच्या माध्यमातून कशा पद्धतीने एकत्रित हाताळल्या जात आहेत त्याचे सादरीकरण करण्यात आले. शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थी लाभाच्या योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षक पुरस्कार अशा विविध बाबी एकाच पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात होत्या. प्रत्येक शिक्षकाला या पोर्टलवर स्वतंत्र लॉगिन देण्यात आलेले होते. सर्व बाबी एकाच ठिकाणी असल्यामुळे हे पोर्टल विशेष वाटत होते. आपल्याकडे सरल, शालार्थ, शिष्यवृत्तीसाठी परीक्षा परिषदेची वेबसाईट, एससीआरटीची, बालभारतीची स्वतंत्र वेबसाईट अशा विविध पोर्टल मधून काम चालते.
दुसऱ्या दिवशी उदयपूरमधील एससीआरटी ला भेट द्यायची होती. त्यामुळे जयपुर ते उदयपूर असा बसने प्रवास सुरू झाला. जवळपास तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करावयाचा होता. प्रवासात रस्त्यातच एका छान हॉटेलमध्ये सर्वांनी संध्याकाळचे जेवण केले. योगायोगाने आमच्या अभ्यास दौऱ्यातील रसिका भुजबळ यांचा वाढदिवस होता. त्यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने सर्वांनी साजरा केला. रात्रीच्या दीड-दोनच्या सुमारास आम्ही उदयपूरला पोहोचलो. मनविलास या शानदार हॉटेलमध्ये आम्ही मुक्काम होता. सकाळी लवकर उठून एससीई आरटी गाठायची होती.
No comments:
Post a Comment