Sunday 29 May 2022

दहावीत मराठीत मुले का नापास होतात

 मराठी आपली राजभाषा,मातृभाषा असून इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत मराठी विषयात विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. २०१८ ते २०२० दरम्यानच्या राज्यातील विभागीय मंडळांच्या तीन वर्षाच्या मराठीच्या निकालाचे  विश्लेषण करण्यात आलेले आहे. मराठी विषयाचा निकाल वाढविण्यासाठी या लेखातून उपाययोजना सुचविण्यात आलेली आहे.

मराठी आपली राजभाषा आहे. मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी, समृद्धीसाठी शासनाच्या विविध संस्था कार्य करत आहेत. मराठी भाषा जगातील अनेक देशांमध्ये बोलली जाते;परंतु इयत्ता दहावी, बारावीच्या बोर्डातील मराठी विषयाचा निकाल चिंताजनक असल्याचे दिसून येते .राज्यात पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण, मुंबई हे विभागीय मंडळ आहेत. या मंडळातील  २०१८ ते २०२० दरम्यानच्या तीन वर्षाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता इंग्रजी विषयानंतर मराठी विषयात मुलांचे नापास होण्याचे प्रमाण अधिक आहे. राज्यात सरासरी मराठी विषयात ११.९४% विद्यार्थी मराठीत नापास होतात. इंग्रजी विषयात १४.९२%एवढे विद्यार्थी नापास होतात. विभाग निहाय मराठी विषयात नापास होणाऱ्याचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे दिसून येते. नागपूर विभागात सर्वात जास्त म्हणजे २२.५७% एवढे विद्यार्थी मराठी विषयात दहावीच्या परिक्षेत नापास होताना दिसतात. हे प्रमाण अधिकच चिंताजनक आहे. या विभागात इंग्रजीत १५.०६% एवढे विद्यार्थी नापास होतात. इंग्रजी विषयापेक्षा ८% विद्यार्थी जास्त मराठी विषयात नापास होतात. पुणे विभागात ८.३५%, औरंगाबाद विभागात १०.८७%, कोल्हापूर विभागात ५.७९%, अमरावती विभागात १४.३३%, नाशिक विभागात ११.८% लातूर विभागात १२.१३% मुंबई विभागात १३.३% विद्यार्थी मराठी विषयात नापास होताना दिसतात. सर्वात कमी कोकण विभागात ४.२५% विद्यार्थी मराठी विषयात नापास होताना दिसतात. राज्यात सरासरी १२% विद्यार्थी मराठी विषयात नापास होतात. ही अतिशय खेदाची बाब आहे.                                                                                                                                           सध्या इयत्ता दहावीसाठी मराठी विषयासाठी कृतीपत्रिका आहे. या कृतीपत्रिकेमध्ये घोकंमपट्टीच्या अभ्यासाचा उपयोग होत नाही. विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचन, अभिव्यक्तीसह लेखन, व्याकरण उत्तम पद्धतीने यायला हवे. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करायला हवे. उपयोजित लेखन करता यायला हवे. तर विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने कृतीपत्रिका सोडविता येते. दैनंदिन जीवनात आपले विचार, कल्पना, भावना व अनुभव लेखनातून मांडणे फार महत्त्वाचे असते. यासाठी इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या कृतीपत्रिकेत उपयोजित लेखनामध्ये निबंध, जाहिरात, सारांश लेखन, कथालेखन हा अभिव्यक्तीसह लेखनाचा भाग आहे. यासाठी विद्यार्थ्यांना विविध भाषिक अनुभव देण्याची गरज आहे.                                                                                                          इयत्ता दुसरीपासून नववीपर्यंत विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य विकसित करण्याची गरज आहे.पूर्वी  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पूर्वी शासनाकडून संकलित मूल्यमापनासाठी प्रश्नपत्रिका दिल्या जात होत्या. यामध्ये अगदी दुसरीपासून अभिव्यक्तीसह लेखनाचा भाग होता. चित्रवर्णन लिहिणे, अपूर्ण गोष्ट पूर्ण करणे, चार शब्दापासून गोष्ट तयार करणे, चित्रावरून गोष्ट तयार करणे, संवादलेखन, पत्रलेखन असे  लेखनाचे विविध प्रकार या मूल्यमापनात होते. त्यामुळे या कृती वर्षभर सोडवून घेतल्या जात होत्या.यामुळे मुलांच्या उपयोजित लेखनाची खूप चांगली तयारी होत होती. अशा प्रकारच्या कृती आता पाठ्यपुस्तकातही देण्यात आलेल्या आहेत.या कृती,उपक्रम घ्यायला हवेत. अशा प्रकारच्या कृतीमधून मुलांच्या लेखन कौशल्याचा विकास करण्याचे प्रयत्न करायला हवेत. मुलांच्या भाषिक क्षमतांचा विकास व्हावा यासाठी इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांसाठी कृती दिलेल्या आहेत. या सर्व कृती शिक्षक, पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी सोडवायला हव्यात. अशा कृतींचा वर्षभर सराव करायला हवा. यामुळे बोर्डाची कृतीपत्रिका अगदी सहजपणे सोडविता येईल.                                                                                                                               विद्यार्थ्यांच्या भाषिक स्तरांचे निश्चितीकरण करून त्यांच्या स्तरानुसार त्यांना भाषिक अध्ययन अनुभव द्यायला हवे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा भाषिक विकास व्हायला मदत होईल.आज राज्यातील प्रयोगशील शाळांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतांचा विकास घडून येतो. शाळेत हस्तलिखित तयार करणे, लेखक आपल्या भेटीला, बालसाहित्य संमेलन, मुलाखती घेणे, सहलीचा, क्षेत्रभेटीचा अहवाल लिहिणे, पत्र लेखन असे विविध भाषिक उपक्रम शाळेत घ्यायला हवेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतांचा विकास होण्यास मदत होईल. शाळेत वाचन कोपरा,लेखन कोपरा,अभिव्यक्ती फलक तयार करून शाळेतील,वर्गातील वातावरण अध्ययन समृद्ध बनवायला हवे.                                                                                                                                                 विद्यार्थ्यांनी भरपूर प्रमाणात अवांतर वाचन करायला हवे. शिक्षक, पालक यांनी मुलांना वाचन करण्यासाठी प्रेरित करायला हवे. त्यामुळे विद्यार्थ्यांची भाषिक समृद्धी घडून येतो. पाठ्यपुस्तकाच्या शेवटी काही पूरक पुस्तके व संदर्भ ग्रंथ यांची यादी दिलेली आहे. हे संदर्भग्रंथ शाळेच्या ग्रंथालयात असयला हवेत. शाळेतील ग्रंथालय समृद्ध असायला हवे. ग्रंथालयावर आधारित विविध उपक्रम घ्यायला हवेत. विविध साहित्य प्रकारांच्या पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांनी करायला हवे. वाचन करून त्या पुस्तकाचे टिपण काढायला हवे. विद्यार्थ्यांनी शब्दकोश, ज्ञानकोश, चरित्रकोश हाताळायला हवा. यामुळे इयत्ता दहावीचे विद्यार्थी भाषिक अंगाने समृद्ध होतील. या सर्व बाबींची अंमलबजावणी शाळांनी केल्यावरविद्यार्थी बोर्डाची इयत्ता दहावीची कृतीपत्रिका अगदी सहज सोडवतील. इयत्ता दहावी मराठी विषयात एकही विद्यार्थी नापास होणार नाही. यासाठी अगदी पाचवीपासून विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासाकडे लक्ष द्यायला हवे. विभागीय मंडळानी विभागनिहाय मराठी विषयाचा कृतीकार्यक्रम तयार करायला हवा. शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यशाळांचे, प्रशिक्षणाचे  आयोजन करायला हवे.उपक्रमशील शाळांमधील भाषिक उपक्रमांचे सार्वत्रिकीकरण व्हायला हवे. निश्चितच एकही विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात नापास होणार नाही असा विश्वास वाटतो.

 

 


समाधान शिकेतोड                                                                              samadhanvs@gmail.com
9421098130
( लेखक मराठी विषयाच्या  राज्य अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत.)

No comments:

Post a Comment