Friday 25 November 2022

राघुचीवाडी शाळेत बालआनंद मेळावा संपन्न

माजी शिक्षण संचालक वि.वि. चिपळूणकर यांनी असे म्हटले हे की 'शाळा हे उपक्रमांचे मोहोळ बनायला हवे'. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी शाळेत विविध सहशालेय उपक्रम, प्रकल्प राबविण्यात येत असतात. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी जीवन व्यवहारातील ज्ञान,कौशल्य मिळवीत असतात. त्यांचं शिकणं आणि जगणं एक होत असतं. अशा उपक्रमांच्या माध्यमातून विविध विषयांमधील विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त होण्यास मदत होत असते.

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी ता.जि.उस्मानाबाद या शाळेत बालआनंद मेळावा  अतिशय आनंदायी वातावरणात,उत्साहात संपन्न झाला. या बालआनंद मेळाव्याला शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य,गावातील शिक्षणप्रेमी नागरीक यांनी भेट दिली. मुलांचे कौतुक केले.

या मेळाव्यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. अतिशय उत्साहाने पालकांनीही मुलांना मदत केली. ज्यांच्या घरी भाजीपाला पिकतो त्या विद्यार्थ्यांनी भाजीपाला विकण्यासाठी आणला होता. ज्या मुलांच्या घरी किराणा दुकान आहे.त्या मुलांनी बिस्किट,चाॅकलेट इ.साहित्य आणले होते. भेळ,पाणीपुरी,मसाला राईस, विविध प्रकारचे लाडू या स्टाॅलवर गर्दी होती.मुले एकमेकांना मदत करत होती. वस्तू विकताना पैशाचा हिशोब करत होती. मीही काही खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला. मसाला राईस,दहीधपाटे अप्रतिम होते.

 आपआपल्या पाल्यांचे कौतुक पाहण्यासाठी आई-वडील आजी-आजोबा यांनीही विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेट दिली. त्यांच्या स्टॉलमधील साहित्याची खरेदी केली. 
 
अशा प्रकारच्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहारातील व्यवहार समजतात. त्यांच्या संवाद कौशल्यांचा विकास होतो. व्यक्तिमत्व विकासामध्ये भर पडते. समाजभान जागृत होते. त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन शाळाशाळांमधून व्हायला हवे.

मेळावा यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

  केंद्रप्रमुख श्री.निलेश नागले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला

                 मेळाव्याचे उद्घाटन 
   शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दर्लींग बेलदार व पालक भाजीपाला  खरेदी करताना...

1 comment: