Thursday, 28 November 2024

गुलाबी शहरांतील स्थळांना भेटी

 राजस्थान अभ्यासदौरा म्हणजे स्वतःला समृद्ध करण्यासाठीची उत्तम संधी आहे. शिक्षक म्हणून स्वतः समृद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्ययन अनुभव देता येतात. अभ्यास दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जयपुरमधील महत्त्वाची स्थळे आम्ही पाहिली. राजस्थानमधील जयपुर या गुलाबी शहराबद्दल खूप ऐकलं होतं. पहिल्या दिवशी ते अनुभवलं. या पहिल्या दिवसाने मला खूप समृद्ध केले त्या पहिल्या दिवसाच्या अनुभवाबद्दल.....

२६ नोव्हेंबर अभ्यास दौऱ्याचा पाहिला दिवस. आज जयपूरमधील महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचे ठरले होते. सकाळी आम्ही साडेआठच्या सुमारास हॉटेलमधून निघालो. जाताना आम्हाला शिक्षण उपसंचालक सन्माननीय संजय डोरलीकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. दिवसभराच्या भेटीचे नियोजन सांगितले. आमचा प्रवास सुरू झाला.

आम्ही पहिली भेट जयपुरमधील अल्बर्ट हॉल संग्रहालयाला दिली.जयपूरमधील अल्बर्ट हॉल संग्रहालय हे राज्यातील सर्वात जुने संग्रहालय आहे. ही इमारत आर्किटेक्चरचा उत्तम नमुना आहे. या संग्रहालयामध्ये गेल्या चारशे ते पाचशे वर्षातील ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करून ठेवण्यात आलेला आहे. हे सर्व पाहून त्या काळातील सांस्कृतिक, सामाजिक परिस्थितीची माहिती मिळाली. मुघलराजे राजपूत राजे यांची शस्त्रे, कपडे त्याकाळी त्यांनी वापरलेल्या वस्तू, हे सर्व अतिशय उत्तमपणे संग्रह करून ठेवलेले होते. हे संग्रहालय पाहण्यासाठी सारे परदेशी पर्यटक आलेले होते.


त्यानंतर येथून जवळच असलेला 'हवा महल' या वास्तूला भेट दिली. हवा महल हा जयपूर येथील एक शाही राजवाडा आहे. हवा महल इमारतीचे वास्तुविशारद लालचंद उस्ताद यांनी 'राजमुकुट' सारखे डिझाइन केले होते. तिची अनोखी पाच मजली इमारत, जी वरच्या बाजूला फक्त दीड फूट रुंद आहे, बाहेरून पाहिल्यास मधमाशाच्या पोळ्यासारखी दिसते. इमारतीला ९५३ अतिशय सुंदर आणि आकर्षक लहान जाळीदार खिडक्या आहेत. या जाळीदार खिडक्यामुळे  राजघराण्यातील स्त्रियांची "पडदा प्रथा" पाळली जात होती. या खिडक्यांमध्ये बसून राजवाड्याच्या खाली असलेल्या रस्त्यांवर होणारे समारंभ आणि दैनंदिन जीवनातील घडामोडींचे निरीक्षण करू शकत होत्या. अशी माहिती गाईडने दिली.


जंतर मंतर हे हे स्थळ युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. राजस्थानच्या जयपूरचे संस्थापक राजपूत राजा सवाई जयसिंग यांनी हे निर्माण केलेले आहे.अठराव्या शतकाचे बांधकाम पूर्ण झाले. हे जागतिक वारसा स्थळ पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक भेट देतात. या ठिकाणी भूगोल, खगोलशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी येतात. त्या काळातील सूर्याच्या सावलीवरून वेळ ठरवण्याची अनोखी पद्धत येथे पाहायला मिळाली.

सिटी पॅलेस, जयपूर हे शाही निवासस्थान आहे. महाराजा सवाई जयसिंग यांच्या कारकिर्दीत जयपूर शहराची स्थापना झाल्यानंतर बांधकाम सुरू झाले. सिटी पॅलेसचे मुघल आणि राजपूत स्थापत्यशैलीच्या घटकांना एकत्र करून वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार ते बांधले गेले. यामध्ये महाराजा सवाई मानसिंग संग्रहालय आहे.  राजवाड्याच्या संकुलात अनेक इमारती, विविध अंगण, गॅलरी, रेस्टॉरंट आणि संग्रहालय ट्रस्टची कार्यालये आहेत. त्यानंतर राजस्थान शहराच्या बाहेर हत्तीचे गाव पाहिले. या गावाला बाहेरून आलेले पर्यटक आवर्जून भेट देतात. जंगल सफारी करतात.

 जयपुर पासून फक्त ११ किमी दूर एका पर्वताच्या शिखरावर आमेर किल्ला भक्कमपणे उभा आहे. लाल वाळूचा दगड आणि संगमरवरी मध्ये बांधलेल्या या किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. हा किल्ला राजपूत व मुगल वास्तुशिल्प शैलीचा अद्भुत नजराणा आहे. किल्ल्यांच्या भिंतीवर खूप कला कलाकुसर केलेली होती.
त्या ठिकाणी संध्याकाळी लेजर शो पाहिला.

दिवसभरात जयपुर मधील महत्त्वाची ठिकाणे पाहण्यात आले होती. एक गोष्ट प्रकर्षाने याठिकाणी जाणून घेतली की परदेशी पर्यटकांची गर्दी खूप होती. विद्यार्थ्यांच्या सहली आलेल्या या ठिकाणी दिसल्या. प्रत्यक्ष अनुभवातून माणसाला खूप काही शिकायला मिळते. आजचा अनुभव विद्यार्थ्यांसोबत काम करताना उपयोगाला येईल.आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पिपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून या सर्व प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणार आहे. 

दुसऱ्या दिवशी जयपुरमधील शाळांना भेटी देण्याचे ठरले. या शाळांना भेटण्याची उत्सुकता लागली होती.

4 comments:

  1. खूप छान लिहिले आहे. वाचून मलाही राजस्थानचा टूर केल्याचा आनंद झाला.

    ReplyDelete
  2. खूप छान....जयपूर शहर डोळ्यासमोर उभ केलात....💐💐

    ReplyDelete