Sunday 9 January 2022

Rural Girls School Project

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुलींच्या शिक्षणासाठी रचनात्मक कार्य करणाऱ्या पांडुरंग घोडके यांच्या प्रकल्पाविषयी जाणून घेता आले. पांडुरंग घोडके यांनी त्यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्यांनी Rural Girls School हा रचनात्मक प्रकल्प उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थींनींना वाचन-लेखन, गणितीय क्रिया, इंग्रजीच्या मूलभूत क्षमता,जीवनकौशल्य याविषयी किशोरवयीन मुलींच्या माध्यमातून शिक्षण देणे सुरू आहे.

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पाच शालेय विद्यार्थिनींचा एक गट तयार केलेला आहे. या गटाला एक किशोरवयीन मुलगी शिकवत आहे. या किशोरवयीन मुलींना शिकविण्यासाठी लागणारी साधने देण्यात आलेली आहेत. अध्ययन अनुभव कसे द्यावेत, वाचन-लेखन कसे शिकवावे,अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, शिकविण्याचे मासिक नियोजन कसे करावे याबद्दलचे अध्यापनशास्त्रीय धडे कार्यशाळांच्या माध्यमातून या किशोरवयीन मुलींना देण्यात आलेले आहेत.

 सध्या उस्मानाबाद तालुक्यातील पाच गावात किशोरवयीन मुलींना लीडर म्हणून नेमण्यात आलेले आहेत. त्याद्वारे सत्तर विद्यार्थिनींना शिक्षण मिळत आहे.आजच्या कार्यक्रमात या लीडर मुली सहभागी झाल्या होत्या.त्यांनी मुलींसोबत करत असलेल्या कामाचे अनुभव सांगितले. मुलींमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण झाली आहे.धाडसाने बोलण्याबद्दलचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मुली छान वाचू लिहू लागल्या आहेत. श्रुतलेखन, अभिव्यक्तीपर लेखन करू लागल्या आहेत. संख्याज्ञान संख्यावरील क्रिया करत आहेत. इंग्रजीचे वाचन करू लागल्या आहेत. यामुळे कोरोनाच्या कालावधीत मुलींच्या शिक्षणाचा क्षय कमी होण्यास मदत झाली.त्याचे शिकणे सुरू राहिले.

श्री.पांडुरंग घोडके हे गेल्या दोन वर्षापासून Audio Storytelling Project राबवत आहे. त्यांची मुलगी प्रेरणा घोडके उत्कृष्ट Storyteller आहे. ती स्वतःच्या आवाजात मराठी, इंग्रजी, हिंदीतून गोष्टी रेकाॅर्डीग करून नियमितपणे पाठवत आहे. आजपर्यंत अशा 300 गोष्टी पाठविण्यात आलेले आहेत. ह्या गोष्टी राज्यातील,देशातील व परदेशातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्या आहेत.या गोष्टी विद्यार्थ्यांना खूप आवडतात.

Rural Girls School प्रकल्पांतर्गत पुढील उपक्रम घेतले जातात.
1) Audio story telling Project 
2) Girls audio school and Mothers Audio School
 3) Small Pocket Diary 
4) Handwriting Activity 
5) Daily Math Activity and Math Workshop 
6)Life skill workshop 
7) Audio Storytelling and Recording Workshop 
7) Extra Curricular Activities

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. या सावित्रीच्या लेकी त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल आज भरभरून बोलत होत्या. त्यांच्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास होता. या प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण होत होती. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना नवीन शिकण्याची सहसा संधी मिळत नाही. पांडुरंग घोडके यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून ही संधी त्यांना देत आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्य या उपक्रमात सहभागी झालेले आहेत.

 आज या सावित्रीच्या लेकींशी संवाद साधला. मुलींच्या भाषा शिक्षणाबद्दल चर्चा केली. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता श्री.नारायण मुदगलवाड, दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार श्री.उपेंद्र कटके यांनीही मार्गदर्शन केले.पालक म्हणून स्वतःच्या मुलामध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून झालेल्या सकारात्मक बदलाबद्दल सांगीतले.

उस्मानाबाद जिल्हा निती आयोगांतर्गत आकांक्षित जिल्हा आहे. या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे,त्यांची शिक्षणातून गळती होऊन नये यासाठी श्री.पांडुरंग घोडके परिश्रम घेत आहेत. ते स्वतः गावोगाव फिरतात. मुलींना प्रेरणा,प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करताता. लिडर मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी कधी बाहेरील तज्ञांना आमंत्रित करतात.मुलींच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य देतात. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने शिक्षणाचा वसा घेतला आहे.त्याच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे.
श्री.पांडुरंग घोडके,उस्मानाबाद. 
9422151230

No comments:

Post a Comment