Sunday, 10 April 2022

जादुई जंगल-पुस्तक परिचय

गोव्यातील गोवन वार्ता वर्तमानपत्राच्या तरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेला जादुई जंगल या बालकादंबरीचा परिचय

पुस्तकाचे नाव - जादुई जंगल 
लेखक - समाधान शिकेतोड 
प्रकाशक - राजहंस प्रकाशन
पुस्तक परिचय - मुग्धा मणेरीकर 

लहान मुलांच्या दुनियेत शिरून त्यांचे भावविश्व अनुभवण्यासाठी जादुई जंगल हे एक उत्तम पुस्तक आहे. वयवर्षे चार पासून यातील लहान लहान गोष्टी मुलांना वाचून दाखवता येण्यासारख्या आहेत. जादुई जंगल ही लहान मुलांची गोष्ट असली तरी ती फक्त लहान मुलांपर्यंत मर्यादित आहे, असे नाही. वाचता येणारी मुले ते मोठी माणसे ही गोष्टअगदी आनंदाने वाचू शकतात. 
ही गोष्ट आहे एका जंगलाची. एक मोठे जंगल, त्यातील नद्या, डोंगर यांचे वर्णन अतिशय सुंदर आहे. या वर्णनांमध्ये एकसंधपणा आहे. एक कथा संपली तरी त्यातील वर्णने, संदर्भ पुढच्या कथेत हळुवारपणे येतात. यामुळे साहजिकच वाचक गोष्टीत गुंतला जातो. लहान मुलांना त्यांच्या विश्वात रमवणारे आणि मोठ्यांना सुद्धा काही काळ वास्तव विसरायला लावणारी ही वर्णने या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. 
जंगलात एक ससा येतो ज्याला जादू करायची कला अवगत असते आणि सुरु होते ही जादुई जंगलाची गोष्ट. सशाच्या करामती, त्याला लबाड प्राण्यांमुळे होणारा त्रास ते सगळ्या प्राण्यांची त्याला मिळणारी सोबत अशी ही लहानशीच गोष्ट असली तरी त्यातील कल्पकतेमुळे मुलांना आवडेल अशी आहे. 
प्राण्यांची शाळा, माकडांचा दवाखाना, जत्रा, कोकिळेने घेतलेले संगीताचे वर्ग आणि जोडीला जादू येणाऱ्या काही प्राण्यांच्या करामती अशा अनेक गंमती या पुस्तकात आहेत. 
जंगल वाचवण्यासाठी प्राण्यांनी तयार केलेली रोपवाटिका, त्यात वापरलेल्या बांबूच्या पाईपलाईन, प्राण्यांचा गुप्तहेर गट, माकडांना बांधून दिलेली घरे यामुळे मुलांना नेहमीच्या गोष्टींमधून देखील वेगळ्या दिशेने विचार करण्यासाठी लेखकाने चालना दिली आहे. कथेच्या शेवटी कोणताही बोध अधोरेखित करून लिहिण्याची गरजच यातील गोष्टींना नाही, कारण लेखकाने आपल्या लेखन कौशल्याने ते अलगदपणे कथेतच गुंफले आहेत. यामुळे मुलांना या गोष्टी वाचताना कंटाळा आजिबात येणार नाही व योग्य शिकवण मिळेल. 
सुटीत मुलांना वाचायला आवर्जून द्यावे अथवा मुद्दाम वाचून दाखवावे असे हे कल्पकतेने परिपूर्ण असे पुस्तक आहे. साधीशीच गोष्ट असली तरी ती रंगवून, मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करून कशी लिहावी याचे हे पुस्तक म्हणजे उत्तम उदाहरण आहे. 
मुलांबरोबर वेळ घालवण्यासाठी, आईवडील व मुले एकत्र काय करू शकतात या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जादुई जंगलचे वाचन. लहान मुलांबरोबर मोठ्यांना सुद्धा वाचनाचा आनंद देणाऱ्या या कथा या उन्हाळी सुट्टीत नक्कीच लोकप्रिय ठरतील.

No comments:

Post a Comment