माझा मुलगा कौस्तुभ हा चार वर्षांचा आहे.संध्याकाळची वेळ होती.सध्या अवकाळी पाऊस पडतोय. पाऊस पाहून कौस्तुभ "आला पाऊस,गेला पाऊस" म्हणत आनंदानं उड्या मारत होता.त्याचा आनंद पाहून त्याला जवळ घेतलं.पावसाची टिपटिप अधूनमधून चालू बंद होत होती.त्याला म्हटलं कौस्तुभ आपण गाणं म्हणू.गाणं काही ठरवलेलं नव्हतं.त्याच्याच दोन ओळी पुढे घेऊन गाणं सुरू झालं. मी पुढं दोन ओळी म्हणायच्या मग पाठीमागं तो म्हणायचा.
आला पाऊस
गेला पाऊस
आभाळात आले ढग
कौस्तुभ वर बघ
आला पाऊस
गेला पाऊस
ढगातून पडलं पाणी
कोस्तुभ म्हणतो गाणी
आला पाऊस
गेला पाऊस
असं आमचं मस्तपणे चाललं होतं. तो माझ्यापाठीमागे म्हणत होता.पण स्वतःच्या नावाऐवजी तो मी शब्द वापरत होता.
आभाळात आले ढग
मी वर बघ
ढगातून पडलं पाणी
मी म्हणतो गाणी
असं तो माझ्यापाठीमागे म्हणायचा.हा बदल त्यानं स्वतःच केला होता.मीही त्याला तसंच म्हणू दिलं.पण पोरगं मराठीचं व्याकरण किती अनौपचारिकपणे शिकतंय हे मात्र समजलं.
तो नामाऐवजी मी हा शब्द वापरत होता.म्हणजे सर्वनाम वापरत होता.चार वर्षाच्या मुलाला भाषिक रचना समजत होती. याचेही आश्चर्य वाटले.आपण तिसरी,चौथीत गेल्यावर औपचारिकपणे नाम,सर्वनाम शिकवतो.त्याची व्याख्या,उदाहरणे.किती किती व्याकरण शिकविण्यासाठी धडपड करतो.
मुलांचं भाषा शिकणं जर डोळसपणे पाहायची दृष्टी असायला हवी.मग व्याकरणाकडे मुलांना सहजपणे घेऊन जाता येईल. तेही घोकंमपट्टीशिवाय! मग घडेल सहज शिक्षण.
No comments:
Post a Comment