Tuesday 18 May 2021

आत्मकथन लिहिण्यास प्रेरणा देणारी कार्यशाळा

खरंतर गेले अनेक दिवस आत्मकथन लिहावं हा विचार मनामध्ये येत होता.काही आत्मकथन,आत्मचरित्र वाचूनही झाली होती. पण अजून लेखन सुरु झालेलं नव्हतं. iTRANSFORM व बोलतो मराठी यांच्या वतीने  दिनांक १४ मे ते १७ मे या कालावधीत आत्मचरित्र लेखन ऑनलाइन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत मी सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यशाळेने मला आत्मकथन लिहण्याची प्रेरणा दिली.

पहिल्या दिवशी 'राजहंस' प्रकाशनाच्या संपादिका,स्त्रिवादी अभ्यासक विनया खडपेकर यांनी आत्मचरित्र या साहित्य प्रकाराबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. आत्मचरित्र कोणी लिहावे, आत्तापर्यंत लिहिलेली वेगवेगळी आत्मचरित्रे कोणती आहेत. याबद्दल त्यांनी सविस्तर चर्चा केली.'आत्मचरित्र' हे सामाजिक इतिहासाचं एक उत्तम साधन आहे.असे त्यांनी प्रतिपादन केले.

दुसर्‍या दिवशी प्रसिद्ध लेखक  'मुसाफिर'कार श्री.अच्युत गोडबोले यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या 'मुसाफिर' या आत्मकथनविषयी सविस्तर अशी माहिती दिली.त्यांनी आमच्याशी प्रेरणादायी संवाद साधला.त्यांच्या लेखनाचा प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगीतला. पुस्तक लिहण्याची रणनीती कशी तयार करावी. याबद्दल त्यांच्या काही गाजलेल्या पुस्तकांची ऊदाहरणे देऊन पटवून दिले.

तिसऱ्या दिवशी पुणे विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख, प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ.मनोहर जाधव यांनी आत्मकथन या साहित्य प्रकाराबद्दल सविस्तर माहिती सांगितली. आत्मचरित्र आणि आत्मकथन या मधील फरक स्पष्ट केला. विविध आत्मचरित्रे,आत्मकथन याबद्दल माहिती दिली. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वंचित घटकांतील लेखकांनी आत्मकथनांचे कसे लेखन केले याबद्दल सांगीतले. आत्मचरित्र हे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर लिहलं जाते. अशा प्रसिद्ध आत्मचरित्राबद्दल चर्चा केली.

त्यांनी आदर्श आत्मकथनाचे निकष सांगितले. आत्मकथनातील लेखन हे सत्यकथन असणे गरजेचे आहे. आयुष्यातील अपमानास्पद गोष्टी, ज्या आपल्याला आठवू नये असं वाटतं अशा घटना आत्मकथनामध्ये प्रामाणिकपणे मांडायला हव्यात. आत्मकथनातील सत्यता शोधणं अवघड आहे हेही आवर्जुन सांगीतले. आत्मकथनात आयुष्यातील सगळ्याचं घटना याव्यात असे नाही, लेखकाला ज्या घटना भावल्या. त्या घटनांचे वर्णन आत्मकथनामध्ये  येत असतात. स्वतःच्या प्रतिमेला छेद देणारे लेखन आत्मकथनामध्ये येत असते. हा साहित्यप्रकार सर्वांनाच पेलवत नाही. या साहित्य प्रकारातून स्वतःचे गौरवीकरण, उदात्तीकरण होऊ नये अशा पद्धतीने सरांनी अतिशय उत्तम पद्धतीने आत्मकथाबद्दल स्पष्टीकरण दिले. तसेच वाचन करण्यासाठी उत्कृष्ट आत्मकथनांची यादीही दिली.

प्रसिद्ध लेखक,उपराकार, पद्मश्री लक्ष्मण माने यांनी शेवटच्या दिवशी 'उपरा' या आपल्या आत्मकथाबद्दल सविस्तर निवेदन केले. भटक्या विमुक्तांच्या जीवनातील व्यथा-वेदना कशा असतात याबद्दल त्यांनी सांगितले. 'उपरा' आत्मकथन लिहतानाचा संपूर्ण प्रवास त्यांनी अतिशय प्रेरणादायी पद्धतीने सांगितला. आत्मकथन लिहताना स्वतःशी प्रामाणिक राहायला हवं. असेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्यासाठी अगोदर भरपूर वाचन करायला हवं. 'वाचनाने माणसाचं मन समृद्ध होतं आणि समृद्ध मनात समृद्ध साहित्याची निर्मिती करू शकते.' हा संदेश त्यांनी दिला.

वसुंधरा काशीकर,श्रेयश देशपांडे,प्राजक्ता भानारकर या संयोजकांनी कार्यशाळेचे उत्तम नियोजन केले होते.अशा कार्यशाळा मराठी भाषेच्या समृद्धीसाठी, अभिवृद्धीसाठी,संवर्धनासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील. नवलेखकांना समृद्ध व प्रगल्भ बनवण्याचे कार्य अशा संवादातून होत राहील. या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल मनापासून आभार. 

चित्रपट केवळ मनोरंजनाचं साधन नाही. चित्रपट समजून घेतला पाहिजे. त्यातील प्रत्येक प्रसंग समजून घेतला पाहिजे. 

 


5 comments:

  1. मन:पूर्वक धन्यवाद समाधान सर.आपली दाद आणि अभिप्राय अतिशय मोलाचा आणि आमचा उत्साह वाढवणारा आहे.पुन:श्च एकदा आभार.
    प्राजक्ता बल्लाळ,
    टीम, i-Itransform.

    ReplyDelete
  2. अतिशय उपयोगी कार्यक्रम. प्रेरणादायी उपक्रम. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  3. छान अनुभवकथन

    ReplyDelete
    Replies
    1. खुपच सुंदर मुद्देसूद मांडणी केली समाधान

      Delete