निष्ठा या देशव्यापी प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी मानव संसाधन विकास मंत्रालय व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे च्या वतीने करण्यात आली. हे प्रशिक्षण इयत्ता पहिली ते आठवीला अध्यापन करणारे शिक्षक तसेच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी,विषय सहायक,विषय साधनव्यक्ती,यांना देण्यात आले. अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित विषयाचे अध्यापनशास्त्र, नेतृत्वविकास, आरोग्य शिक्षण, कला शिक्षण, ग्रंथालय,पर्यावरण क्लब, शाळा पातळीवरील मूल्यमापन अशा विविध विषयाच्या अनुषंगाने प्रशिक्षण संपन्न झाले.
या प्रशिक्षणात मी उस्मानाबाद तालुक्यासाठी मराठी विषयासाठी KRP म्हणून भूमिका पार पडली.उस्मानाबाद डायट चे प्राचार्य मा.डॉ इब्राहिम नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यातील निष्ठा प्रशिक्षणाचे नियोजन उत्तम केले होते.आमची उस्मानाबाद तालुक्याची SRP व KRP ची टीम अतियश उत्तम होती.यामध्ये SRP मा.नारायण मुदगलवाड व KRP म्हणून श्रीमती.दैवशाला हाके,श्री.निलेश नागले, श्रीमती.सुनिता वाकुरे, श्री.महेश अनपट अशी आमची टीम होती. सर्वांनी आपापल्या विषयाची उत्तम तयारी केली होती. उस्मानाबाद तालुक्यातील निष्ठा प्रशिक्षणाच्या पाच बॅच संपन्न झाल्या होत्या.या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षाणार्थ्यांचे तीन कुल तयार करण्यात आले होते.राज्यस्तरावरील मार्गदर्शक सूचनेनुसार निष्ठा प्रशिक्षणाची तयारी करण्यात आली होती.मी अभ्यासक्रम,अध्ययनार्थीकेंद्रित अध्यापन शास्त्र,अध्ययन निष्पत्ती आणि सर्व समावेशक शिक्षण व भाषेचे अध्यापन शास्त्र या दोन विषयावर प्रशिक्षानार्थ्यांशी संवाद साधत होतो.या विषयांच्या संदर्भाने निष्ठा शिक्षक प्रशिक्षण घटक संच व इतर संदर्भसाहित्याचा अभ्यास केला होता.त्यामुळे अगदी आत्मविश्वासपूर्वक सर्वांशी संवाद साधला.मी राज्याच्या अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर मराठी विषयासाठी गेल्या पाच वर्षापासून काम करत आहे.त्या अनुभवाचा,अभ्यासाचा उपयोग मला माझ्या विषयाची मांडणी करण्यासाठी झाला.माझी अभ्यासपूर्ण विषय मांडण्याची शैली प्रशिक्षणार्थ्यांना भावली होती.याचा प्रत्यय मला प्रत्येक तासिकेला येत होता.माझी तासिका संपल्यानंतर हमखास दोन-चार प्रशिक्षणार्थी माझ्या मागे येत असत.माझी आपुलकीने चौकशी करत असत.काहीजण विषय खूप आवडला व छान समजला असे सांगत असत.याचा मला खूप आनंद होत असे.
प्रत्येक मुल शिकण्यासाठी वर्गातील आंतरक्रिया,अध्ययन स्त्रोत,शालेय वातावरण,अभ्यासक्रम,नवीन शैक्षणिक धोरण,ग्रंथालय या विविध विषयवार प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला.या सर्वांशी संवाद साधताना अनुभवाचा,मुलांसोबत केलेल्या कामाचा कस लागत होता.प्रत्येक सत्राच्या आम्ही विषयवार पी.पी.टी. तयार केल्या होत्या.विषयाची मांडणी करताना याची मदत झाली.या प्रशिक्षण घटकसंचाची मांडणी खूप उत्तम प्रकारे केली आहे.मुख्य संकल्पना,चर्चेचे मुद्दे दिलेले आहेत.या सर्व मुद्द्यांची मांडणी करत असताना,ते सर्व दररोज करत असलेल्या मुलांसोबतच्या कामासोबत जोडले.त्यामुळे कोणतेही संकल्पना त्यांना बोजड वाटली नाही.प्रशिक्षणार्थ्यांनी समजून घेतलेली संकल्पना चर्चेतून चिंतनाच्या पातळीवर नेली.त्यामुळे त्यांना प्रत्येक विषय मुळापासून समजत गेला.नवीन शैक्षणिक धोरणावर,मूल्यमापन पद्धतीवर काही प्रशिक्षणार्थ्यांनी आपली अभ्यासपूर्ण मते मांडली.त्यांचे विचार,मत, अनुभव यांचा आदर करून त्याच्या नोंदी घेत होतो.तासिका संपल्यावर त्यावर चिंतन करत असे. गुणवत्तेच्या सार्वत्रिकीकरणातील अडथळे समजायला मला मदत झाली.काही शिक्षकांनी त्यांच्या शाळेला भेट द्यावी अशी विनंती केली. भाषेचे अध्यापन शास्त्र या विषयाची मांडणी करताना प्रशिक्षण घटक संच,क्वेस्ट चा भाषाशिक्षणाचा कोर्स,प्रत्यक्ष मुलासोबत केलेले काम,शाळाभेटी यांचा खूप उपयोग झाला.भाषा शिक्षणाची संकल्पना,प्रत्येक मुल भाषा समृद्ध होण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने करावाचे काम,याबाबत प्रशिक्षणार्थ्यांशी चर्चा केली.मुलांना अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव कसे द्यावेत? त्यासाठी अध्ययन अनुभवांची रचना कशी करावी? याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली.ग्रंथालयाच्या माध्यमातून मुलांना भाषाशिक्षणाचे अध्ययन अनुभव देण्यासाठी विविध भाषिक खेळ, ग्रंथालयावर व पुस्तकावर आधारील उपक्रम सांगितले.शिक्षकांनी आपापल्या वर्गात,शाळेत राबवत असलेले उपक्रम सांगितले.पाठ्यपुस्तकासह ग्रंथालयातील साधनांच्या आधारे मुलांना अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव देता येतात.याबाबत खूप छान चिंतन झाले. निष्ठा प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक व मुख्याध्यापक यांना प्रगत अध्यापन शास्त्र (Language Pedagogy) समजून घेता आले.त्यांना मुलांसोबत काम करण्याची नवीन दिशा मिळाली होती.हे त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून स्पष्ट होत होत होते.अनेक उपक्रमशील शिक्षकांनी त्यांच्या शाळेत होत असलेले रचनात्मक काम सांगितले.त्यामुळे सर्वाना प्रेरणा मिळाली. या प्रशिक्षणातील अनुभव स्वत :ला समृद्ध करणारा होते.माझ्या सहकारी KRP यांनी खूप उत्तम प्रकारे सर्व विषयांची मांडणी केली होती.मा.नारायण मुदगलवाड,अधिव्याख्याता हे प्रशिक्षण प्रमुख होते.त्यांनी “शालेय नेतृत्व” या विषयाची जीवन व्यवहारातील उदाहरणे देऊन मांडणी केली.त्यामुळे त्यांचे सत्र प्रशिक्षणार्थ्यांना खूप आवडायचे.त्यांचे उत्कृष्ट वक्तृत्व सर्वांना अनुभवायला मिळाले.दररोज काही खेळ घेऊन प्रशिक्षणाचे वातावरण तजेलदार,प्रसन होत असे.सर्व प्रशिक्षणार्थ्यांशी या माध्यमातून संवाद साधता आला.खूप काही नवीन शिकायला मिळाले.
प्रशिक्षणाला डायटचे प्राचार्य,शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी यांनी भेटी दिल्या.प्रशिक्षणाच्या कार्यपद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर एक नवीनच अनुभव होता.प्रशिक्षणार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती,प्रतिसाद,पूर्व व उत्तर चाचणी संपन्न झाली.यामुळे प्रशिक्षणामध्ये एक नवीनच पायंडा पडला. या प्रशिक्षणातून शिक्षणाचा एकात्मिक दृष्टीकोन विकसित होण्यास सहाय्य झाले. हे प्रशिक्षण गुणवत्ता विकासासाठी, गुणवत्तेच्या सार्वत्रिकीकरणासाठी दिशा देणारे ठरेल.मा.दिनकर पाटील,संचालक व मा.विकास गरड,उपसंचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे मनापासून धन्यवाद!
No comments:
Post a Comment