Sunday, 19 April 2020

समिक्षण बालसाहित्याचे .......

 
गेल्या अनेक वर्षांपासून खुप सारं लेखन मुलांसाठी लिहलं गेलेले आहे.सानेगुरूजी,ग.दि.माडगूळकर,अनिल अवचट,यदुनाथ थत्ते,मंगेश पाडगावकर,भा.रा.भागवत,रा.रं.बोराडे,महावीर जोंधळे,बाबा भांड,विजया वाड,राजीव तांबे पासून अगदी अलिकडे सुरेश सावंत,एकनाथ आव्हाड,दत्ता हलसगीकर,आबा महाजन,विशाल तायडे,फारूक काझी,नरेंद्र लांजेवार,बालाजी इंगळे अशा बालसाहित्यक लेखकांची आपल्याला समृद्ध परंपरा लाभलेली आहे.या साहित्यिकांच्या लेखणीने खुप दर्जेदार बालसाहित्य निर्माण झाले.आजही काही बालगीते,कविता आपल्या ओठांवर गुणगुणत राहतात.असा बालसाहित्याचा समृद्ध ठेवा असतानाही मुलांना नेमकं काय वाचायला द्यायला हवं? असा प्रश्न पडतोच.बालसाहित्याच्या अभ्यासक,मुलांसाठी सातत्याने लिहणा-या प्रा.विद्या सुर्वे-बोरसे यांनी स्वतःच्या मुलांसोबत वाचनाच्या केलेल्या प्रयोगावर आधारीत सुंदर असे मुलांसाठी बालसाहित्य समिक्षण केलेले आहे.

मुलं कथा,कविता,चरित्र वाचायला प्रेरित होतील अशा पद्धतीने लेखिकेने मांडणी केली आहे.बाबा भांड यांच्या "गोष्ट महाराजा सयाजीरावांची" या किशोर कांदबरीचा सारांश मुलांना ही किशोर कांदबरी वाचण्याची उत्सुकता वाढवितो.लेखिका आग्रहाने सांगतात की आपल्या घरच्या ग्रंथालयात माधुरी पुरंदरे यांची पुस्तके असलीच पाहिजेत.'वाचू आनंदे' व 'लिहावे नेटके' ही माधुरी पुरंदरे यांची पुस्तके आपल्याला भाषासमृद्ध बनवतात. वाचायचं कशासाठी? याबद्दल माधुरीताई सांगतात," साधं आणि अगदी खरं उत्तर आहे आनंदासाठी...पुस्तकं कल्पनेच्या अद्भूत राज्यात घेऊन जातात,आपल्यालाही स्वप्न दाखवतात,स्वप्न पाहायला शिकवतात आणि मग खरी करण्यासाठी बळंही देतात...पुस्तकं केवळ आपण न पाहिलेलं जग आपल्याला दाखवतात असं नव्हे,तर आपण पाहत असलेलं,ज्या जगामध्ये आपण असतो, ते जगही पाहायला आणि समजून घ्यायला शिकवतात."

कान असुन बहिरा कोण?
इथेच आहे पण दिसत नाही?
लढला बरं डोकं...अगदी फटाफट. ज्योती कपिले यांच्या कोड्यांच्या पुस्तकांबद्दल सांगीतलेले आहे.भाषिक  कोडी,तार्किक कोडी,शब्द कोडी मुलांना चिकित्सक व सर्जनशील विचार करायला लावतात.

लक्ष्मीकांत देशमुख यांच्या दूरदर्शन हाजीर हो ऽऽ,नरेंद्र लांजेवार यांच्या कथांकुर,बालानुभव यांच्याबद्दल बालमित्रांना उत्सुकता वाढविणारी माहिती लेखिकेने सांगितली आहे.स्वाती राजे यांच्या 'रस्ता','पाऊस'या पुस्तकातील कथानक लेखिका रंजक पद्धतीने मांडतात.अशी पुस्तके मुलांसोबत वाचल्यावर,मुले संवेदनशीलपणे विचार करायला लागतात.स्वतःची मते,प्रतिक्रिया व्यक्त करतात.मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येऊ लागतो.लोकशाही व्यवस्थेतला एक सुजाण नागरिक घडण्यास मदत होते.

अहिराणी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची बोलीभाषा आहे.या बोलीतील "मन्हा मामाला गावले जाऊ" या कवितासंग्रहाचा छान परिचय करून दिला आहे.पाठ्यपुस्तकातुनही महाराष्ट्रातील  वेगवेगळ्या भागातील बोलींची ओळख करून दिली जात आहे.मुलांना हा भाषिक समृद्ध ठेवा यामुळे समजायला मदत होईल.

मदन हजेरी यांचा 'पुस्तकांची पेटी' हा कथासंग्रह,सुभाष विभुते यांची 'नाथा' ही बालकादंबरी,मालविका देखणे यांची 'डिटेक्टिव्ह हर्षदच्या कथा' या बद्दल लेखिकेने बालमित्रांच्या  वाचनाची उत्सुकता,उत्कंठा वाढविली आहे.महाकवी ग.दि.माडगूळकर आठवले की "नाच रे मोरा" ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही.त्यांची अजरामर गीते,बालकविता ऐकत ऐकतच प्रत्येकाचं बालपण सरलं आहे. त्यांच्या समग्र बालसाहित्याचा परिचय बालमित्रांना लेखिकेने करून दिला आहे. 

बालभारती कडून प्रकाशित होणा-या 'किशोर' मासिकातील निवडक साहित्यांचे खंड तयार करण्यात आले आहेत.या खंडातील नामवंत साहित्यिकांच्या कथा,कविता,एकांकिका,चरित्र या बालसाहित्याचा परिचय करून दिला आहे. 

मुलांसाठी सातत्याने लेखन करणारे पृथ्वीराज तौर,एकनाथ आव्हाड यांच्या कथा,कविताबद्दल लेखिकेने सांगीतले आहे. पृथ्वीराज तौर यांनी जगभरातील बालसाहित्यक बालमित्रांना मराठीत अनुवादीत करून दिले आहे. 

प्रतिमा इंगोले यांचा बालकुमांरासाठी लिहलेला 'सख्यांच्या गोष्टी'मधील ह्रद्यस्पर्शी चित्रण आलेले आहे.प्राणीमात्रांवर प्रेम करावे.हा संदेश यातून मिळतो.राजीव तांबे यांची  'गंमत शाळा',अनिल अवचट यांच्या 'सृष्टीत गोष्टी',दिलीप प्रभावळकर यांचे 'बोक्या सातबंडे' या साहित्याबद्दल बालमित्रांच्या मनात कुतूहल निर्माण होते.

  चंद्रकांत खोत यांनी मालवणी भाषेत लिहलेल्या 'चणिया मनिया बोर' या बालकथा ह्या वेगळ्या धाटणीच्या आहेत.यातील कथानकांची उकल बालमित्रांना लेखिकेने करून दिली आहे. प्रसिद्ध साहित्यिक रा.रं बोराडे यांच्या 'संकल्पाचे दारी' ही  किशोर कांदबरी बालमित्रांमध्ये जिद्द,मैत्री,कष्ट  यांची रूजवणूक करते.याबद्दल सांगितलेले आहे.अशोक पाटील यांचा 'आभाळमिटी' हा बालकवितासंग्रह तसेच रा.ग.हर्षे यांचे श्री क्षेत्र नाशिक हे प्रवासवर्णन वाचण्याची उत्सुकता बालमित्रांना लागते.

आज मुलांच्या सर्जनशीलतेला,कल्पकतेला धुमारे फुटलेले आहेत.मुले छान छान कविता,कथा लिहीत आहे.सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात सहावीच्याच विद्यार्थीनीची कविता आली आहे.काही मुलांना महाराष्ट्र शासनाचे राज्य वाड्मय पुरस्कार मिळाले आहेत.मुलांच्या साहित्याची दखल लेखिकेने घेतली आहे.नामदेव माळी,तृप्ती अंधारे,डाॅ.निता उपासनी,डाॅ. पृथ्वीराज तौर यांनी मुलांच्या कवितांचे  संपादन करून  कवितासंग्रह काढलेले आहेत. यांचा परिचय लेखिकेने करून दिला आहे. किरण केंद्रे या पुस्तकाची पाठराखण करताना म्हणतात,"साहित्याची गोडी बरोबर आस्वादाची आणि पर्यायाने समिक्षेची दृष्टी विकसीत करण्यात या पुस्तकाची मुलांना मदत होईल."मुलांनी काय वाचावे? यासाठी लेखिकेने काही पुस्तकांची यादी शेवटी दिली आहे. 

लेखिका वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका असुन मुलांसाठी सातत्याने लेखन करत असतात.विद्यार्थी,शिक्षक,पालक,शिक्षण क्षेत्रात काम करणा-या सर्वांनी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. 

बालसाहित्यक:आकलन आणि समिक्षा 
प्रा.विद्या सुर्वे-बोरसे 
किंमत  २२० रू
स्पर्श प्रकाशन,राजापूर 

पुस्तक परिचय 
समाधान शिकेतोड
samadhanvs@gmail.com

No comments:

Post a Comment