Thursday, 27 October 2022

मुलांमधील सुप्त गुण

आज माझ्या दुसरीच्या वर्गातील प्राजक्ताचे वडील भेटायला आले होते. प्राजक्ता बरेच दिवस शाळेत अनुपस्थित होती. त्यामुळे ते भेटायला आले होते. ते भेटायला आल्याचा मला खूप आनंद झाला कारण मी या शाळेत रुजू झाल्यापासून आतापर्यंत माझ्या वर्गातील पालक मला भेटायला आले नव्हते.

 शिक्षक-पालक भेटीतून शिक्षक व पालकांचा नियमित संवाद व्हायला हवा. त्यामुळे मुलांच्या शिकण्यातील गती, प्रगती समजायला मदत होते. प्राजक्ताच्या वडिलांशी खूप छान चर्चा झाली. मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवायला हवे. असं त्यांनाही वाटत होतं याचा आनंद वाटला.
.......
 शाळेला मधली सुट्टी झाली होती. शाळेच्या शेजारून नवरदेव वाजत गाजत चालला होता. गावातीलच लग्न असल्यामुळे विद्यार्थी आपसूकच वाजणाऱ्या बँजो पथकाभोवती भोवती जमा झाले. शाळेतील इयत्ता पहिलीचा व इयत्ता चौथीचा असे दोन विद्यार्थी बॅन्जो पथकातील वाद्य वाजवत होते. मी ते सारे कौतुकाने पाहत होतो. ते बँजो पथक त्यांच्याच घरचे असल्यामुळे आपसूकच ती मुले वाद्य वाजवायला शिकली होती.

 मुले आजूबाजूच्या परिस्थितीनुसार घडत असतात. आजूबाजूच्या सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचा प्रभाव, परिणाम त्यांच्यावर घडत असतो. या बाबी विचारात घेऊन मुलांमधील सुप्त गुणांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्या सुप्तगुणांना व्यासपीठ मिळवून द्यायला हवे. त्यांच्या या गुणांचे कौतुक व्हायला हवे.

मनात विचार आला याच मुलांच्या साह्याने आपण आपल्या शाळेत एक बँड पथक तयार करायला हरकत नाही. राज्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेत अशी पथके तयार केलेली आहेत. याबाबत आमच्या शिक्षक सहकारी मित्रांशी चर्चा केली. बँड पथक तयार करायचा मनाशी पक्का निर्धार केला.
नवरदेव जाताना बेंजो पथकातील गाणे वाजत होते. तिकडे वाजणाऱ्या वाद्यावर इकडे मुले ताल धरून मनसोक्त स्वतःच्या धुंदीत नाचत होती. त्यांना मनसोक्त नाचू दिले.
........

No comments:

Post a Comment