Friday, 6 December 2019

आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्प

आनंददायी रचनात्मक शिक्षण प्रकल्प उस्मानाबाद ग्रामीण बीट मधील सहा शाळा व नगर परिषद उस्मानाबादच्या दोन शाळेत इयत्ता पहिली,दुसरीसाठी राबविला जात आहे. प्रत्येक मुलाला अभ्यासक्रमाची उद्दिष्टे साध्य व्हावीत, अध्ययन निष्पत्ती प्राप्त व्हाव्यात.यासाठी मुलांना रचनात्मक अध्ययन अनुभव देऊन मुलांसोबत काम करणे या प्रकल्पामध्ये अपेक्षित आहे. यासाठी शिक्षकांच्या दोन कार्यशाळा घेतलेल्या आहेत.वर्गातील,शाळेतील शैक्षणिक वातावरण वाचन कोपरा,विविध अध्ययन स्त्रोत,परसबाग यादृष्टीने शाळा समृद्ध करणे.मुलांना विविध अध्ययन स्त्रोताच्या माध्यमातून भाषिक अनुभव देणे.विविध साहित्याच्या आधारे गणितातील अमूर्त संकल्पना स्पष्ट करणे गरजेचे असते.
मुलांना चांगल्या प्रकारे वाचण्यासाठी वाचन विकासाच्या टप्प्यानुसार मुलांना अध्ययन अनुभव देणे अपेक्षित असते.मुलांना अक्षर गट पद्धतीने अध्ययन अनुभव दिल्यास मुल लवकर अर्थपूर्ण वाचायला शिकते याचे प्रात्यक्षिक शिक्षकांना कार्यशाळेत दाखविले होते.अध्ययन समृद्धी साहित्य पेटीतील साहित्याच्या आधारे प्रत्येक कृती कसे घेता येईल याबद्दलचे चिंतन विचार करण्यात आला होता.
आज उस्मानाबाद नगरपरिषदेच्या शाळेला भेट दिल्यानंतर खूप समाधान वाटले.या शाळेतील वर्गातील अध्ययन समृद्ध वातावरण पाहून आनंद वाटला.इयत्ता पहिलीतील सर्व मुले पाठ्यपुस्तकातील वाचनपाठ वाचत होती.प्रत्येक मुल आत्मविश्‍वासाने संवाद साधत होते.वर्गामध्ये वाचन कोपरा होता.स्वतःला आवडलेले पुस्तक त्या वाचन कोपरा मधून मुले निवडत होती आणि आनंदाने  पुस्तकांचे वाचन करत होती.
गुगल प्ले वर बोलो ॲप आहे.या ॲपचा उपयोग मुलांना लवकरात लवकर अर्थपूर्ण वाचन शिकण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. हे ॲप प्रत्येक पालकाने आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायला हवे. मुलांना वाचण्यासाठी त्यांच्या स्तरानुसार विविध पुस्तके या ॲपमध्ये उपलब्ध आहेत.त्याचबरोबर विविध भाषिक खेळही याठिकाणी मुलांना खेळता येतात.या भाषिक खेळाच्या माध्यमातून मुलांची भाषा समृद्धी होते.त्यामुळे याचे अध्ययन अनुभव वर्गात व घरी द्यायला हवेत.मुलांना पालकांनी शिक्षकांनी नियमितपणे पुस्तके वाचून दाखवायला हवीत.गोष्टी सांगायला हव्यात.

No comments:

Post a Comment