Sunday 8 January 2023

उजेडाचं आभाळ:काजवा

लेखक पोपट काळे हे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शालेय शिक्षण विभागात एक प्रयोगशील,संवेदनशील अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांचं काजवा हे आत्मकथन वाचलं. रावसाहेब भामरे या मित्रानं मला ते भेट दिलं होतं. तसं आत्मकथन हा माझा आवडता साहित्यप्रकार. 

जगण्यासाठी व शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्षमयी प्रवास या आत्मकथनाच्या माध्यमातून मांडलेला आहे. हा संघर्ष वाचताना अंगावर रोमांच उभा राहतो. काजवा ही एका ऊसतोड मजुराच्या मुलाची  प्रेरणादायी आत्मकथा आहे. या आत्मकथनाला प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांची प्रस्तावना लाभलेले आहे. प्राचार्य नागोराव कुंभार, पूर्व शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी या आत्मकथनाची पाठराखण केलेली आहे.

लेखकांच्या आई-वडीलांना घरच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे ऊस-तोडणी मजूर म्हणून काम करावं लागतं.
लेखकाचे आई-वडील लेखकाला शिकण्यासाठी प्रेरित करतात. आई-वडील ऊस तोडणीसाठी गेल्यावर घरी जो जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो ते हृदयस्पर्शी अनुभव जिवाला चटका लावतात. 

सत्तर ऐंशीच्या दशकात लेखकांचं बालपण गेलं.या काळातील ग्रामीण व्यवस्थेचं, गावगाड्याचं सुंदर वर्णन लेखकांनी अनेक प्रसंगांमधून केलेलं आहे. ज्यांचा जन्म या दशकात झाला असेल त्यांना हे आत्मकथन वाचताना हे माझंच आत्मकथन आहे असं वाटत राहतं.  

लेखक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं शिक्षण पूर्ण करतात. जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत घेणं, घरी स्वतः स्वयंपाक करणं, चिंचा,बोरं,कवठं, चिंचोके विकून वह्या पुस्तकासाठी पैसे जमविणे, सरपण गोळा करणे, वडिलांना शेतीच्या कामात मदत करणे ही सारी कामे करत करत लेखकांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करताना खूप खस्ता खाल्ल्या. अनेक समृद्ध जीवनानुभव घेतले. या अनुभवानीच लेखकाला समृद्ध केलं.

नोकरी लागल्यानंतर स्वतःला झोकून देऊन समर्पित भावनेने प्रत्येक पदावर काम केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राजपत्रित अधिकारी झाल्यावर पहिली नियुक्ती 'मुख्याध्यापक' म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रशालेमध्ये झाली. त्या प्रशालेचं रुपडं बदलून टाकलं. त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यात शिक्षण विभागातील प्रशासकीय पदावर काम केलं. काम  करताना समाजसेवेचं, समाजसुधारण्याचं व्रत घेऊन काम केलं. शिक्षण व्यवस्थेत विधायक प्रयोग केले. 

शिक्षण व्यवस्थेत काम करताना चाकोरीच्या बाहेर जाऊन नवनवीन प्रयोग केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम, प्रकल्प राबविले. विभागीय गुणवत्ता विकास कार्यक्रम, नंदादीप प्रकल्प, कृतीयुक्त अध्यापन (ABL) या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला गती दिली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातील काही अनुभव लेखकांनी सांगितलेले आहेत. या कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबविले. 

प्रशासकीय पातळीवर काम करताना कुठलाही दबाव न   बाळगता, विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतले. कोणत्याही आमिषाला बळी न पडता पारदर्शक पद्धतीने निर्णय घेतले. काम करताना  नैतिकता, मूल्य, तत्त्वाची तडजोड न करता प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागले याबद्दलचे अनुभव लेखकांनी सांगितलेले आहेत.

या आत्मकथनातील अनुभव शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकालाच प्रेरणादायी, दिशादर्शक, मार्गदर्शक आहेत. या आत्मकथनातील  सहजसोपी वाटणारी भाषा, पारदर्शीपणा, सच्चेपणा मनाला भावतो. ज्यांचा जन्म सत्तर-ऐंशीच्या दशकात झालेला आहे. त्यांना हे आत्मकथन तर स्वतःच्या बालपणीच्या जगण्याचा उजाळा करून देतं. त्या काळातील समाजजीवनाचं हुबेहूब वर्णन या आत्मकथनामधून वाचायला मिळतं. प्रकाश पेरणाऱ्या  शिक्षणाधिकाऱ्याचं आत्मकथन 'काजवा' हे नक्की वाचायला हवं.  हे आत्मकथन साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल असा विश्वास वाटतो.

पुस्तक: काजवा (आत्मकथन)
लेखक: पोपट काळे
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन पुणे
 मूल्य:३५० रू.
पृष्ठे: २७२
पुस्तक परिचय: समाधान शिकेतोड
┄─┅━━▣▣▣━━┅─┄

1 comment: