उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना मा.श्रीमती दीपा मुधोळ- मुंडे यांनी शिक्षण, आरोग्य, पोषण, कृषी, पर्यावरण, महिला व बालकल्याण, साहित्य अशा विविध क्षेत्रात उस्मानाबाद जिल्ह्यात रचनात्मक कार्य केले.त्यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यानिमित्ताने.......
काही माणसं समाजाच्या विकासासाठी,समृद्धीसाठी सतत कार्यप्रवण असतात. समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कार्य करीत असतात.उच्च पदावर कार्यरत असूनदेखील साधेपणाने राहून सर्वसामान्यांचे प्रश्न, दु:ख, वेदना समजून घेतात.कार्यमग्न होऊन प्रत्येक क्षण समाजाच्या विकासासाठी अर्पण करून समाजविकासाच्या ध्येयपूर्तीसाठी परिश्रम घेत असतात. सर्जनशीलता,दूरदृष्टी, नाविन्याचा ध्यास, समर्पणवृत्ती, संवेदनशीलता, समानुभूती बाळगून रात्रंदिवस समाजाच्या हितासाठी कार्य करीत राहतात.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना आदरणीय श्रीमती दीपा मुधोळ- मुंडे यांनी शिक्षण, आरोग्य, पोषण, कृषी, पर्यावरण, महिला व बालकल्याण, साहित्य अशा विविध क्षेत्रात उस्मानाबाद जिल्ह्यात रचनात्मक कार्य करीत असताना वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविले.
जानेवारी २०२० मध्ये उस्मानाबाद येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. यामध्ये त्यांनी खूप महत्त्वाची मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. प्रशासनातील सर्व खातेप्रमुखांना व साहित्य संमेलनाच्या आयोजकांना मार्गदर्शन केले. अवघ्या महाराष्ट्राला हेवा वाटावा, असे देखणे साहित्य संमेलन उस्मानाबाद नगरीमध्ये संपन्न झाले. देशभरातून येणाऱ्या साहित्य रसिकांना उस्मानाबादचे सौंदर्य नजरेत भरावं यासाठी त्यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. शहरातील दर्शनी भागातील भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली. संत साहित्याचा दांडगा अभ्यास, मराठी साहित्यावरचं प्रेम पदोपदी त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. साहित्य संमेलनाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांचा उत्साह वाढविला होता.
उस्मानाबाद जिल्हा आकांक्षीत जिल्हा आहे. शिक्षण, आरोग्य, पोषण,कृषी कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी विविध कंपन्याकडून सहभाग ( CSR) उभा करून जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. मुलांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये आभासी वर्ग संकल्पना कार्यान्वित केली. या शाळांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये व्हर्च्युअल स्टुडिओ उभा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सकवृती, संशोधनवृत्ती वाढीस लागावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील लघु विज्ञान केंद्रांना विविध साहित्य देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'आनंदी शाळा' हा प्रकल्प राबविण्यात आला. या शाळांमधील इमारतींचा मुलांच्या अध्ययनासाठी वापर व्हावा, या पद्धतीने शाळेची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही शाळांना स्मार्ट बोर्ड देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रशालेत सॅनिटरी नॅपकीन मशीन्स् बसविण्यात आल्या.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणारी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेती पावसाच्या भरवशावर अवलंबून असते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत व्हावी, यासाठी त्या कुटुंबांना शेळ्या देण्यात आल्या. धूरमुक्त अंगणवाडी व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सहाशे अंगणवाड्यांना गॅस जोडणी देण्यात आली. जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या. अशा प्रकारचे नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधाेळ-मुंडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले. यासाठी त्यांनी ओएनजीसी,आरसीएफ यासारख्या कंपन्यांकडून सहभाग जिल्ह्याच्या विकासासाठी उभा केला.
आदरणीय दीपा मुधोळ-मुंडे मुलांच्या गुणवत्तावाढीच्या सर्व प्रकल्पांवर स्वतः लक्ष ठेवून सर्वांना सातत्याने मार्गदर्शन करीत होत्या. शिक्षण परिषद, विविध कार्यशाळा यांच्या माध्यमातून शिक्षकांशी प्रेरणादायी संवाद साधून त्यांना कार्यप्रेरीत करीत असत. अगदी रविवारीसुद्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये येऊन शिक्षकांशी प्रेरणादायी संवाद साधत असत.अध्ययन निष्पत्तीवर एकात्मिक पद्धतीने कशा पद्धतीने काम करायला हवं. याबद्दल पाच हजार शिक्षकांशी शिक्षण परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला होता.
नगरपालिकेच्या शाळेत गोरगरिबांची मुले शिकतात, त्यांना दर्जेदार व उत्तम शिक्षण मिळावे, असा त्यांचा आग्रह होता. याबाबतीत त्यांनी स्वतः शाळांना भेटी देऊन अडचणी समजून घेतल्या. या शाळांना संगणक कक्ष, व्हाईट बोर्ड यासारख्या सुविधा पुरविल्या.
पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जाणीवजागृती व्हावी, यासाठी त्यांनी स्वतः कृतीतून पर्यावरण रक्षणाचे धडे जनतेला दिले. त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी स्वतः सायकलचा वापर सुरू केला. दरराेज सायकलवर कार्यालयात जाऊ लागल्या. त्यांच्या प्रेरणेने अनेक अधिकारी-कर्मचारी कार्यालयात जाण्यासाठी सायकल वापरायला लागले. प्रत्येकानं शहरात सायकल वापरण्याचे आवाहन केले.
वृक्षसंवर्धन ही काळाची गरज ओळखून वृक्षारोपण करण्यासाठी सर्वांना प्रेरीत केले. महसूल विभागामार्फत उस्मानाबाद ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा त्यांनी वटवृक्षाचे वृक्षारोपण केले. यावर्षीचे रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरे केले. रक्षाबंधनाच्या दिवशी वृक्षाला राखी बांधून वृक्षाच्या रक्षणाचा संदेश दिला.
मार्च महिन्यात अचानक कोरोना संसर्गाचं संकट निर्माण झालं. या संसर्गाच्या संकटाला तोंड देण्याचं उत्तम नियोजन करून तब्बल सदोतीस दिवस उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये ठेवला. याच काळात विस्थापित मजूरांची स्वतः लक्ष देऊन काळजी घेतली. स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याचे आवाहन केले. उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रावरून नागरिकांना कोरोनामुक्तीसाठी शपथ दिली. भविष्यात कोरोनाच्या संकटांशी मुकाबला करावा लागेल, कोरोनाच्या तपासणीसाठी दूर जाण्यापेक्षा जिल्ह्यातच प्रयोगशाळा उभारून तपासणीची व्यवस्था झाली तर कोरोना संसर्गावर नियंत्रण करणे सोपे होईल, ही दूरदृष्टी ठेवून त्यांनी लोकसहभागातून प्रयोगशाळा उभारणीसाठी परिश्रम घेतले. अल्पावधीतचं लोकसहभागातून उस्मानाबाद शहरात कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभी केली. लोकसहभागातून उभारलेली ही महाराष्ट्रातील पहिलीच प्रयोगशाळा असावी.
विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रेरीत करणा-या उर्जेचा त्या अखंड स्त्रोत होत्या.
असे प्रयोगशील अधिकारी प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयोग करत असतात. त्यांच्या या प्रयोगांमुळे नागरिकांना मिळणा-या सेवेत सुधारणा घडत असतात. परिणामी प्रशासनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आणि त्यांचा शासनातील सहभाग वाढतो. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतः कार्यतत्पर,कर्तव्यदक्ष राहणा-या जिल्हाधिकारी महोदयांना उस्मानाबादकर कायमचं स्मरणात ठेवतील.
समाधान शिकेतोड
उस्मानाबाद.
samadhanvs@gmail.com
No comments:
Post a Comment