Wednesday 25 August 2021

प्रेरणेचा अखंड झरा: व्यंकटेश चौधरी

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसं आयुष्यात भेटत असतात. त्यापैकी काहीजण अगदी हृदयाच्या तळापर्यंत जातात. त्यांच्या समृद्ध सहवासात आपण आपसूकच घडत जातो, बहरत जातो. दुसऱ्यांच्या आयुष्याला बहर आणणारी माणसं भेटणं तसं दुर्मिळच. अशाच एका माणसाचा समृद्ध सहवास लाभला आणि मी समृद्ध होत गेलो. ते म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय श्री. व्यंकटेश चौधरी.                

मी नव्यानेच सन 2003 साली प्राथमिक शिक्षक म्हणून नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत आंध्रप्रदेशच्या सीमावर्ती भागात (आत्ताचा तेलंगणा) भोकर तालुक्यात रुजू झालो होतो. त्यावेळी आमच्या बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी श्री. व्यंकटेश चौधरी होते. त्यांच्या पहिल्याच मला ते खूप भावले. एक उत्तम कवी, लेखक, संपादक, निवेदक, संशोधक, प्रयोगशील अधिकारी, मित्र, मार्गदर्शक म्हणून मला ते व्यक्तिमत्त्व खूपच भावलं होतं. समोरच्या माणसाच्या थेट अंतःकरणाला भिडेल अशी संवादाची शैली, वाचनाचा व्यासंग, गुणग्राहकता, संवेदनशीलता, अफाट लोकसंग्रह, मुलांच्या शिक्षणाची प्रचंड तळमळ, उपक्रमशीलता या त्यांच्यातील व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंमुळे मी आपोआप त्यांच्या सहवासात आलो.                      
आमच्या बीटमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी खूप उपक्रम,प्रकल्प राबविले जात असत. मुलांच्या अभिव्यक्तीच्या विकासासाठी त्यांच्या सर्जनशील लिखाणाच्या  हस्तलिखितांचे केंद्रस्तरावर प्रदर्शन होत असे. शाळेत वाचन कोपरा, लेखन कोपरा, प्रयोगशाळा, क्रीडास्पर्धा असे उपक्रम राबविले जात असत. या बीटमार्फत शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय ललित लेखन व काव्यलेखन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांचे ‘अखंड पुस्तक वाचन’ हा उपक्रम राबविण्यात आला होता.  मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी त्यांना शपथ दिली होती. खरं तर प्रत्येक मुल शिकावं म्हणून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम या आमच्या बीटमध्ये २००७-२००८  या वर्षापासूनच सुरू झाला होता. सामाजिक बांधिलकी म्हणून बीटमार्फत वर्षातून दोनदा रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असे.या शिबिरात शिक्षक स्वयंस्फूर्तीने व स्वइच्छेने रक्तदान करत असत. शिक्षकांच्या मदतीने ‘शिक्षकांचे अध्यापनेत्तर काम’हा    संशोधन प्रकल्प राबविला होता.              
 नांदेड जिल्ह्यातीन बरेच तालुके सीमावर्ती आहेत.या भागातील लोकांचा संपर्क पलीकडील तेलगु भाषिक लोकांशी येतो. या सीमावर्ती भागात अनेक भाषांची मिळून एक नवीनच परिसर भाषा तयार झालेली आहे. मुलांना घरच्या व परिसर भाषेकडून माध्यम भाषेकडे घेऊन जाण्यासाठी ‘बोलीभाषा प्रमाणभाषा शब्दकोश’ तयार केला होता. हा शब्दकोश तयार केल्याबद्दल त्यांनी दिलेले अभिनंदनपत्र आजही मी जपून ठेवलेले आहे.          

 आमचं नातं तसं शिक्षक व अधिकारी यांना त्या पलीकडचं होतं. आम्ही भोकरला एकाच   रूममध्ये राहत होतो.आम्ही एकमेकांचे  चांगले मित्र बनलो होतो. माझ्यातील कलागुण त्यांनी अचूक हेरले होते. अनेक प्रकल्प, उपक्रमांचे तालुक्यात नेतृत्व करण्याची संधी त्यांनी मला दिली होती. मला वाचन,लेखनाचा छंद होता. ते मला विविध साहित्यसंमेलनासाठी आवर्जून सोबत घेऊन जात असत. उमरी तालुक्यातील कारकाळायेथील ग्रामीण साहित्य संमेलन तर आम्ही कधीच चुकविले नाही. जिल्ह्यातील पत्रकार मंडळी, साहित्यिक, अधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याशी त्यांच्यामुळेच ओळख झाली होती. त्यामुळे माझा मित्र  परिवाराचा परी विस्तारत गेला.

या सगळ्या प्रवासात मी त्यांच्या घरचा एक सदस्य झालो होतो. नांदेडला त्यांच्या घरी व मुखेड तालुक्यातील त्यांच्या नंदगाव या मूळगावी अनेकदा गेलो होतो. त्यांच्यासोबतच्या सहवासात त्यांनी  अनेक घटना,प्रसंग,किस्से सांगत असत. माणूस म्हणून कसे समृद्ध जगायला हवं हे त्यांच्याकडूनच आपसूकच समजलं. एखाद्या विषयावर, प्रसंगावर स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलण्याचा त्यांचा स्वभाव मला खूप भावायाचा. ते बालभारतीमध्ये मराठी विषयाच्या अभ्यासमंडळावरही काम करत होते. त्यांनी मला भूगोल विषयाच्या समीक्षासाठी बालभारती पाठवले होते. माझ्या सेवेच्या खूप कमी कालावधीत बालभारती व राज्य स्तरावरील विविध उपक्रमात काम करण्याची संधी मिळाली होती.पुढे मलाही  बालभारतीच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात काम करण्याची संधी मिळाली.           

          आपल्यावर निरपेक्ष व निर्व्याज प्रेम करणारी व्यक्ती मिळणे म्हणजे भाग्यचं! श्री. व्यंकटेश चौधरी यांनी माझ्यावर निरपेक्ष,निर्व्याज प्रेम केले. नंदगाववरून येताना आम्ही सोबत पावसात भिजलेलो,नांदेडच्या चित्रपटगृहात चित्रपट पाहिलेला,सोबत साहित्यसंमेलनाला गेलेलो हे अविस्मरणीय प्रसंग आजही उर्जा देतात.माझी अंत:करणापासून काळजी घेतली. माझ्यातील सुप्त गुणांना फुलण्याची संधी दिली. मी माझा जिल्हा सोडून नोकरी करतोय असं कधीच जाणवलं नाही.आजही मला त्यांचे मार्गदर्शन नियमितपणे मिळत असते. या माणसाबद्दल कितीही लिहित राहीलं तरी लेखणी थांबणार नाही. त्यांना वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा.

No comments:

Post a Comment