Wednesday 7 December 2022

कचराकुंडी तयार केली

वर्गात, शालेय परिसरात होणारा कचरा कुठं टाकावा हा प्रश्न होता.अगोदरच आमच्या शाळेला भौतिक सुविधांची वाणवा आहे.भौतिक सुविधांनी शाळा समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुलं वह्याची पानं फाडतात त्यामुळं कागद इकडं तिकडं पसरतात. तो कचरा जमा करावा लागतो.तो उघड्यावर जाळावा लागतो.नाही जाळला तर वार्‍याने उडून कागद मैदानावर पसरतात.त्यासाठी कचराकुंडी तयार करावी हा विचार मनात यायचा. 

मैदानाच्या कडेला एक सिमेंटची नळी पडलेली होती. गावातील मुलं क्रिकेटचं स्पिच दाबण्यासाठी तिचा वापर करतात असं म्हणतात. ती अवजड नळी उभी करून ठेवली तर छान कचराकुंडी तयार होईल असा विचार मनात आला.

आम्ही कामाला लागलो. आठवीची मोठी मुलं मदतीला घेतली. नळी काही हलत नव्हती. हलली तर वळत नव्हती. नळी वळवण्याची युक्ती मी मुलांकडूनच शिकलो.नळीच्या खाली फरशीचा तुकडा टाकायचा अन् नळी फिरवायची. काय भारी आयडीया हो! ग्रामीण भागातील मुलं काटक असतात. चपळ असतात. मुलांनी ही अवजड नळी भरभरा नेली. कुणाला काही इजा होऊ नये याची काळजी घेत नळी वीस -पंचवीस मीटर लोटांगळत ठिकाण्याला नेली. मी टिकावानं गोल रिंगण खोदल. पण नळी उभा राहत नव्हती. फार जड होती. 
शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तात्या चालले होते. त्यांनी आमची धडपड पाहिल्यावर मदतीला आले. नळी उभी केली. एकदाची कचराकुंडी तयार झाली.

No comments:

Post a Comment