Wednesday 13 March 2019

शाळा भेटीचा समृद्ध अनुभव

     शाळा भेटीचा समृद्ध अनुभव 
    दिनांक- 12 मार्च 2019
           
     उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात  समजपूर्वक वाचन क्षमता  विकास  हा पथदर्शी कार्यक्रम चालू आहे.या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यातील शाळांना भेटी देणे सुरु आहे.आज मी या तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा जानकापूर या शाळेला भेट दिली. ही दोन शिक्षकी शाळा आहे.इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतची मुले या शाळेत शिकतात.मुले खूप बोलकी आहेत.शाळेतील मुलांमध्ये रमलो.मुले आत्मविश्वासाने संवाद साधत होती.मला खूप आनंद वाटला.
    समजपूर्वक वाचन क्षमता  विकास:-या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसली.विविध प्रकारचा मजकूर मुले समजपूर्वक वाचन करत  होती. वाचनकार्डावरील उताऱ्याचे  वाचन करून त्यावरील आकलन व उपयोजनाच्या पातळीवरील प्रश्नांची उत्तरे मुले देत होती. जाहिरात,बातमी,निवेदन या मजकुराचे समजपूर्वक वाचन करत होती. सर्व विद्यार्थी वाचनकार्डचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे देत होती. शिक्षकांनी व्यवहारातील मजकुराचा संग्रह करून त्यावर प्रश्ननिर्मिती केली होती. स्वतः तयार केलेले अध्ययन साहित्य खुपच छान होते.तिसरी, चौथी,पाचवीमधील सर्वंच विद्यार्थी अपरिचित मजकुराचे  समजपूर्वक वाचन करत होती. मुलांनी नाट्यीकरण,संवाद सादरीकरण करून दाखवले. मुले उत्साहाने भाषिक कृती करत होते. प्रत्येक मुलं भाषिकदृष्ट्या समृद्ध व्हावे यासाठी समृद्ध शैक्षणिक वातावरण तयार केले होते.
शालेय वातावरण :- वर्गातील व शालेय परिसरातील वातावरण अध्ययन समृद्ध आहे.वर्गातील भिंती बोलक्या आहेत.त्या त्या वर्गाचा पाठ्यक्रम भिंतीवर डीजीटल बॅनरच्या रुपात सुंदर पद्धतीने लावला आहे.प्रत्येक वर्गात भरपूर प्रमाणात शैक्षणिक साहित्य आहे.
स्पर्धा परिक्षा:- या वर्षी पाचवीतील सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृती परिक्षा दिली आहे. गेल्या वर्षी 8   विद्यार्थ्यांनी शिष्यवृती परिक्षा दिली होती.त्यापैकी 6 विद्यार्थी पात्र ठरले.एक विद्यार्थी शिष्यवृती धारक झाला.परिपाठात सामान्य ज्ञान यावर प्रश्न विचारले जातात.या वर्षी पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिलेली आहे.
लोकसहभागातून शाळा समृद्धी- शिक्षकांनी स्वतःच्या पैशातून वर्गातील भिंती डिजीटल बॅनर लावून बोलक्या बनवल्या आहेत.शाळेत LED वर अभ्यासक्रमातील विविध संकल्पना स्पष्ट केल्या जातात. गावकरी शाळेला नेहमीच मदत करतात. अद्यावत अशी साऊंड सिस्टीम आहे.परिपाठ,विविध कार्यक्रमात याचा उपयोग केला जातो.
                                                                  या शाळेत श्री.संतोष साखरे व श्रीमती.शुभदा देशमुख हे उपक्रमशील शिक्षक आहेत.विद्यार्थ्यांच्या हितासाठी अविरत झटत आहेत. वेगवेगळे प्रयोग करत असतात.यामुळेच या शाळेतील विद्यार्थ्यांची नियमितपणे 100% उपस्थिती असते. शिक्षण हक्क कायद्यानुसार दर्जेदार शिक्षण देणारी गुणवत्तापूर्ण शाळा मला पाहायला मिळाली.शाळेतील प्रत्येक उपक्रम मी समजून घेत होतो.गणित,इंग्रजी,परिसर अभ्यास या विषयाची गुणवत्ताही छान होती.
मुलभूत क्षमता विकास :- भाषा व गणितातील सर्व विद्यार्थ्यांच्या मुलभूत क्षमता प्राप्त होत्या.वाचन व गणितातील मुलभूत क्रिया मुले अचूक करत होती.यासाठी भाषा व गणित अध्ययन समृद्धी साहित्य पेटीचा वापर सुरु होता.
पहिली फोकस:- इयत्ता पहिलीची सर्व मुले अपरिचित मजकूर समजपूर्वक वाचन करत होती.आत्मविश्वाने बोलत होती. चित्रवर्णन करत होती.
पुस्तक काय म्हणाले :- पुस्तक काय म्हणाले हा उपक्रम शाळेतील उपक्रम मुलांना वाचनाची गोडी लावतो.मुले पुस्तक वाचतात.त्यावर चर्चा करतात. पुस्तकाबद्दल स्वत:च्या शब्दात बोलतात.पुस्तकावर प्रतिक्रिया लिहितात.मुले पुस्तकावर बोलत होती.त्यातील पात्रांविषयी सांगत होती.

हे सर्व समजून घेताना मी मुलात रमून गेलो होतो.शिक्षक व मुलांसोबत दुपारचे जेवण केले. किती प्रेमानं मुलं जेवणाचा आग्रह करत होती!

    "सर परत आमच्या शाळेवर कधी येणार"
    "आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची आहे."
परत नक्की येईल असा शब्द देऊन मी तिथून निघालो...खरं तर शाळेतून जावसं वाटत नव्हतं. मुलांचा सहवास समृद्ध करणारा होता.





                वाचनकार्ड वाचन करताना विद्यार्थी


7 comments:

  1. छान समाधान सर खूप बोलकी प्रतिक्रिया दिली, अगदी ग्रामीण भागातील मुलांच्यामध्ये हा आत्मविश्वास आपण निर्माण केलात. आपल्या या उल्लेखनीय कार्याचे अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा....

    ReplyDelete