Sunday, 19 April 2020

आनंददायी आणि दर्जेदार बालकविता : पोपटाची पार्टी

मुलांना मजेशीर, रोमहर्षक, उत्कंठावर्धक, अद्भुत, अफलातून असं वाचायला आवडतं. संस्कारक्षम, नैतिक मूल्ये असं वाचायला आवडत नाही असं नाही. पण हे सगळं अद्भूततेत दडलेलं मुलांना आवडतं. म्हणजे सरळ सरळ संस्काराचं तुम्ही सांगत असाल तर मुलं दुर्लक्ष करतात. किंवा त्यांना ते आवडत नाही. भावत नाही. म्हणून बालसाहित्यिकांसमोर आवाहन असते की मजेशीर, रोमहर्षक, उत्कंठावर्धक, अद्भुत, अफलातून तर लिहायचे आहे; पण संस्कार , मूल्य पण सोडायचे नाहीत. आणि आपला मजकूरही वाचनीय झाला पाहिजे. अशा कसोटीवर बरेच बालसाहित्यिक उतरतात. पण बरेचजण चाचपडत राहतात. 
ज्यांचा पहिलाच बालकविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला असे  कवी समाधान शिकेतोड यांनी या कसोटीवर उतरण्याच्या वाटेवर चालण्यास सुरूवात केली आहे, ही समाधानाची बाब आहे.

'पोपटाची पार्टी' हे काव्यसंग्रहाचे शीर्षकच मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करणारे आहे. पोपटाची पार्टी असेल अशी अशा उत्सुकतेने मुले वाचायला सुरुवात करतात आणि त्यांची उत्सुकता वाढत जाते. शाळेतून आला एक बेडूक, पहिला दिवस, गंमत जंमत, पोपटाची पार्टी, कावळा आणि कोकाकोला, खारुताई आणि माकड, डाळींची सभा, कुकरची शिट्टी अशा कवितांमधून ही उत्सुकता आणखीनच वाढत जाते मुलांना उत्कंठावर्धक आणि मजेशीर लेखन हवे असते ते या कवितांमधून मुलांना वाचायला मिळते. वेगवेगळ्या कल्पना आणि निखळ आनंद नेमक्या शब्दात पकडण्या मध्ये इथे कवी यशस्वी झाले आहेत.

निखळ आनंद देणाऱ्या जशा बालकविता या संग्रहामध्ये आहेत तशाच शेतकरी बापाच्या कष्टाविषयीची जाणीव व्यक्त करणाऱ्या कविता, आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या खास व्यक्तींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कविता, मुलांना स्वतःच्या कर्तव्याची नकळत जाणीव करून देणार्‍या कविता या संग्रहामध्ये आहेत.

बालसाहित्यामध्ये  ग्रामीण पार्श्वभूमी असलेले साहित्य खूप कमी प्रमाणात आलेले आहे पण कवी समाधान शिकेतोड यांनी लिहिलेल्या या काव्यसंग्रहामध्ये ग्रामीण पार्श्वभूमीवर लिहिलेल्या काही बालकविता अतिशय सुंदर रित्या उतरलेल्या आहेत. बैलगाडी, गुऱ्हाळ, अमराई, झाडावरची मजा, जत्रा इत्यादी कवितांमधून ग्रामीण भागातील अतिशय सुंदर आणि आनंददायी वातावरण त्यांनी या कवितांमध्ये मांडले आहे. तसेच गारपीट आणि औत या दोन कवितांमधून शेतकरी बापाची परिस्थिती आणि मनस्थिती ही मुलांना समजेल - उमजेल आणि भावेल अशा शब्दात कवीने ताकतीने मांडली आहे. या कवितांमधून कवी फक्त व्यथा मांडत नाहीत तर आपल्या शेतकरी बापाला मदत करण्याची हिम्मत मुलांना ते कवितेमधून देतात. 'गारपीट' या कवितेच्या शेवटी ते लिहितात -

मीच माझ्या बापाला 
हिम्मत आहे देणार 
स्वार्थी हाताची 
मदत नाही घेणार.

जत्रा या कवितेमध्ये जत्रेचे हुबेहूब चित्र कवी उभे करतात. पण कवितेच्या शेवटी जत्रेमध्ये सगळ्या जाती धर्माची माणसे कशी एकत्र येतात हा संदेश नकळत ते मुलांना द्यायला विसरत नाहीत. या कवितेच्या शेवटी ते लिहितात - 

 सगळ्या जाती धर्माची माणसं 
जत्रेत एकत्र येतात 
प्रेम देत एकमेकांना 
आपापल्या घरी जातात.

समाजासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या पोस्टमॅन, पोलीसदादा, वैज्ञानिक, शेतकरी बाप यांच्याबद्दलची कृतज्ञता आपल्या मनात असायला हवी हे आपल्या कवितेमधून ते अगदी सहजपणे नमूद करून जातात. वैज्ञानिक अहोरात्र कष्ट, अभ्यास करून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे काम करतात याची जाणीव या कवितेतून मुलांना कवी करून देतात; आणि या सगळ्या कर्तृत्ववान माणसांची आठवण आपण कशी ठेवावी हे कवितेच्या शेवटी सांगताना ते लिहितात - 

असे असतात वैज्ञानिक 
ज्यांची आठवण करावी 
त्यांच्या कर्तृत्वाची गोष्ट 
मनामनात स्मरावी.

मुलांना सरळ-सरळ संस्कार रुचत नाहीत याची जाणीव कविला आहे. म्हणूनच अगदी नकळतपणे मुलांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. यामध्ये झाड, स्वच्छता दूत, जग जिंकण्यासाठी, वाचनाची आवड आणि चिऊताई या कवितांचा समावेशा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात चिमणी पाणी पिण्यासाठी अंगणात आल्यानंतर ती कशी कासावीस होते याचे चित्रण 'चिऊताई' या कवितेत कवी करतात आणि शेवटी महत्वाचे दोन वाक्य कवितेमध्ये लिहून जातात. ती अशी - 

दाणा-पाणी देऊन 
त्यांची काळजी घेऊ 
मानवतेची पताका 
उंच उंच नेऊ.

त्याच प्रमाणे 'झाड' या अल्पाक्षरी कवितेमध्ये कवी अगदी सहजपणे लिहून जातात-  

झाड लावू 
एक तरी 
सावली मिळेल 
खरी खरी 

झाड झाड 
लावू लावू 
ग्रीन इंडिया 
पाहू पाहू.

कवी समाधान शिकेतोड यांनी या संग्रहातील केवळ अठ्ठावीस कवितांच्या माध्यमातून बाल विश्वातील असे वेगवेगळे विषय अतिशय संयतपणे हाताळले आहेत. या संग्रहातील भाषा अतिशय साधी - सोपी आणि संवादी अशी आहे. कुठेही पाल्हाळ लावलेले नाही. नेमकेपणाने जे सांगायचे आहे ते निवडक आणि चपखल अशा शब्दांमध्ये त्यांनी मांडलेले आहे. मुलांना कशा पद्धतीने आणि काय वाचायला आवडते याची नेमकी नस कवीला सापडलेली आहे. त्यामुळे या कविता मुलांसाठी अतिशय आनंददायी, दर्जेदार आणि शेवटी काहीतरी मुलांना देणाऱ्या अशा आहेत. प्रमोद दिवेकर यांनी काढलेले कविता संग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय देखणे आणि मुलांना आवडणारे असे झाले आहे. तसेच या बालकविता संग्रहाची पाठराखण किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी अतिशय मोजक्या पण प्रभावी शब्दांमध्ये केली आहे. या देखण्या पुस्तकाच्या रूपाने छान छान कविता मुलांना दिल्याबद्दल कवी समाधान शिकेतोड यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा.

      - पुस्तकाचे नाव - पोपटाची पार्टी (बालकविता संग्रह)
      - कवी समाधान शिकेतोड
      - इसाप प्रकाशन, नांदेड
      - पृष्ठे- ३२, किंमत- ६० रू.  

पुस्तक परिचय - बालाजी मदन इंगळे
मो. 9881823833.


No comments:

Post a Comment