Sunday 1 December 2019

माउलीची भेट

एकदा मी माझ्या नातेवाइकांसोबत पंढरपूरला गेलो होतो.सुट्टीचा दिवस होता.पंढरपूरमधील चंद्रभागेच्या वाळवंटात मला एक गंध लावणारा मुलगा भेटला.या भेटीचा अनुभव.......

अचानक पंढरपूरला जायचे ठरले.बरेच दिवस झाले पंढरपूरला गेलो नव्हतो.यावर्षी पाऊस खुपच कमी झाला होता. रस्त्याने जाताना पिकाकडे पाहून खुप वाईट वाटत होते.तीन वाजता आम्ही पंढरीत पोहचलो.चंद्रभागेत खूप कमी पाणी होते. आमची जीप त्या चंद्रभागेच्या वाळवंटात उभी होती.सोबतची मंडळी चंद्रभागेत स्नानासाठी गेली होती.मी गाडीच्या ड्रायव्हर सोबत गप्पा मारत उभा होतो. सहजच चंद्रभागेच्या पाण्याकडे लक्ष गेले.तर काही माणसे साउंडचे स्पिकरचे लोहचुंबक एकत्र करून त्या पाण्यातून ओढत होते. नेमका प्रकार लक्षात आला नाही म्हणून जरा जवळ जाऊन पाहू लागलो.ती माणसे तो सांगडा पाण्याच्या तळातून फिरवत होते.लोकांनी नदीच्या पाण्यात टाकलेले पैसे त्या लोहचुंबकाला चिटकत होते. नदी किनाऱ्यावर येऊन ती माणसे ते पैसे काढून घ्यायचे. काहीजण चाळणीने पैसे शोधत होते.त्याचं काम तल्लीन होऊन चालू होते.परत येऊन गाडीत बसलो.तेवढ्यात एक छोटा मुलगा ड्रायव्हरला कपाळावर गंध लावून घेण्यासाठी आग्रह करू लागला.त्याने ड्रायव्हरला व मला गंध लावला.हातात ताट, अष्टगंध, बुका,गंध लावण्याचा तारेचा साचा असं सामान घेऊन तो चंद्रभागेच्या वाळवंटात गंध लावत फिरत होता. वारकरी,भाविक त्याला एक रुपया, दोन रूपये देत होते.मीही दोन रूपये दिले. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून माझ्यातला शिक्षक जागा झाला.मी त्याच्याशी अनौपचारिक गप्पा मारू लागलो. 
"कोणत्या वर्गात आहेस?" 
"पाचवीत शिकतोय " 
"दररोज शाळेत जातो का?" 
" हो! फक्त रविवारी व सुटीतच गंध लावण्याचे काम करतो"
 " आईवडील काय करतात." 
"वडील गवंडी आहेत;आई मजूरी करते." 
"भाऊ बहीण आहेत का?"
 " हो एक भाऊ हाय "
 " तुझे पाढे कितीपर्यत आहेत" आता तोही जरा मोकळा झाला. आपली आस्थेवाईकपणे होत असलेली चौकशीनं तोही मोहरून गेला. 
"पंधरा पर्यंत पाढे येतात"
 "म्हण बरं पंधराचा पाढा" 
पंधराचा पाढा म्हणताना थोडा चुकला. नंतर त्याला चौदाचा म्हणायला सांगितले. चौदाचा पण चुकला. .... मग तेराचा म्हणायला सांगितले. तेराचा पाढा तो अचूक म्हणाला.मनात अगोदरच ठरविले होते काहीतरी बक्षीस द्यायचंच.बक्षीस म्हणून त्याला पाच रूपये दिले.तो पहिल्यांदा नको म्हणाला आग्रह केल्यावर घेतले.बक्षीस मिळाल्याने तो खुश झाला अन् म्हणाला गाडीच्या पुढच्या बाजूला विठ्ठल - रूकमाई काढतो.हा कसा काढणार? याचे आश्चर्य वाटले.पण गाडीच्या पुढच्या काचावर एका बाजूला त्याच्या जवळच्या गंध लावण्याचा साच्याने सुंदर विठ्ठल-रूकमाईची मुर्ती काढली.आम्ही त्याच कौतुक केले. बोलण्यात चतुर होता. 
तो म्हणाला," मला पाढे तयार करता येतात.दहा पर्यंत पाढे येत असले तरी तीसपर्यंत पाढे तयार करता येतात." 
काही पद्धती मलाही माहीत होत्या.पण त्याने सांगितलेली पद्धत वेगळी व सोपी होती.ती त्याच्याकडून समजून घेतली.त्याचं नाव माऊली होते.शाळेत नियमित जात जा. अभ्यास करत जा.असं त्याला सांगितले.थोड्या वेळात माऊली गंध लावण्यासाठी त्या वाळवंटातच्या गर्दीत मिसळून गेला.पण माऊली शाळाबाह्य नाही याच समाधान वाटले.त्याच्याकडून पाढा तयार करण्याची एक नवीन पद्धत मला मिळाली.मी दुसर्‍या दिवशी शाळेतील मुलांना ती नवीन पद्धत सांगितली माऊली मात्र माझ्या ह्रदयात घर करून बसला होता.मला माऊलीच्या रूपात साक्षात विठ्ठल भेटल्याचा आनंद झाला.
©️ समाधान शिकेतोड
samadhanvs@gmail.com

No comments:

Post a Comment