Tuesday, 5 May 2020

विद्यार्थी बनले चरित्रलेखक!

मुले आज खूप छान सर्जनशील लेखन करू लागली आहेत.शालेय विद्यार्थ्यांनी लिहलेल्या कवितासंग्रह,कथासंग्रह यांचे संपादन  प्रयोगशील शिक्षकांनी केलेले आहे. सोनाली फुपरे या इयत्ता सहावीच्या विद्यार्थींनीची 'झाड' ही कविता सहावीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे.मुलांच्या सर्जनशील लेखनासाठी उपक्रमशील शिक्षक राज्यात सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात.ग्रामीण प्रशाला माडज ता.उमरगा जि.उस्मानाबाद येथील उपक्रमशील शिक्षक बालाजी इंगळे यांनी 'झेप' या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या चरित्र ग्रंथाचे संपादन केलेले आहे.प्रसिद्ध साहित्यिक तथा प्रयोगशील शिक्षक बालाजी इंगळे हे विद्यार्थ्यांच्या भाषा विकासासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत असतात.

मुलांच्या भाषासमृद्धी साठी मुलांना वेगवेगळ्या वाङमय प्रकारांची ओळख करून देणे.त्यांना वेगवेगळ्या वाङमय प्रकारांच्या लेखनाकडे वळवणे गरजेचे असते.असाच एक रचनात्मक प्रयत्न बालाजी इंगळे यांनी केलेला आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मुलांना चरित्रात्मक पुस्तके वाचायला दिली आणि त्यातून इयत्ता आठवी,नववीच्या मुलांपुढे चरित्रलेखनाचे प्रस्ताव ठेवला.मुलांनी सुरुवातीला वेगवेगळ्या चरित्रांचा अभ्यास केला.त्यावर मुद्दे काढले. लेखकांनी एखादे चरित्र लिहिताना कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. भाषा कशी वापरलेली आहे.याचा मुलांनी अभ्यास केला.चरित्रलेखन करण्यासाठी गावातील लोकांच्या मुलाखती घेतल्या.चरित्रलेखन करताना वेगवेगळे संदर्भग्रंथ हाताळले.या कामात वेळोवेळी बालाजी इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मदत केली.पुस्तकाची मांडणी, मुखपृष्ठ तयार करणे,पुनर्लेखन करणे या सगळ्या बाबीमध्ये मुलांनी पुढाकार घेतलेला होता.

या चरित्र ग्रंथांमध्ये गावातील स्वातंत्र्य सेनानी,पोलीस,दानशूर व्यक्ती, इंजिनीयर,समाजसेवक यांचे चरित्रलेखन मुलांनी केलेले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनाचा,त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा,त्यांनी केलेल्या रचनात्मक कामाची मांडणी विद्यार्थ्याने चरित्रातून छान पद्धतीने केलेली आहे.शाहीर व स्वातंत्र्यसेनानी हनुमंतराव यशवंतराव बेलुरकर यांचे चरित्र वाचताना त्यांच्या वादळी जीवनाची चरित्रगाथा समोर येते.त्यांच्याबद्दल विद्यार्थी लिहितात 'अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी लोकजनशक्ती संघटित करण्याचे कौशल्य अंगी असल्याने वारकऱ्यांमध्ये वावरणारे हनुमंतराव हैदराबाद मुक्तिसंग्रामात प्रभावी,प्रखर भाषणे व वीरश्री पोवाडे गाऊन हजारो  श्रोत्यांचा फड जिंकताना दिसतात.' स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन ते थांबले नाहीत तर माडज व परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी हिरिरीने स्वतःला झोकून दिले.गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांची दु:ख, प्रश्न शासनापुढे मांडण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला.

समाजसेवक व स्वातंत्र्यसेनानी श्री.पंचाप्पा शांतीरप्पा परांडे,कर्तव्यदक्ष पोलीस स्व.नरेंद्र वसंत काळे,सैनिक दीपक गायकवाड स्पेशल फोर्स वन पोलीस रमेश पाटील,यांची चरित्रे मुलांनी खूप छान पद्धतीने लिहिलेले आहेत.सतीश विठ्ठलसिंह गहेरवार यांचे गावासाठीचे योगदान,आयबीएम कंपनीत इंजिनिअर असणारी साधना काळे हीच्या गावातल्या शाळेतील आठवणी वाचकाला भावतात. इंजीनिअर बालाजी फुगटे,अश्विनी माने यांच्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करून यशाला कशी गवसनी घातली.याबद्दल त्यांचे व्यक्तिचित्र खुप छान रेखाटलेले आहे.

उपक्रमशील शिक्षक बालाजी इंगळे यांनी हा प्रकल्प वर्षभर राबविला.यामधून मुलांना एका वाङमय प्रकाराची ओळख झाली.दोन विद्यार्थ्यांनी मिळून एक चरित्र लिहिले होते. त्यामुळे गटात काम करण्याची संधी मिळाली.या प्रकल्पामुळे मुलांच्या  भाषिक क्षमता,जीवन कौशल्य,एकविसाव्या शतकातील कौशल्य विकसीत होण्यास मदत झाली.मुलांनी प्रत्यक्ष जगण्यातुन अनुभव घेतले.व्यक्तिमत्व विकास हे भाषाशिक्षणाचे ध्येय आहे.या चरित्रलेखनाच्या प्रकल्पातुन मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली.

उपक्रमशील शिक्षक बालाजी इंगळे हे मराठी कवी, कांदबरीकार आहेत.झिम पोरी झिम ही कांदबरी,मेलं नाही अजुन आभाळ,मातरं,रंगीत रंगीत रानफुल हे कवितासंग्रह साहित्य रसिकांच्या पसंतीला उतरले आहेत.त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.तसेच त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र शासनाचा 'यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङमय निर्मिती' पुरस्कार मिळालेला आहे.

झेप-चरित्रलेखन 
संपादक- बालाजी मदन इंगळे 
प्रकाशन-निर्मिती प्रकाशन उमरगा. 
मुल्य- 20 रू.
प्रथम आवृत्ती- १५ ऑक्टोबर २०१६

पुस्तक परिचय- समाधान शिकेतोड  samadhanvs@gmail.com 
https://shikshansanvad.blogspot.com
┄─┅━━▣▣▣━━┅─┄

No comments:

Post a Comment