Saturday, 8 October 2022

लेखक आपल्या भेटीला

विद्यार्थ्यांना लेखकाशी संवाद साधता यावा, त्यांच्या अभिव्यक्तीला धुमारे फुटावेत,त्यांना सर्जनशील लेखन करता यावे यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 'परीसस्पर्श- लेखक आपल्या भेटीला' हा कार्यक्रम औरंगाबाद जिल्ह्यात २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. लेखक म्हणून या कार्यक्रमाला मला आमंत्रित करण्यात आलेले होते. मुलांसोबत संवाद साधण्याची मलाही उत्सुकता होती.न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय करमाड ता.जि. औरंगाबाद या शाळेतील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांशी यावेळी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला. या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली काकडे, हीने तर आभारप्रदर्शन रूपाली भवर हीने केले.यावेळी प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबादचे संचालक तथा डायटचे प्राचार्य मा.डॉ.कलिमोद्दीन शेख,औरंगाबाद तालुक्याचे संपर्क अधिकारी मा.बिरप्पा शिंदे,केंद्रप्रमुख मा.अशोक बनकर उपस्थित होते.

या शाळेतील दहावीमधील अंजली काकडे व सार्थक दाभाडे या विद्यार्थ्यांनी माझी मुलाखत घेतली.या मुलाखतीमध्ये माझा साहित्यिक घडण्याचा प्रवास, साहित्य लेखनाची प्रेरणा, प्रकाशित झालेली पुस्तके, पुस्तक लेखनाची प्रेरणा, बालकविता या विषयावर मुलांसोबत संवाद साधला. मुलांनी मुलाखतीला टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेवटी मनोगतामध्ये अवांतर वाचनाचे महत्त्व, ग्रंथालयावर आधारित उपक्रम,बालसाहित्य या विषयावर चर्चा केली. रोजनिशी लेखन, पत्रलेखन, कविता,कथा लेखन याबद्दल चर्चा केली. या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उज्ज्वला पवार ह्या वाचनासंदर्भात विविध उपक्रम राबवित आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना माझी जादुई जंगल,पोपटाची पार्टी ही पुस्तके भेट दिली. कार्यक्रम संपल्यानंतर खूप मुलांनी भेट घेतली. मुलाखतीतून प्रेरणा मिळाल्याचे सांगीतले. 

एकाच दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हा कार्यक्रम संपन्न होत होता.दुपारच्या सत्रात फुलब्री तालुक्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहता आले.तेथे मित्रवर्य बालसाहित्यक श्री.विनोद सिनकर यांची भेट झाली. भेटून खूप आनंद वाटला.त्या शाळेतील मुलांशीही संवाद साधला. खूप दिवसानंतर दिवसभर शेख साहेबांचा समृद्ध सहवास मिळाला. मुलांच्या शिकण्यासंदर्भात चर्चा केली.

लेखक आपल्या भेटीला कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना लेखकांसोबत थेट संवाद साधता येतो. भाषा विषयाच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त होण्यासाठी,मुले भाषिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी असे कार्यक्रम गरजेचे वाटतात.

No comments:

Post a Comment