वादळवाट हे आत्मकथन एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलाचं आहे. या आर्थिक विस्थापित कुटुंबाच्या वाट्याला आलेलं दुःख, दैना, हालअपेष्टा यामुळे खचून न जाता या शेतकऱ्याच्या मुलानं स्वत:च्या बळावर आकाशाला गवसणी घातली. विवेकवाद, माणुसकी, समता, बंधुता यांचा पुरस्कार करून अवघं आयुष्य कुटुंबाच्या, समाजाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी झिजवलं. असे संघर्षयात्री एम. डी. देशमुख यांची ही प्रेरणादायी जीवनगाथा आहे. ग्रंथाली प्रकाशनाने या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे.
एका गरीब शेतकरी कुटुंबात अभावग्रस्त परिस्थितीत जन्मलेल्या एका संघर्षयात्रीची ही संघर्षगाथा आहे. लेखक एम.डी. देशमुख यांच्या वादळवाट या आत्मकथनातून गेल्या चाळीस वर्षाचा पट डोळ्यासमोर उभा राहतो. या पुस्तकाची पाठराखण प्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी केलेली आहे. ते म्हणतात, ‘लेखक जगला त्या काळाची ही एक बखर आहे.’ खरोखरचं तत्कालीन समाजजीवन, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवन या आत्मकथनातून मांडलेले आहे. प्रत्येक घटना, प्रसंग वाचताना वाचक अंतर्मुख, तल्लीन होऊन जातो. मी हे पुस्तक सलगपणे वाचून काढले.मी या साहित्यकृतीचा आस्वाद घेतला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बंकलगी,
मोहोळ तालुक्यातील नरखेड ते उस्मानाबाद हा प्रवास लेखकाने आत्मकथनाच्या पहिल्या
भागात मांडलेला आहे. लेखकाची घरची अत्यंत गरीब होती; घरात खायची मारामार होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत लेखकाला लेखकाची आई
शिकण्यासाठी प्रेरणा देत होती. लेखक सांगतात, ‘आई म्हणायची जगाच्या पाठीवर कुठंही
जा, शिक्षण घेतल्याबिगर राहू नको! शिक्षणंच तुला माणसात बसवंल.’ किती मोठं होतं हे तत्वज्ञान. स्वतःच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी
म्हणून लेखकाने आप्तस्वकीयांचे उंबरठे झिजवले परंतु पदरी अवहेलना, हालपेष्टा, अपमान
व निराशाच आली. तुझ्या शिक्षणासाठी तुझे काका, उद्धवराव पाटील काहीतरी मार्ग
काढतील म्हणून लेखकाला त्यांच्या आईनेच उस्मानाबादचा पाठविलं.
ते १९६०
चे दशक होते. त्या काळात वाहतुकीच्या सोयी खूपच कमी होत्या. लेखकांकडे प्रवासासाठी
पैसेही नव्हते, म्हणून लेखक नरखेड ते उस्मानाबाद पर्यंतचा मैलोनमैल प्रवास
कित्येकदा अनवाणी पायानेच करतात. हा प्रवास नरखेडहून देगाव, वाळूज, मुंगशी, सासुरे, रातंजन, मालेगाव,
चिलवडी, राघुचीवाडी, उस्मानाबाद असा होत असे. एवढा मोठा प्रवास अनवाणी पायाने ऊन-वारा कशाचीही
तमा न बाळगता लेखकाने अनेक वेळा केलेला आहे. शिक्षणासाठी कशाचीही पर्वा न करता
धाडसाने, हिंमतीने हा प्रवास केल्याचे दिसून येते. या प्रवासाचे वर्णन वाचताना मन
भरून येते. हृदय हेलावून जाते. नरखेड ते उस्मानाबाद हा पायी प्रवास लेखकाने नववीपासून शिक्षक म्हणून नोकरी
लागेपर्यंत पायीच केलेला आहे. साठ-सत्तरच्या दशकातील समाजजीवनाचं मनमोहक,
हृदयस्पर्शी वर्णन या प्रवासाच्या माध्यमातून वाचायला मिळतं. पुढील शिक्षणासाठी
नरखेडहून पहिल्यांदाच उस्मानाबादला निघतानाचं वर्णन लेखक करतात..... तांबडं फुटताच
सर्व उरकून तयार झालो. आईनं लवकर उठून दोन भाकरी थापल्या, अन् दाळीचा पेंडपाला केला होता. दादांच्या धोतराच्या धडुत्यात भाकरी
बांधली. गोणपाटाच्या पिशवीत टाकली. आई काळजीनं म्हणाली,"रस्त्यात
पाणी बघून तिथं भाकर खा. भूक मारू नको. जपून जा. पहिल्यांदाच चाललास. वाट चुकशील.
विचारत विचारत जा. धाराशिव लांबच गाव. सांभाळून जा." या आत्मकथनातील लेखकाची
भाषाशैली वाचकांच्या हृदयाचा ठाव घेते.
लेखक सांगतात १९४५ साली शिमग्या-पाडव्याच्या
दरम्यान माझा जन्म झाला. जन्मापासूनच दुष्ट नियतीने माझा छळ मांडला होता. वयाच्या
तिसऱ्या वर्षी गंडमळा झाला व मानेला भली मोठी जखम झाली. वैद्य, देवऋषींनी इलाज
केले. या आजारपणात लेखकाला खूप वेदना झाल्या. त्यातूनच पुढे तोंडाला व्यंग निर्माण
झालं. लेखक म्हणतात, मला माझ्या सावलीची ही भीती वाटू लागली होती. लेखकाचं पहिलं
दहा वर्षाचं बालपण बंकलगीत गेलं. पुढे कुटुंबाचं नरखेडला स्थलांतर झालं. तिथेही
अभावग्रस्त जगणंच त्यांच्या वाट्याला आलं. संसारासाठी भांड्या-कुंड्याची जमवाजमव
करताना आई - दादांची झालेली ससेहोलपट लेखकाला क्षणोक्षणी वेदना देत होती. लेखक सांगतात
की आमच्यासाठी आई -दादांची धीराची वागणूक ही उद्याची नसणारी ठेव होती.
या आत्मकथनात सत्तर-ऐंशीच्या दशकातील ग्रामीण जीवनाचे अत्यंत मनोहारी वर्णन लेखकाने केलेले आहे. गावातील बलुतेदारी पद्धतीविषयी लेखक सांगतात की ग्रामीण जीवनात शेतकऱ्यांसाठी बलुतेदारी खूपच पूरक व गरजेची होती. शेतकरी कष्टानं पिकवलेलं धान्य देऊन त्याला जगवत होता. बलुती त्यांच्या घरादारापासून शेताभाताच्या गरजा भागवत होती. शेतीप्रधान व्यवस्थेत दोघांचंही परस्परांसाठी तितकंच मोलाचं योगदान होतं. खेड्यापाड्यात गुण्यागोविंदानं नांदणारी ही संस्कृती जिथं तिथं पाहावयास मिळत होती. दरम्यानच्या काळात औद्योगिक क्रांतीनं हळुहळू लोकजीवन घेरलं. तिचे परिणाम तळागाळापर्यंत पोहचले. या बदलत्या वादळाची झळ ग्रामीण व्यवस्थेला बसली. अर्थव्यवस्थेनं वेगळंच वळण घेतलं. बलुतेदारीला घरघर लागली आणि या व्यवस्थेनंच तिचा बळी घेतला. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांची हानी झाली. सामान्य शेतकऱ्याच्या हानीमुळे आज ग्रामीण भागात बिगडलेल्या अर्थव्यवस्था पाहायला मिळते.
लेखक बंकलगीत असताना कुंडलसंगमला संत गाडगेबाबांचे कीर्तन ऐकायला गेल्याची आठवण सांगतात. संत गाडगेबाबांच्या विचारांचा प्रभाव लेखकावर लहानपणीच पडलेला दिसून येतो. स्वच्छता, विवेकवाद, माणुसकी, विज्ञाननिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, करुणा, वंचिताविषयी तळमळ असे सद्गुण लेखकाच्या अंगी आपसुकच रुजले गेले. त्यामुळे पुढे उस्मानाबाद जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ एम. डी देशमुख सरांनी नेटाने चालवलेली दिसून येते. लेखक अनेक वर्ष उस्मानाबाद जिल्ह्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष होते. त्याकाळात जातीपातींच्या कर्मठ रूढींना लेखकाने मानले नाही. लेखक एका ठिकाणी सांगतात की आमच्या घरातुन बाबूमामा वडापासून सर्व जाती-धर्माची माणसं आप परभाव न ठेवता वावरत होती. जाती धर्मापेक्षा माणूसपण जपण्याचा गुण आमच्या दादांच्याकडे अधिकच होता. तो संस्कार आम्हा बहीण-भावांच्या ठायी रुजला. लेखक गरीब देशमुख कुटुंबातून आलेले आहेत. मराठा समाजातील हुंडा, आहेर, लग्नकार्यात वारेमाप खर्च करणे या अनिष्ट प्रथांबद्दलचे काही प्रसंग मन हेलावून टाकतात. देशमुख असूनही आहेराला पैसे नसल्यामुळे होणारा अपमान त्यांच्या कोवळ्या मनाला डागणी देतो. लेखक सांगतात की गरिबीची लक्तरं वेशीवर टांगणाऱ्या ‘आहेर’ नावाच्या लग्नातल्या रुडीनं मला घायाळ केलं. सामाजिक विस्थापितांच्या दैन्य, दारिद्र्यची दाहकता जेवढी तीव्र असते, तितकीच ती आर्थिक विस्थापितांच्या वाट्याला आलेली असते. हीच परिस्थिती आजही बदलेली दिसून येत नाही. आजही मराठा समाजात या अनिष्ट रूढी परंपरा सुरू असलेल्या दिसून येतात. नवीन पिढीने तरी निदान बिगर हुंड्याचं लग्न करायला हवं. मराठा समाजातील हुंडा या अनिष्ट कृतीबद्दल लेखक सांगतात की त्याकाळात व आजही विशेषतः मराठा समाजात हंडा देण्या-घेण्याच्या प्रथांना वाजवीपेक्षा अधिक महत्त्व होते व आहे. जास्तीत जास्त हुंडा व करणीधरणी यावर प्रतिष्ठा मोजण्याची रूढीच होती. या खोट्या प्रतिष्ठेच्या रुढी-परंपरेला समाज बळी पडला. त्यासाठी कर्ज काढून बारेमाप खर्चाच्या ओझ्यानं कफल्लक होणं आलंच. समाजात या संबंधात एक म्हण रुढ झालेली ‘रीन फिटेल पण हीन फिटत नसतं.' ही हीनता येऊ नये म्हणून आपलं स्थावरही पणाला लावलं जायचं. आजही याचं आचार-विचाराचे भूत मराठा समाजाच्या मानगुटीवर स्वार आहे.
लेखक १९७० ला स्वतःचं लग्न साध्या पद्धतीने करून समाजासमोर आदर्श उभा करतात.लेखकानं जगण्याचं स्वतःचं एक आदर्श तत्वज्ञान अंगीकारण्याचा प्रत्यय आत्मकथन वाचताना येतो. आज समाजातील तरूण यापासून काहीतरी शिकतील हा आशावाद बाळगायला हरकत नाही. आपल्या पत्नी विषयीचा आदरभाव, कृतज्ञता या आत्मकथनात पानोपानी वाचायला मिळते. लेखक आपल्या पत्नीविषयी लिहितात की कितीतरी काळ तिला उपेक्षित जीणं जगावं लागलं. तिच्या वाट्याला आलेले भोग तिनं संयमानं पचविले. कधीच आक्रस्ताळेपणा केला नाही. संसाराच्या अंधारलेल्या वाटचालीत उषा आमच्या परिवारात पहाट होऊन आली होती. त्यामुळेच उज्वल प्रकाशकिरणांचा मागोवा घेणं सोपं झालं. लेखक त्यांचे काका उद्धवरावदादांच्या आठवणी सांगतात. उद्धवरावदादांचा सहवास लेखकांना समृद्ध करून गेला.अडचणीच्या काळात ते उद्धवरावदादांचा सल्ला घेत असत.त्या काळातील राजकीय परिस्थितीचे, निवडणुकीचे, प्रचाराचे, प्रचारसभांचे अनेक प्रसंग खूप उत्तम पद्धतीने सांगितले आहे. लेखक सांगतात की दादांनी आपल्या आयुष्यात समाजाप्रति समर्पित केलं होतं. ‘सामान्यांचा कैवारी’ असाच त्यांचा लौकिक होता. त्यांनी दिलेलं सामाजिक व राजकीय योगदान सर्वमान्य होतं. मला त्यांच्या विचारांचा वारसा मिळाला. त्यांच्या सहवासात माझं आयुष्य उजळून निघालं. उद्धवरावदादांच्या कॅन्सरच्या आजारपणातील आठवणी हृदय पिळवटून टाकतात.
एम.डी. देशमुख सरांना संताजी,सचिन व संजय ही तीन मुलं. डॉ. संताजी, डॉ. सचिन व संजय या तिन्ही मुलांच्या जडणघडणीच्या काळातील आठवणी लेखकाने सांगितलेल्या आहेत. मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, त्यांच्या व्यवसायात, नोकरीत स्थिरावणं याबद्दल आठवणी खूपच छान आहेत. डॉ. संताजी, डॉ. सचिन व सुना डॉ. संगीता व डॉ. शिल्पा यांनी सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेचा, गरीब व दुर्बल वंचितांना मदतीचा वसा घेतलेला आहे असे लेखक अभिमानाने सांगतात. आपल्या तिसऱ्या मुलाने संजयने क्रीडा शिक्षक म्हणून हॉलीबॉल खेळात राज्य स्तरावर केलेल्या चमकदार कामगिरीची तोंडभरून कौतुक करतात. घरात कुठलेही पाठबळ नसताना स्वतःच्या हिंमतीवर छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेची स्थापना, मुख्याध्यापक संघाची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम याबद्दल लेखकाने आत्मकथनाचा शेवटच्या टप्प्यात हा प्रवास कथन केलेला आहे. या पन्नास-साठ वर्षाच्या संघर्षाच्या काळात ज्या ज्या व्यक्तीनं त्यांना मदत केली. त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख पानोपानी केल्याचं आढळतं. खास करून त्यांच्या विद्यार्थ्यांनींचा उल्लेख ते विद्यार्थी लेक असा करतात प्रसिद्ध साहित्यिक डॉ. वृषाली किन्हाळकर या त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांनी एका कार्यक्रमात एम.डी. देशमुख सरांचा आदराने उल्लेख केला होता हे आवर्जून सांगतात.
हे आत्मकथन एका शेतकरी आर्थिक विस्थापित कुटुंबातील मुलाचं आहे. एका गरीब शेतकऱ्याच्या मुलानं स्वतःच्या बळावर, हिंमतीवर आकाशाला गवसणी घातली. महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. विवेकवादाचा, माणुसकीचा, विज्ञानाचा पुरस्कार करून माणसं जोडली. नाती टिकवली. अवघ्या कुटुंबाचे पालन पोषण करत संपूर्ण आयुष्य कुटुंब व समाजाच्या हितासाठी झिजवलं अशा एका संघर्षाची हृदयस्पर्शी कथा आहे. गेल्या पन्नास वर्षातील सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, राजकीय पट चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर उभा राहतो. हे आत्मकथन मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरेल असा विश्वास वाटतो.
आत्मकथन – वादळवाट
लेखक – एम.डी.देशमुख
प्रकाशन – ग्रंथाली प्रकाशन,मुंबई.
ग्रंथ परिचय – समाधान शिकेतोड
पृष्ठे – ४००
मूल्य – ४००
No comments:
Post a Comment