प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात की त्या दुसर्याचं जीवन फुलवत असतात. या व्यक्ती स्वतः त्याग करून दुसर्याचं जगणं समृद्ध करत असतात. माझा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. कोरडवाहू शेती असल्यामुळे आई-वडिलांना मजुरी करावी लागत होती. त्यामुळे शालेय शिक्षण घेताना खूप अडचणी आल्या. माझ्या शिक्षणात अडचणी येऊ नये यासाठी आईने खूप मेहनत घेतली. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून शालेय साहित्य दिले. प्रसंगी रोजगार हमीवर काम केले; पण मुलांच्या शिक्षणात अडचण येणार नाही याची काळजी घेतली. माझी आई सुरूवातीपासूनच खूप जागरूक होती.
आईला मी अक्का म्हणतो. आक्काच्या या आठवणी आजही ऊर्जा देतात, प्रेरणा देतात, वंचिताची काळजी घ्यावी,मदत करावी यासाठी प्रेरित करतात.माझं प्राथमिक शिक्षण माझ्याच गावात सरमकुंडी येथे झाले.माझं गाव पेढ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी एका वस्तीगृहात टाकण्यात आलं. एक पोते ज्वारी व दरमहा शंभर रुपये एवढी त्या वस्तीगृहाची फीस होती; पण त्या काळी खूप जास्त वाटायची. आक्का मला सणावाराला पुरणपोळीचा डबा पाठवून द्यायची. त्यात कुरवडी-भजी असायची. त्यात कुरवाडी अर्धी कच्ची तळलेली असायची.ती तशी का आहे,हे मला समजायचं नाही. नंतर त्याचं कारण समजलं. त्यावेळेसची आमची परिस्थिती खूप हालाखिची होती. घरी भाजीला तेल नसायचं.मग या कुरवडी तळणाला कोठून तेल आणायचं? त्यामुळे आक्का कुरवडी कळत-नकळत तव्यावर तळायची. त्यामुळे कुरवडी आर्धी कच्ची तळायची. गरिबीची परिस्थिती असतानाही प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत आक्का नेहमीच प्रत्येक संकटाला तोंड द्यायची. कसोटीनं संसार करायची. घर संसाराला हातभार लागावा, यासाठी तिनं शेळी पाळली होती. मजुरीला गेल्यानंतर ती शेळी तिच्या पाठीमागे जायची. संसार नीटनेटका व्हावा, मुलाबाळांचे शिक्षण व्हावे यासाठी तिची जिद्द, चिकाटी वाखाणण्याजोगी होती.
मी तेव्हा अकरावीला वाशीला कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी या ठिकाणी प्रवेश घेतला होता. शिक्षणासाठी वाशीला एक रूम भाड्याने घेऊन राहत होतो. त्याकाळी खानावळीची सोय नव्हती. त्यामुळे हाताने स्वयंपाक करावा लागत होता. हाताने स्वयंपाक करण्याचा अनुभव तसा पहिल्यांदाच घेत होतो. सुरुवातीला हात भाजला; पण नंतर नीटनेटका स्वयंपाक करू लागलो. शेतात ज्वारी, गहू पिकत नव्हते. गरीबीमुळं नवीन ज्वारी,गहू विकत घेऊन पुरवणं शक्य नव्हतं. त्यामुळे आक्का आमच्या पलिकडच्या गल्लीतील गोसाव्याच्या घरी जायची. त्या गोसाव्याकडून किलोवर पीठ विकत घ्यायची. ते पीठ मला पाठवून द्यायची. गोसाव्याच्या पिठावरच मी अकरावी,बारावीचे शिक्षण पूर्ण केले.
मला लवकर नौकरीची गरज होती.त्यामुळेच पुढे डी.एड केले आणि शिक्षक झालो. शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. या प्रत्येक क्षणाला आईने मला समजून घेतलं, साथ दिली. माझ्या एकंदरीत घडणीत आईचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. माझी आक्का चिकित्सक विचार करणारी, विज्ञाननिष्ठा आहे. आक्काने लहानपणी दिलेली शिकवण आजही जगण्याला बळ देते.
आक्काच्या गळ्याला गलगंड झालं होतं. आम्ही आठवी - नववीन असताना त्याचा आकार सुपारी एवढा होता. गावात कॅन्सर तपासणीची गाडी यायची. आक्का ते आवळ तपासून घ्यायची. तिला वाटायचं मोफत ईलाज होईल. हळूहळू ती गाठ वाढत गेली.
मी तिला म्हणायचो, "आक्का ऑपरेशन करून घे."
ती म्हणायची, "मला काही होत नाही."
कारण त्यावेळी ऑपरेशन करण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. जे काही पैसे यायचे त्यात ते सर्व घर संसार भागवायला लागायचे. त्यामुळे तिने स्वतः वेदना सहन करून संसार केला. मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. पुढे मी शिक्षक झाल्यावर आक्काच्या गलगंडाचे ऑपरेशन केले.आक्का ठणठणीत बरी झाली.
प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या ज्या व्यक्तींचा विशेष वाटत असतो त्यामध्ये बायकोचाही वाटा असतोच. माझं लग्न झाल्यावरही घरच्या समस्या कमी झाल्या नव्हत्या. अनेक वर्षांचे दारिद्र्य कसं एकदम निघून जाईल. माझा पगार घरच्या समस्या सोडविण्यासाठी संपून जायचा.त्यामुळे आर्थिक अडचणी असायच्याच. या कसोटीच्या काळात माझ्या पत्नीने अलकाने नेहमीच मदत केली. माझ्यावर निरपेक्ष,निर्व्याज,निस्वार्थ प्रेम करणारी मला बायको मिळाली. बहिणीचं लग्न करणे,माझं शिक्षण, घरात काही नवीन वस्तु घेणं,माझ्यासाठी मोबाईल, लॅपटॉप घेणं या सर्वासाठी अलकाने वेळोवेळी मदत केली.मला मानसिक,भावनिक आधार दिला. ती एक एक रूपया जमा करून ठेवते. त्यातून मला अर्थसहाय्य करते. ब्युटीपार्लरचा व्यवसाय तिनं सुरू केला. त्यातून मिळालेले पैसे ती मलाच देत असते.माझ्या अनेक पुस्तक प्रकाशनासाठी तिनंच मदत केली.
आई व बायकोवर किती लिहावं.एखादं पुस्तक लिहून होईल.आज हे सर्व आठवलं जागतिक महिला दिनानिमित्त....
No comments:
Post a Comment