Monday, 5 October 2020

मुलांसाठी लिहताना - बालकथालेखन कार्यशाळा

मुलांसाठी वैविध्यपूर्ण साहित्य लिखाणाची आज खुप  गरज आहे. मुलांचे भावविश्व,अवतीभवतीचा परिसर, 
बालमानसशास्त्र, वयोगट यांचा विचार करून 
मुलांसाठी लिहलं गेले पाहिजे.बालकथा म्हणजे नक्की 
काय? त्या कोठून येतात? बालकथा कुणी, कुणासाठी 
आणि त्या का लिहायच्या, कथेची रचना आणि बांधणी 
कशी करायची याबाबत बालसाहित्यिक फारूक काझी यांची दिनांक १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन कथालेखन कार्यशाळा संपन्न झाली.

गेली पंधरा वर्षे मुलांसोबत रचनात्मक काम करणारे प्रयोगशील शिक्षक,बालसाहित्यक फारूक काझी यांनी बालकथा लेखनाबाबतच्या अनेक पैलूंवर चर्चा केली. 
दररोज त्यांच्या एका कथेचे अभिवाचन गोष्टरंग टिममधील कल्पेश समेळ,प्रतिक्षा खासनीस यांनी केले. कथेचे सादरीकरण फारचं उत्तम असायचं. त्यानंतर त्या कथेवर चर्चा व्हायची.चर्चेतून मग कथेची थीम काय होती,संवाद कसे होते,पात्र, प्रसंग यावर सहभागी असलेले आपआपली मते, अनुभव, विचार व्यक्त करायचे.चार दिवस फारूक काझी यांच्या 'दात पळून न जाण्याची गोष्ट', 'तु माझी चुटकी आहेस', 'हिप्पोसारखं नाक', 'गेंदूबाचं चित्र' या कथांचे अभिवाचन झाले. 

बाळासाहेब लिबींकाई यांनी लहान मुलांना गोष्टी का सांगायच्या ? त्याचा कथालेखनाशी काय संबंध आहे. याबद्दल सांगितले. बालकथा लेखनाच्या संदर्भातील अनेक लेख वाचण्यासाठी मिळाले. फारूक काझी यांनी आपण सर्वजन लिहू शकतो हा आत्मविश्वास दिला. लिहतं होण्यासाठी आपले अनुभव, कल्पना, ऐकलेल्या बाबी, विचार, स्वतःचं वाचन या सर्वांचा कथालेखनासाठी कसा उपयोग होतो.याबद्दल स्वतःच्या अनुभवातून सांगीतले. प्रत्येक प्रसंग, घटना, मुलांचे संवाद याकडे बारकाईने कसं पाहायचं याबद्दल सांगीतले. 

कथेची बांधणी करताना सुरवात, मध्य, शेवट कसा हवा.कथेतील पात्रे, कथेची थिम, दृष्टिकोन,मुलांच्या वयोगटानुसार शब्दमर्यादा यावर सविस्तर चर्चा झाली. बालकथा लिहताना लिहावं,वाचावं....अनावश्यक टाळावं...पुन्हा लिहावं.आपल्या लिखाणावर मेहनत घ्यावी. पुन्हा पुन्हा लिहावं.लिहलेलं ऐकताना गोड वाटावं.बालकथा लेखनाबद्दल खुप महत्वाचं मार्गदर्शन त्यांनी केले. 

बालसाहित्यावर काम करणा-या अटक मटकचे संस्थेचे ॠषिकेश दाभोलकर यांनी बालकथेवर संपादकीय संस्कार कसे होतात याबद्दल माहिती दिली.या कार्यशाळेत चित्रकार, शिक्षक,पालक, शिक्षक प्रशिक्षक सहभागी झालेले होते. 
चार दिवस मस्त मजा आली. सहभागींना कथालेखनाचा स्वाध्याय दिला जात असे.सर्वांनी कथा लिहल्या.लिहलेल्या बालकथांवर चर्चा व्हायची. कथा लेखनाचे बारकावे समजून घेता आले.खुप नविन शिकायला मिळालं. याचा मुलांसोबत काम करताना, मुलांसाठी लिहताना खुप फायदा होईल.मुलांसाठी या कार्यशाळेमुळे नक्कीच नवीन उर्जा मिळाली. 

समाधान शिकेतोड 
www.shikshansanvad.in

No comments:

Post a Comment