उस्मानाबाद जिल्ह्यातील कवी समाधान शिकेतोड यांचा 'पोपटाची पार्टी' हा बालकवितासंग्रह नांदेडच्या इसाप प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. ह्या संग्रहात कवीने बेडकापासून बैलगाडीपर्यंत आणि गुह्राळापासून गावच्या जत्रेपर्यंतची आनंददायी सफर घडविली आहे.
शाळेचा पहिला दिवस बालकुमारांना (अगदी मोठ्यांनासुद्धा!) आजन्म आठवणीत राहतो. 'पहिला दिवस' ह्या कवितेतील चिमुरड्यालासुद्धा
'सारा दिवस मजेत गेला
पहिला दिवस कुणी नेला?'
असा प्रश्न पडला आहे.
शाळेची सहलसुद्धा अशीच जन्मभर आठवणीत राहाते. कवीने अशाच एका सहलीतील 'गंमती जमती' कवितेतून सांगितल्या आहेत :
'लपाछपीचा खेळ रंगला
रमेशने बांधला पत्त्यांचा बंगला
क्रिकेटची मॅच रंगात आली
माझीच पहिली विकेट गेली! '
माझीच पहिली विकेट गेली, हे प्रांजळपणे कबूल करायला मनाचा मोठेपणा लागतो. यालाच तर खिलाडूवृत्ती म्हणतात. ही खिलाडूवृत्ती अंगी बाणवणे ही एक चांगली गोष्ट आहे!
पुस्तकाची पाठराखण करताना' किशोर 'मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी म्हटल्याप्रमाणे ह्या संग्रहातील कविता अस्सल ग्रामीण जीवन जिवंत करतात.
आज आपली शेती आणि शेतकरी किती अडचणीत आहेत, हे खेड्यापाड्यातल्या मुलांना माहीत आहे. म्हणूनच 'गारपीट' ह्या कवितेतील शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो:
'मीच माझ्या बापाला
हिंमत आहे देणार
स्वार्थी हातांची
मदत नाही घेणार!'
स्वार्थी हातांची मदत नाकारणारा हा स्वाभिमानी बालक खरा किसानपुत्र शोभतो!
पर्यावरणाचा होत असलेला र्हास आणि पर्यावरण संवर्धनाची गरज कवीने दोन वेगवेगळ्या कवितांमधून सांगितली आहे. 'आमराई' ह्या कवितेत कवीने बेसुमार वृक्षतोडीकडे बालवाचकांचे लक्ष वेधले आहे.
' कुठे राहिलीय आता
आमराई ती जुनी
म्हणूनच झालीत आता
गावे सारी सुनी!'
यावर उपाय म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून त्यांची जोपासना करणे ओघाने आलेच! 'झाड' ह्या कवितेत कवी म्हणतो :
'एक झाड
उपयोगी किती!
ग्लोबल वार्मिंगची
नाहीच भीती!'
कवीने ह्या कवितेतून' ग्रीन इंडिया 'चा विचार बालकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.
महानगरातील मुलांसाठी बैलगाडीत बसण्याचा अनुभव तसा दुर्मीळच! म्हणूनच तर अलीकडे 'शेतीपर्यटन'ही संकल्पना भरभराटीस आली आहे. बैलगाडीच्या स्वारीचा अनुभव एका बालकाच्या शब्दांतच वाचा:
'एकदा पाहाच
बैलगाडीत बसून
पोटात दुखेल
हसून हसून!'
जी गोष्ट बैलगाडीची तीच गुर्हाळाची. साखर कारखाने आले आणि गावोगावच्या गुर्हाळांचे प्रमाण कमी झाले. गुर्हाळाचा गोड अनुभव घेण्यासाठी कवी आपल्या कवितेतून आवाहन करतो आहे :
'चल मित्रा, माझ्या
गावच्या गुर्हाळात जाऊ
गोड गोड चिकीचा
गूळ तिथं खाऊ! '
' गुर्हाळ'ह्या कवितेत कवीने गूळ तयार करण्याची सगळी प्रक्रियाच सोप्या शब्दांत समजावून सांगितली आहे. कवीची ही चित्रदर्शी वर्णनशैली बालवाचकांच्या नजरेसमोर गावाकडच्या गुह्राळाचे चित्र साकार करते.
उन्हाळा आला की पाणीटंचाईमुळे मुक्या जीवांचे फारच हाल होतात. हे हाल टाळण्यासाठी कवी एक सोपा उपाय सांगतो :
'पशुपक्ष्यांसाठी हातात
नको आता काठी
अंगणात ठेवू
पाण्याची वाटी!'
कवीने दिलेला हा भूतदयेचा, प्राणिमात्रांवर प्रेम करण्याचा हा कृतिशील संदेश फारच मौलिक आहे.
पर्यावरणाइतकाच स्वच्छतेचा संस्कार बालमनावर बिंबविणे अतिशय गरजेचे आहे. 'स्वच्छतादूत' ह्या कवितेत कवीने बाळगोपाळांना हेच आवाहन केले आहे:
'गावातली स्वच्छता करू या
आपण सारे स्वच्छतादूत होऊ या!'
जगातला प्रत्येक माणूस असा स्वच्छतादूत बनला, तर पृथ्वीचे रूपांतर स्वच्छ आणि सुंदर स्वर्गात व्हायला वेळ लागणार नाही.
कुत्रा हा बाळगोपाळांचा आवडता सवंगडी. प्रत्येक बालकाला कुत्रा पाळण्याची सुप्त इच्छा असतेच. हा इमानदार प्राणी आयुष्याच्या शेवटी काय मागणं मागतोय, पाहा:
'आता एकच इच्छा
इथं सुखानं मरावं
माझ्या धन्याचं घर
सुखासमृद्धीनं भरावं!'
शेतकरी हा ख-या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. तो उन्हापावसात राबतो, कष्टतो. हिरवं स्वप्न पाहतो. त्याच्या कष्टांची जाणीव करून देताना कवीने 'औत' ह्या कवितेत लिहिले आहे :
'बाप राही उपाशी
पण चेहरा हसरा
कधीच नाही सुटला
त्याच्या हातातील कासरा'
' पोपटाची पार्टी 'ही ह्या संग्रहाच्या शीर्षकाची कविता. ह्या कवितेत पोपटाच्या पार्टीचे मोठे रंगतदार वर्णन आले आहे. त्यातील खाणेपिणे, नाचगाणे यातील धमाल कोणालाही आवडेल.
'डीजेच्या तालावर
नाचू लागले सारे
सगळेच पक्षी म्हणतात
पोपटाची पार्टी वाsरे वाs रे! '
ही कविता वाचून प्रत्येक बालकाला आपल्या वाढदिवसाची पार्टी अशीच बहारदार व्हायला हवी, असे वाटायला लागले, तर नवल वाटायला नको!
'पोलीसदादा' आणि 'पोस्टमनदादा' हे आपल्या समाजातील जितके महत्त्वाचे तितकेच उपेक्षित घटक. दोन स्वतंत्र कवितेत कवीने ह्या दोघांचाही यथोचित गौरव केला आहे. 'पोस्टमन' ह्या कवितेत कवीने पोस्टमनदादाच्या कष्टाचे कौतुक करताना म्हटले आहे :
'कष्टत असतात सदैव
असो दिवाळी दसरा
कितीही काम पडले तरी
चेहरा असतो हसरा!'
चोराला पकडायचे असो, की वाहतुकीची कोंडी फोडायची असो, पोलीसदादा हजर! म्हणूनच तर ह्या कवितेतील बालक अभिमानाने सांगते:
'पोलीसदादाची आता
वाटत नाही भीती
त्यांच्या शौर्याच्या कथा
सांगू तुम्हाला किती! '
संशोधक, शास्त्रज्ञ वेगवेगळे शोध लावून मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. वैज्ञानिकांचे जीवन समाजाच्या कल्याणासाठीच असते. 'वैज्ञानिक' ह्या कवितेत शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाला सलाम करताना कवी म्हणतो:
'मानवाच्या कल्याणासाठी
अखंड झिजणं असतं
क्षण क्षण दुसर्यांसाठी
स्वतःसाठी काही नसतं!'
ही परोपकाराची शिकवण बालकांना विचार करायला लावणारी आहे.
अवांतर 'वाचन' हा शालेय जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे. समाधान शिकेतोड यांच्यासारखे उपक्रमशील शिक्षक हा संस्कार रुजविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. ज्या घरात ग्रंथालय असते, ते घर देवालयाइतकेच पवित्र असते. पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करताना कवीने 'वाचनाची आवड' ह्या कवितेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, की
'सोनूसारखं घरात
ग्रंथालय असावं
पुस्तकाविना पोरकं
कुणाचंही घर नसावं!'
सदर संग्रहातील 'बस' , 'कूकरची शिट्टी' , 'डाळींची सभा' , 'झाडावरची मजा' , 'जत्रा', 'शाळेतून आला एक बेडूक' , 'कावळा आणि कोकाकोला' ,' जग जिंकण्यासाठी' , 'खारूताई आणि माकड' , ह्या कविताही मुळातून वाचण्यासारख्या आहेत.
सिद्धहस्त चित्रकार कालवश प्रमोद दिवेकर यांनी रेखाटलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील चित्रे पुस्तकाच्या सौंदर्यात मोलाची भर घालतात. इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे यांनी कविता एका रंगात आणि चित्रं एका रंगात छापून पुस्तकाची झकास निर्मिती केली आहे. बालकांचे भावविश्व समृद्ध करतील, अशाच ह्या सर्व बालकविता आहेत. निखळ वाचनानंद देणारी ही 'पोपटाची पार्टी' विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी एकदा अनुभवलीच पाहिजे.
'पोपटाची पार्टी' बालकवितासंग्रह
कवी : समाधान शिकेतोड
प्रकाशक : इसाप प्रकाशन, नांदेड.
पृष्ठे ३२ किंमत रु. ६०.
पुस्तक परिचय : डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com
No comments:
Post a Comment