Wednesday 21 August 2019

अक्षर गटानुसार वाचन-एक अनुभव

काल आमच्या DIECPD OSMANABAD मध्ये एक उपक्रमशील शिक्षक मला भेटायला आले होते. त्यांचं नाव होते श्री.अण्णासाहेब इताले.साधारणतः पाच वाजेच्या सुमारास मला ते भेटायला आले होते. मी त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. गेल्या महिन्यात नुकतीच एक आम्ही त्यांच्या बीटमध्ये आनंदायी रचनात्मक शिक्षण  प्रकल्पाची कार्यशाळा घेतली होती.हा प्रकल्प मराठी,गणित, इंग्रजी या इयत्तासाठी अभ्यासक्रमातील उद्दिष्टांवर आधारित आहे. या प्रकल्पामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन अध्ययन अनुभव द्यावेत. आपल्या वर्गात रचनात्मक काम करावं. यासाठी शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली होती.
 खरंतर या कार्यशाळेमध्ये माझी आणि त्यांची ओळख झालीच ती अक्षर गटावरील चर्चेमुळेच.अक्षरगटावर कसं काम करावं याबद्दल चर्चाही झाली. अक्षर गटानुसार मुलं वाचायला लवकर शिकतात.अर्थपूर्ण वाचन करतात. हे त्यांना पटलं होतं.पण वाचन शिकण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन पालक,समाज यांना माहीत नसल्यामुळे ते जुन्याच पद्धतीने अक्षर, बाराखडी ,जोडाक्षर या पद्धतीने आपलं मूल शिकावं. असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे मग शाळेतही याच पद्धतीचा वापर करावा लागतो. मनात इच्छा असूनही अक्षर गट पद्धतीने मुलांना वाचण्याचा अनुभव देता येत नाही. यासाठी काय करावं? असा त्यांनी मला प्रश्न विचारला. हे अगदी खरं आहे की  मुलांना अगोदर संपूर्ण बाराखडी यावी असं पालकांना वाटत असतं. शाळेत येण्याअगोदरच मुलांना अक्षरांची ओळख करून द्यायला पालकांनी सुरुवात केलेली असते. काही मुलांना काही मुळाक्षरे येतही असतात. तरीही मग पालकांचा बाराखडी पाठ करून घेण्याचा अट्टहास असतो. अशा परिस्थितीत मग शाळेत अक्षर गटानुसार कसं काम करावं. याबद्दल मनात गोंधळ निर्माण होतो. इच्छा असूनही अक्षर गटानुसार मुलांना वाचनाच्या अनुभव देता येत नाहीत. हे अनुभव ते कथन करत होते.
 पालक जसे वाचायला शिकले तसंच आपल्या मुलांनीही शिकावं असं पालकांना वाटतं. वाचन शिकण्याच्या शास्त्रीय दृष्टिकोन त्यांना माहीत नसल्यामुळे असं होतही असेल. पण पण पालकांना शास्त्रीय दृष्टीकोन पटवून दिल्यानंतर नक्कीच अक्षर गटानुसार मुलांना वाचण्याचा अनुभव देण्याविषयी त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होईल. वाचन शिकण्याचा टप्प्यावरील अनेक कृती पालक घरी घेतील.
त्यांनी आता अक्षर गटानुसार आपल्या वर्गात काम सुरू केले आहे. याचा आनंद मला वाटला. अक्षरगटाबद्दलचे त्यांचे अनुभव मी ऐकायला उत्सुक होतो. त्यांनी सांगितलं मी क म ल च आणि दोन स्वरचिन्हे असा अक्षरगट घेऊन मी काम करतोय. पण जेव्हा अक्षर गटानुसार शब्द बनतात तेव्हा मुलं अक्षर गटा बाहेरील अक्षरापासून ही शब्द बनवतात. ही अक्षरे त्यांना येत असतात. मग काय करायचं असा त्यांचा साधा प्रश्न होता. अक्षर गटावर काम करत असताना मुलांना अक्षर येत नाही म्हणून अक्षरांचे दृढीकरण आणि मग अक्षर आणि स्वरचिन्ह यापासून शब्द,वाक्य आणि अर्थपूर्ण उतारा वाचन असे आपण काम करत असतो. पण जर मुलांना अक्षरांची ओळख झालेली असेल तर जास्त अक्षरांचा अक्षर गट करूनही आपण त्या अक्षर गटापासून वाचनपाठ तयार करू शकतो. मुलांना अर्थपूर्ण वाचण्याचा अनुभव देऊ अशीआमची चर्चा झाली. त्यांना ते खूप मनातून आवडलं,पटलं व त्यापद्धतीने मुलांसोबत काम करण्याचा निश्चय केला.खरंतर
इताले सरांसोबत झालेली चर्चा म्हणजे खूप नवा अनुभव आहे. अशा  शिक्षकांशी भेटून, चर्चा करून मलाही आनंद वाटला. मुल शिकण्यासाठी झटणाऱ्या अशा शिक्षकांचा अभिमान वाटतो.



No comments:

Post a Comment