Tuesday 28 February 2023

मराठी भाषा गौरव दिन

२७ फेब्रुवारी रोजी जि.प.प्रा.शाळा राघुचीवाडी या शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध साहित्यिक, कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे मुख्याध्यापक श्री.महादेव थोरात यांनी भुषवले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री.नितीन तावडे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दर्लिंग बेलदार, सदस्य श्री.शंकर मोरे उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेची थोरवी सांगणारी गीते गायली. उत्कृष्ट वाचक, ग्रंथालय व्यवस्थापन,पुस्तक परिचय लेखन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या शैक्षणिक वर्षांत शाळेत ग्रंथालयावर आधारित विविध उपक्रम घेण्यात आले. ग्रंथालय विभाग प्रमुख,बालसाहित्यिक श्री.समाधान शिकेतोड यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्य, अध्ययन निष्पत्ती विकसीत करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम घेतले. शाळेतील प्रत्येक वर्गात वर्गवाचनालय तयार केलेले आहे. प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थी ग्रंथालयाचे व्यवस्थापन करतात. विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार केव्हाही पुस्तक घेऊ शकतात. आवडीचं पुस्तक वाचनकोप-यातून निवडू शकतात.वाचलेल्या पुस्तकाचा कशा पद्धतीने सारांश, मत लिहावं याबद्दल मार्गदर्शन केले. त्यामुळेच विद्यार्थी छान पुस्तक परिचय लिहू लागली. इयत्ता चौथी ते आठवीमधील विद्यार्थ्यांनी जवळपास चाळीस पुस्तक परिचय लिहलेले आहेत. या पुस्तक परिचय लिहणा-या विद्यार्थ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केलेले आहे.काही मुले आवडीनं पुस्तके वाचू लागली.या विद्यार्थ्यांना आज प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी श्री.समाधान शिकेतोड यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद करून कविवर्य कुसुमाग्रजांची कविता विद्यार्थ्यांना ऐकविली. 

याप्रसंगी श्री.नितीन तावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील ग्रंथालयास बालसाहित्याची दहा पुस्तके भेट देण्याचे आश्वासन दिले. नगर वाचनालयातील पुस्तक मुलांनी वाचावीत असेही आवाहन केले. मुलांनी ग्रंथालयातील पुस्तक वाचून समृद्ध बनावे हा मौलीक संदेश दिला.ग्रंथालयावरील उपक्रमांचे कौतुक केले. 

श्री.प्रमोद शिंदे यांनी अतिथीचा परिचय करून दिला. श्री.प्रेमनाथ जाधव यांनी सुत्रसंचलन केले तर श्री. योगेश कपाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पिरॅमल फाऊंडेशनचे प्रतिनिधी श्री.अक्षय शिनगारे हेही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री.नामदेव हुंबे,श्रीमती कविता पांगळ,शालेय व्यवस्थापन समिती यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment