महाराष्ट्र शासनाच्या वतीने व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यामार्फत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. आज पुणे ते जयपुर हा आयुष्यातील पहिला विमान प्रवास केला.
राज्यस्थान राज्यातील शालेय शिक्षणात राबविले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम योजना यांचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे.या दौऱ्यामध्ये राज्यातील शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षक सहभागी झालेले आहेत. २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत हा दौरा संपन्न होणार आहे.
या अभ्यास दौऱ्यासाठी मी खूप उत्सुक आहे. स्वतःला समृद्ध करण्यासाठी हा दौरा एक पर्वणीच ठरणार आहे. राजस्थान राज्यातील शाळा शाळांमध्ये मुलांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, निपुण भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणार उपक्रम, राजस्थानमधील बालसाहित्य, राजस्थानमधील शालेय शिक्षणाचा आकृतीबंध, विविध शासकीय शैक्षणिक संस्था हे पाहणे व समजून घेण्याची उत्सुकता लागली आहे.
मी अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे ही बातमी माझ्या वर्गातील मुलांपर्यंत पोचली होती. सर विमानात बसल्यावर फोटो टाका असं आवर्जून मुलांनी सांगितलं.
पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे मी २५ तारखेला पुण्यात मुक्कामी आलो. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतील अधिकारी सन्माननीय सरोज जगताप मॅडम यांनी झुम मीटिंगच्या माध्यमातून विमान प्रवासात कुठल्याही अडचणी येणार नाहीत या दृष्टीने संपूर्ण मार्गदर्शन केले होते. त्यामुळे चांगला आत्मविश्वास आला होता.
सकाळी बाराच्या आसपास विमानतळावर पोहोचलो. भव्यदिव्य विमानतळ पाहून खूप आनंद वाटला. विचारपूस करत अंदाज घेत विमानतळाकडे गेलो. सीआरपीएफच्या जवानांनी सुरुवातीला विमानाचे तिकीट, ओळखपत्र तपासले व आतमध्ये प्रवेश दिला. पुढे काय प्रक्रिया असेल याची उत्सुकता होती. आतमध्ये इतर प्रवाशांना सर्व प्रक्रिया विचारून समजून घेतली. येथील काउंटरवर जाऊन बोर्डिंग पास घेतला. माझी बॅग त्यांच्या ताब्यात गेली. ती आपसूकच विमानात पोचणार होती. नंतर वरच्या मजल्यावर आलो. त्या ठिकाणी माझी तपासणी झाली. तपासणी अगोदर इलेक्ट्रॉनिक वस्तू एका ट्रेमध्ये काढून ठेवण्यास सांगितल्या. त्या सर्व वस्तू तपासणी होऊन आल्या. वैयक्तिक तपासणी झाल्यानंतर वरच्या मजल्यावर पोहोचलो.
सकाळी गडबडीत बाहेर अल्पोपहार न केल्यामुळे भूक लागली होती. नाश्त्यासाठी स्टॉल शोधत होतो. विमानतळावरील खाद्यपदार्थांचे दर खूपच जास्त होते. तेवढ्यात माझ्या गळ्यातील शाळेचे आय कार्ड पाहून त्या विमानतळावरील एका तरुण अधिकाऱ्यांने विचारले. मीपण धाराशिव जिल्ह्यातील आहे असे त्यांनी सांगितले. गावाकडचा माणूस भेटला त्यामुळे खूप आनंद झाला. विमानतळावर तो तरुण ड्युटी ऑफिसर म्हणून कार्यरत होता. त्याने आग्रहाने मला नाष्टा खाऊ घातला. विमानतळावरील वस्तूचे भाव अनेक पटीने जास्त होते. गावाकडच्या मनसोक्त गप्पा मारल्या. काही अडचण आली तर मला फोन करा असं आवर्जून सांगितलं.
पुण्याहून माझ्यासोबत येणारे माझ्या सोबती सातारा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी मा. शबनम मुजावर व उपशिक्षणाधिकारी मा. रवींद्र खंदारे हे होते. त्यांची भेट झाली. आम्ही तिघे मिळून पुणे ते जयपूर का विमान सोबत करणार होतो. विमानाला अर्धा तास अवधी होता. एवढ्या वेळात आम्ही विमानतळावरील क्रॉसवर्ड बुक स्टॉलला भेट दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर बेस्ट सेलर असणारी पुस्तके त्या ठिकाणी होती. नुकतीच आलेली ऑर्बिट ही कादंबरी आहे का याची खात्री केली. पण अजून आली नव्हती. खंदारे साहेब व मी दोघांनी सुधा मूर्ती यांचे कॉमन एट अनकॉमन हे पुस्तक विकत घेतले. माझा पहिलाच विमानप्रवास असल्यामुळे माझ्यासोबतच्या अधिकाऱ्यांनी विंडो सीट दिली. खूप आनंद वाटला.
विमानाच्या खिडकीतून प्रत्यक्ष टिपण्यास उत्सुक होतो. विमानात बसल्यावर अनाउन्समेंट सुरू झाली. सीट बिल कसा लावावा, लाइफ जॅकेटचा वापर कधी करावा याबद्दल प्रात्यक्षिक दाखवले जात होते; परंतु विमान उड्डाणाच्या स्थितीत असल्यामुळे माझे लक्ष खिडकीकडे होते. प्रात्यक्षिक ही समजून घेत होतो. मला सीट बेल्ट काय लावता येईना. खंदारे साहेबांनी मदत केली. माझा पहिला विमान प्रवास सुरू झाला.
उंच आकाशात विमानाने भरारी घेतल्यानंतर जमिनीवरील डोंगर रस्ते इमारती खूप छोट्या दिसत होत्या. निरभ्र आकाश होतो, ऊन पडलेले होते त्यामुळे जमिनीवरील पाण्याची तळी शिशे ओतल्यासारखे दिसत होती. पावणेदोन तासाचा विमान प्रवास छान झाला. पाच वाजता जयपूरच्या विमानतळावर पोहोचलो. जयपूरचे विमानतळ खूप सुंदर होते. विमानतळावरून जयपुरमधील वेस्ट इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये पोहोचलो. मुंबई व नागपूर येथून अभ्यास दौऱ्यातील सदस्य येणार होते. रात्री सर्वजण हॉटेलवर पोहोचले. रात्री टीम मधील सर्वांची ओळख झाली.
खूपच छान अनुभव
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete