Thursday, 23 April 2020

चाकोरी सोडून स्वप्न पाहणारा माणूस.....

एक साधा हॉटेलवाला ते जगभर रेस्टॉरंट,पंचतारांकित हॉटेलची साखळी निर्माण करणारा उद्योगपती हा थक्क करणारा प्रवास "इडली, ऑर्किड आणि मी!" या आत्मकथनात डॉ.विठ्ठल व्यंकटेश कामत यांनी मांडला आहे.पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी चाकोरीच्या बाहेर जाऊन सातत्याने वेगळं काहीतरी करून आपले ध्येय साध्य करणारा माणूस म्हणजे डॉ.विठ्ठल व्यंकटेश कामत.पर्यावरणाचा तोल सांभाळणारे सर्वोत्कृष्ट ऑर्किड हे हॉटेल उभं केलं.
लेखकाने आपल्या स्वप्नपूर्तीसाठी केलेला जिवनाचा संघर्मय,प्रेरणादायी प्रवास प्रामाणिकपणे,या आत्मकथनातून मांडला आहे.

 लेखकाच्या घरचा व्यवसाय हॉटेलचा होता.लेखकाची आई ईडली खूप छान बनवायची.ते इडली बनवण्याचे कसब लेखकाला चांगले जमले होते.या इडली मुळेच लेखकाला जगभर फिरण्याची संधी मिळाली. इग्लंड,इटली,जपान या देशात लेखकाने त्या देशातील लोकांना ईडलीची डीश बनवून दिली.आपल्या मुलाने स्वतःच्या हिंमतीने व्यवसाय उभा करावा.असे लेखकाच्या वडिलांना वाटत असे.त्यासाठी लेखकाने खूप प्रयत्न केले. मानापमान,निराशा,धोका,अपयश या सगळ्या गोष्टी वाट्याला आल्या. कधीकधी आभाळ कोसळलं,पण त्या कोसळलेल्या आभाळाच्या ढिगा-यावर उभा राहून यशाला  आपलंसं करणारा हा माणूस!

एक चांगला माणूस,यशस्वी उद्योजक  म्हणून डॉ.विठ्ठल कामत यांची ओळख या आत्मकथनातून होते.लेखकाच्या कुटुंबात त्यांच्यासह सहा भावंड होती. लहानपणीच्या खूप चांगल्या आठवणी लेखकाने सांगितल्या आहेत.लेखक बालपणीचे वर्णन करताना म्हणतात, "ग्रँड रोड स्टेशनजवळच्या गणेश प्रसादा मधला आमचं घर बऱ्यापैकी छोटं होतं.एक बेडरूम किचन आणि गॅलरी अशा ह्या घरात आई-वडिलां सकट आम्ही सहा भावंडं राहत होतो." आई विषयी लेखक म्हणतात, "प्रचंड उरक आणि प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे माझी आई".

लेखकाचे वडील आठव्या वर्षी नातेवाईकांसोबत मुंबईला आले.या कोवळ्या वयात हॉटेलमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली.याबद्दल लेखक म्हणतात, "त्यांच्या आयुष्याची सुरुवात अशी कष्टाने झाली.त्यांनी आयुष्यभर कामाचा ध्यास घ्यावा, ह्यात नवल नाही. व्यंकटेश कामत या व्यक्तीमध्ये कमालीची सचोटी,कमालीची शिस्त,कमालीचा कामसूपणा होता".वडील दुसऱ्याच्या मदतीला धावून जात असत.लेखकाला वडिलांबद्दल आदरयुक्त भिती होती. आई-वडिलांबद्दल लेखक म्हणतात, "आई-वडील दोघेही देणारे होते, त्यांनीच आपल्या कृतीने एक आदर्श निर्माण केला."

मी तारुण्यात एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो.बिअर प्याली होती.असे लेखक प्रामाणिकपणे सांगून टाकतात.लेखकाने बंगलोरला आपल्या एका नातेवाईकाच्या रेस्टॉरंटमध्ये नवनवीन प्रयोग करून बघितले.तेथिल रेस्टॉरंटचे निरीक्षणअभ्यास केला.आता त्यांना बाहेरचं जग खुणावू लागलं होतं.काहीही पैसे न घेता वडीलांच्या परवानगीने लंडन गाठलं.एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये नोकरी सुरू केली.पुन्हा तिथेही डिश बनवण्यात नाविन्यपूर्ण प्रयोग केले.या रेस्टॉरंटमध्ये गि-हाईक दुपटीने वाढले. तिथेही छान खुसखुशीत इडली बनवली.लोकांना ती खूप आवडली. ब्रिटिश ग्राहकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी यांचा अभ्यास करून वेगवेगळ्या डीश बनवल्या.यामुळे  रेस्टॉरंटच्या मालकिनीने खुश होऊन माझ्या मुलीशी लग्न कर.असा प्रस्ताव लेखकासमोर ठेवला.त्याला नम्रपणे नकार देऊन काम सुरू ठेवले.तिथून पुढे लेखक इटलीला गेले.तिथेही पैशाची कमतरता भासत होती. हॉटेलच्या रूमच्या भाड्याएवढेच पैसे लेखकाजवळ होते.मग काय! त्यांनी स्वतःच्या रूमला ऑफिस बनवून शेजारच्या टूर्सवाल्यांना हॉटेलमधील स्टाफच्या मदतीने ज्यूस व थंड पाणी द्यायला सुरुवात केली.त्यात त्यांनी  भरपूर नफा कमावला.कुठे रेस्टॉरंटमध्ये नाचगाण्याचे प्रयोग केले.एक एक देश लेखक फिरत होते.प्रत्यक्ष जगण्यातल्या अनुभव घेत होते.लेखक म्हणतात,"जगण्यातल्या मुशाफिरीचा आणि उमेदवारीचा काळ खूपच कठीण होता.तितकाच थरारक होता.लेखक म्हणतात,तरूण  वयातल्या या अनुभवामुळे मी एक गोष्ट सांगतो, "तुमच्या पोटात भूक, डोक्यात लाज नसेल आणि मनगटात जिद्द असेल.तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतात."

लेखकाने सर्जनशीलता,कल्पकता वापरून वाटचाल सुरूच ठेवली होती. प्रत्येक कल्पनेचा पाठपुरावा केला. प्रचंड मेहनत घेतली.कुठलाही दुरभिमान बाळगला नाही.लेखक म्हणतात,"मी स्वतःला बिजनेसमन म्हणत नाही. मी आहे आंत्रप्रिनर. आंत्रप्रिनर म्हणजे चाकोरी सोडून स्वप्न पाहणारा माणूस.

लेखकाचा लोकसंग्रह दांडगा आहे. निरपेक्ष वृत्तीने प्रत्येकावर प्रेम करणे, चांगुलपणा दाखवणे यामुळे त्यांनी  माणसं जोडली.लेखक म्हणतात, "चांगुलपणा देण्याने कमी होत नाही उलट देण्यानं वाढतो.आयुष्यात तुम्हाला कधी कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही."


आत्मकथन जगण्याला बळ देणारे  आहे.आपल्यासोबत इतरांनाही मोठे  करणारा माणूस,निसर्गाशी मैत्री ही जीवनपद्धती असणारा माणूस,या  आत्मकथनातून अनुभवायला मिळातो.आत्मकथन वाचताना मन भरून येतं.प्रत्येकालाच आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर खाच-खळगे यांना सामोरे जावं लागतं.या जीवन प्रवासात माणूसपण जपून प्रगती करत राहणं फार महत्त्वाचं असतं.प्रत्येकानं हे आत्मकथन वाचायला हवं.

इडली ऑर्किड आणि मी! - डॉ. विठ्ठल व्यंकटेश कामत
मॅजेस्टिक प्रकाशन ठाणे
मुल्य दोनशे रुपये
आवृत्ती-चौतीसावी 

पुस्तक परिचय
समाधान शिकेतोड
samadhanvs@gmail.com

No comments:

Post a Comment